अंत पाहू नका, उदय सामंत यांनी दिला हल्लेखोरांना इशारा

Update: 2022-08-03 02:37 GMT

शिंदे गटातील मोठे नेते आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री १० ते १२ जणांनी हल्ला केल्याची घटना घडली.  या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली असून पुण्यातील शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला.  यावेळी हल्लेखोरांनी  "गद्दार-गद्दार" अशी घोषणाबाजीही केली. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तिथून माजी मंत्री उदय सामंत ताफा चालला होता. याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

या हल्ल्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. उदय सामंत यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, "परमेश्वराचे आणि जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत म्हणून मी आज सुखरुप वाचलो. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे." 

"सीसीटीव्ही फुटेजमधून तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता. मी खोटं काहीही सांगणार नाही. जे सांगेन ते पोलिसांना सांगेन. आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेला होता. त्यानंतर सिग्नल लागले. मी कोणाचाही ताफा फॉलो करत नव्हतो. सिग्नल लागल्यामुळे मी नियमप्रमाणे थांबलो होतो. यावेळी माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या. त्यांच्या हातात जे होते, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बाजूला ५० ते ६० शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नाही. फक्त १२ ते १५ लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला," अशी माहिती उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 याशिवाय, "जो प्रकार घडला त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली? त्यांच्या हातात दगड कसे आले? त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला?  या प्रश्नांचा तपास केला पाहिजे. हल्ला करत असताना  ते मला शिव्या घालत होते. या घटनेतून मी वाचलो हे परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. परंतु झालेला प्रकार निंदनीय आहे," अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

शिवाय रात्री उशिरा त्यांनी ट्विट करत हल्लेखोरांना एक इशाराच दिला आहे. त्यात ते म्हणतायत, "गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩"

 तसेच या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि माजी मंत्री असलेले आमदार शंभुराजे देसाई यांनी या घटनेनंतर तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News