कांदा-बटाटा स्वस्त, पण विजेचा 'शॉक' कायम !
Onions and potatoes are cheap, but the electricity 'shock' continues!
भारताच्या घाऊक बाजारातील किंमतींच्या हालचाली दर्शवणारी नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce and Industry) दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित महागाई दर -०.३२% (उणे ०.३२ टक्के) इतका नोंदवला गेला आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर २७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच -१.२१% होता.
सोप्या भाषेत सांगायचे तर, घाऊक बाजारात वस्तूंच्या किंमती अजूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहेत (Deflation), परंतु ऑक्टोबरच्या तुलनेत ही तफावत आता कमी झाली आहे.
नेमके काय स्वस्त, काय महाग ?
नोव्हेंबरमध्ये प्रामुख्याने अन्नधान्य, खनिज तेल, कच्चा पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि धातूंच्या किंमतीत घट दिसून आली आहे. मात्र, वीज दरात झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे निर्देशांकात बदल झाला आहे.
या आकडेवारीचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे :
१. ताटातील महागाई
सामान्य जनतेसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भाज्यांच्या दरात झालेली मोठी घसरण.घाऊक बाजारात भाज्यांचे दर २०.२३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. कांद्याच्या दरात तब्बल ६४.७० टक्क्यांची मोठी घट झाली आहे.बटाटा देखील ३६.१४ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे.
डाळींच्या किंमतीत १५.२१ टक्क्यांची घट झाली आहे.दुसरीकडे, दूध (३.३५% वाढ) आणि अंडी, मांस, मासे (२.०८% वाढ) यांसारख्या प्रथिनांनी युक्त पदार्थांच्या किंमतीत मात्र वाढ झाली आहे.
२. विजेच्या दरात मोठी वाढ
इंधन आणि वीज गटात संमिश्र कल पाहायला मिळाला.नोव्हेंबरमध्ये विजेच्या दरात ६.७० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे उद्योगांवर काहीसा ताण येऊ शकतो.पेट्रोल (-१.७५%) आणि हाय-स्पीड डिझेल (-१.६४%) यांच्या किंमतीत घट सुरूच आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या दरातही १२.७८ टक्क्यांची घट (घाऊक पातळीवर) नोंदवली गेली आहे.
पुढे काय होणार ?
इक्राच्या अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर शून्याच्या वर जाऊन ०.५ टक्के (Positive Inflation) होऊ शकतो. तसेच, आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत हा दर १.५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे. भाज्यांचे दर हंगामी कारणांमुळे वाढल्यास आणि रुपया आणखी कमकुवत झाल्यास महागाई वाढू शकते.