Gold-Silver Prices सोन्या-चांदीचे दर अचानक का वाढले ?

खरंच खरेदीची हीच योग्य वेळ आहे का ?

Update: 2025-11-26 13:43 GMT

जागतिक अर्थकारणात सध्या अमेरिकन 'फेडरल रिझर्व्ह'च्या (Federal Reserve)धोरणाची चर्चा आहे आणि त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या, विशेषतः सोने-चांदीच्या बाजारपेठेवर होताना दिसत आहे. मंगळवारच्या सत्रात तब्बल एक टक्क्याहून अधिक भक्कम वाढ नोंदवल्यानंतर, बुधवारी सुरुवातीच्या सत्रातच सोन्या-चांदीच्या दरांनी अर्धा टक्क्याहून अधिक उसळी घेतली आहे.

हाजिर बाजारातील (Spot Market) वाढती मागणी आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून (US Fed) व्याजदरात कपात केली जाण्याच्या दाट शक्यतांमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

MCX वर सोन्या-चादीचे दर

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरांनी उसळी घेतली असून, डिसेंबरच्या फ्युचर्स (Futures) करारासाठी सोन्याचा भाव ०.५०% वाढून प्रति १० ग्रॅम १,२५,८३५ रु. इतका नोंदवला गेला.दुसरीकडे, चांदीनेही सोन्याच्या पावलावर पाऊल टाकत तेजी दर्शवली आहे. MCX वर डिसेंबर फ्युचर्ससाठी चांदीचा दर ०.९१% ने वधारून प्रति किलो १,५७,७५० रुपये इतका झाला आहे.

सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर किती ?

स्थानिक सराफा बाजारातील मागणी आणि जागतिक संकेत या दोन्ही आघाड्यांवर मौल्यवान धातूंना सध्या 'अच्छे दिन' आल्याचे हे चित्र आहे.

जीएसटी वगकळता २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम हा १,२६,५०० एवढा आहे तर प्रति किलो चांदीचा दर १ लाख ५९ हजार एवढा आहे

जागतिक संकेतांचा परिणाम

केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याने गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अमेरिकेची ताजी आर्थिक आकडेवारी (Macro Data). या आकडेवारीने डॉलरवर दबाव आणला असून, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा आहे.

जेव्हा डॉलर कमकुवत होतो, तेव्हा सोन्याचे महत्त्व वाढते. परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी करणे स्वस्त आणि अधिक आकर्षक ठरते.

डॉलर निर्देशांक आणि बॉण्ड यील्डमधील घसरण

जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद मोजणारा 'डॉलर निर्देशांक' (Dollar Index) ९९.६० च्या आसपास घसरला असून, तो एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या या घसरणीने सोन्याला भक्कम आधार दिला आहे.

तसेच, अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी बॉण्ड्सचा परतावा (Treasury Yields) मागील सत्रातील एका महिन्याच्या नीचांकी पातळीवरच स्थिर राहिला आहे. बॉण्ड्सवरील परतावा कमी होतो, तेव्हा सोन्यासारख्या बिन-व्याजी (Non-yielding) मालमत्तेमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.

एकूणच अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि 'फेड'च्या धोरणांची दिशा जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या बाजारातील ही अस्थिरता आणि तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी जागतिक संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवणे हिताचे ठरेल.

खरेदीची हीच योग्य वेळ आहे का ?

लघुकाळात (Short-term):

भाव आणखी चढू शकतात, पण अचानक प्रॉफिट-बुकिंगचा धोका कायम राहतो.

दीर्घकालात (Long-term):

फेड कपातीची शक्यता , जागतिक अनिश्चितता आणि वाढती मागणी पाहता सोनं-चांदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टप्प्याटप्प्याने खरेदी (SIP)करा

एकाच वेळी मोठी खरेदी टाळा.

गुंतवणुकीचा कालावधी 1–3 वर्षांचा असेल तर हे स्तर आकर्षक मानले जातात.

Tags:    

Similar News