Gold Investment जगभरातील बँकांची सोन्याकडे धाव ! गुंतवणूकदारांनी काय करावे ?

Update: 2025-11-10 07:56 GMT

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांनी विक्रमी वाढ दर्शवली आहे. आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक चलन बाजारातील चढ-उतार यामुळे पुन्हा एकदा सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहे.रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्था अजूनही अस्थिर स्थितीत आहे. अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांनी रशियन मध्यवर्ती बँकेचा निधी गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक देशांनी आपल्या परकीय चलनसाठ्यावर पुनर्विचार सुरू केला. या घटनेनंतर मध्यवर्ती बँकांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू केली.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या २०२४ च्या अहवालानुसार, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी तब्बल १,१३६ टन सोने खरेदी केले असून, मागील ५५ वर्षांतील ही सर्वाधिक खरेदी आहे. चीन, भारत, तुर्की आणि पोलंड हे देश या खरेदीत आघाडीवर आहेत. आरबीआयने (भारतीय रिझर्व्ह बँक) २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुमारे ०.६ मेट्रिक टन (६०० किलो) सोने खरेदी केले आहे. सप्टेंबर २०२५अखेर RBI च्या एकूण सोन्याचा साठा ८८०.१८ मेट्रिक टनांवर पोहोचला आहे.

याशिवाय, २०२४-२५ या वर्षात RBI ने ५४.१३ मेट्रिक टन सोने खरेदी केले होते. मध्यवर्ती बँका सोन्यातील गुंतवणूक भाववाढीसाठी करत नाहीत, तर ही त्यांची मौद्रिक धोरणाचा भाग असलेली धोरणात्मक गुंतवणूक असते. डॉलरच्या तुलनेत सोने स्थिर मालमत्ता मानली जाते, कारण त्यावर कोणत्याही देशाचे नियंत्रण नसते.

सोन्यात गुंतवणूक करावी का ?

सध्याच्या परिस्थितीत, सामान्य गुंतवणूकदारांसाठीही सोनं एक आकर्षक पर्याय ठरू शकतं. परंतु, गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.दीर्घकालीन गुंतवणूक विचारात घ्या . सोन्यातील गुंतवणूक अल्पकालीन नफ्यासाठी नसून दीर्घकाळासाठी सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी उपयुक्त ठरते.भौतिक सोन्यापेक्षा डिजिटल पर्याय निवडा – गोल्ड ईटीएफ, सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड किंवा डिजिटल गोल्ड हे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहेत. यामध्ये साठवणूक खर्च आणि चोरीचा धोका टळतो.

गुंतवणुकीचे प्रमाण मर्यादित ठेवा. तज्ज्ञांच्या मते, एकूण पोर्टफोलिओपैकी १०–१५% इतकी गुंतवणूक सोन्यात करणे योग्य ठरते.

महागाईपासून बचाव (Hedge against Inflation) महागाई वाढल्यावर सोन्याचे मूल्य सामान्यतः वाढते. त्यामुळे हे एक प्रभावी संरक्षण साधन मानले जाते.

जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले, किंवा मध्यपूर्वेतील तणाव वाढला, तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, अमेरिकेतील व्याजदर धोरण आणि डॉलरच्या कमकुवतपणाचा परिणामही सोन्यावर होण्याची शक्यता आहे.

( डिस्केलमर : लेखक हे अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक आणि आर्थिक अभ्यासक आहेत. तसेच हा लेख फक्त अर्थसाक्षरतेसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या)

Tags:    

Similar News