इथिओपिया ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात

एअर इंडिया-अकासा एअरची उड्डाणे रद्द

Update: 2025-11-25 11:36 GMT

इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या प्रचंड राखेच्या ढगांमुळे मंगळवारी एअर इंडिया, अकासा एअर सहित भारतीय विमान कंपन्यांनी काही उड्डाणे रद्द केली.

एअर इंडियाचे 11 उड्डाणे रद्द

एअर इंडियाने X वर पोस्ट करून सांगितले की, सोमवारी भारतीय हवाई क्षेत्रात राखेचा ढग प्रवेश करताना दिसल्यानंतर आतापर्यंत एकूण 11 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Hayli Gubbi ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर काही विशिष्ट भौगोलिक प्रदेशावरून उड्डाण करणाऱ्या विमानांची खबरदारी म्हणून तपासणी सुरू आहे. आमचे ग्राउंड स्टाफ प्रवाशांना सतत माहिती देत आहेत तसेच तात्काळ मदत—हॉटेल व्यवस्था केली जात आहे. पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत,अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.

PTI च्या माहितीनुसार, Hayli Gubbi ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्या क्षेत्रावरून उड्डाण केलेल्या विमानांची एअर इंडिया खबरदारीची तपासणी करत आहे.

मंगळवारी एअर इंडियाने चार देशांतर्गत उड्डाणे रद्द केली

AI 2822 (चेन्नई–मुंबई), AI 2466 (हैदराबाद–दिल्ली), AI 2444 / 2445 (मुंबई–हैदराबाद–मुंबई) आणि AI 2471 / 2472 (मुंबई–कोलकाता–मुंबई).

यापूर्वी सोमवारी एअर इंडियाने सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली होती. यात

AI 106 (न्यूआर्क–दिल्ली), AI 102 (न्यूयॉर्क JFK–दिल्ली), AI 2204 (दुबई–हैदराबाद) आणि AI 2290 (दोहा–मुंबई) या उड्डाणांचा समावेश आहे.

12,000 वर्षांनंतर Hayli Gubbi ज्वालामुखीचा भीषण उद्रेक

इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी जवळपास 12,000 वर्षांनंतर उसळला असून, त्यातून निर्माण झालेला प्रचंड राखेचा ढग सोमवारी रात्री अंदाजे 10 वाजता भारताच्या दिशेने आला असल्याची माहिती

IndiaMetSky Weather या हवामान संस्थेने दिली आहे.

या ज्वालामुखीचा उद्रेक रविवारी सकाळी 8.30 वाजता इथिओपियाच्या Erta Ale पर्वतरांगेत सुरू झाला. राखेच्या ढगात ज्वालामुखीय राख, सल्फर डायऑक्साइड तसेच काच व दगडाचे सूक्ष्म कण असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

अहवालानुसार, उद्रेक थांबलेला असला तरी 100–120 किमी प्रतितास वेगाने जाणारा हा राखेचा ढग भारताच्या दिशेने 15,000–25,000 फूट उंचीपासून ते 45,000 फूट उंचीपर्यंत प्रवास करत आहे. अरब द्वीपकल्पातील अनेक ठिकाणी ज्वालामुखीच्या राखेची चिन्हे दिसल्यानंतर पश्चिम आशियातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राखेचा ढग भारतात कुठे जाणार ?

राखेचा ढग प्रथम गुजरातमध्ये प्रवेश करून त्यानंतर राजस्थान, उत्तर महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमार्गे हिमालयीन प्रदेशाकडे सरकणार आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले की हे राखेचे ढग चीनच्या दिशेने सरकत असून सायंकाळी सुमारे 7.30 वाजेपर्यंत भारतीय आकाश स्वच्छ होईल.

IMD च्या अंदाजानुसार दिवसाच्या काळात गुजरात, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे विमानसेवा प्रभावित होऊ शकते.

DGCA ची विमान कंपन्यांना सूचना

सोमवारी जारी केलेल्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये DGCA ने विमान कंपन्यांना ज्वालामुखीय राखेचे क्षेत्र आणि प्रभावित उड्डाण मार्ग टाळण्याचे आदेश दिले आहेत.तसेच फ्लाइट प्लॅनिंग, मार्ग बदल, इंधन आवश्यकता यामध्ये तात्काळ सुधारणा करण्यास सांगितले आहे.

Tags:    

Similar News