तांदूळ निर्यातीवर नव्या टॅरिफचे संकट ? डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'जोर का झटका'

Crisis of new tariffs on rice exports? Donald Trump's 'hard blow' to India

Update: 2025-12-09 07:35 GMT

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा आधार घेत जागतिक व्यापारात खळबळ उडवून दिली आहे. भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांवर (Fertilizers) नव्याने आयात शुल्क (Tariffs) लादण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार (Trade Deal) अद्याप रेंगाळलेला असतानाच ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करत असताना, ट्रम्प यांची ही खेळी केवळ आर्थिक नसून राजकीय देखील आहे, हे स्पष्ट होत आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

व्हाईट हाऊसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकन शेतकऱ्यांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली. याच वेळी त्यांनी भारतीय तांदळाच्या आयातीवर कडक शब्दात टीका केली. अमेरिकन शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, स्वस्त आयातीमुळे त्यांना स्थानिक बाजारपेठेत टिकून राहणे कठीण होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, 'आम्ही यावर नक्कीच उपाययोजना करू. भारतीय तांदूळ अमेरिकेत 'डम्प' (Dumping) केला जात आहे, आणि हे आम्ही खपवून घेणार नाही."

'डम्पिंग'चा आरोप आणि भारतावर निशाणा

ट्रम्प यांनी थेट भारताचा उल्लेख करत म्हटले की, भारत, व्हिएतनाम आणि थायलंडसारखे देश अमेरिकेत अत्यंत कमी दरात तांदूळ विकत आहेत, ज्यामुळे अमेरिकन तांदूळ उत्पादकांचे नुकसान होत आहे.ते इथे माल डम्प करत आहेत, आणि हे थांबले पाहिजे. मी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना विचारले की, भारताला हे करण्याची परवानगी का आहे? त्यांच्यावर टॅरिफ का लावले जात नाहीत? त्यावर मला समजले की अजूनही व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. पण हे असेच चालू राहणार नाही.

कॅनडाच्या खतांवरही वक्रदृष्टी

केवळ भारतच नाही, तर अमेरिकेचा शेजारी देश कॅनडा देखील ट्रम्प यांच्या रडारवर आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कॅनडाकडून खतांची आयात केली जाते. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर स्वस्त आयातीमुळे अमेरिकेतील खत निर्मिती उद्योगाला फटका बसत असेल, तर कॅनेडियन खतांवर अत्यंत कडक टॅरिफ" (Severe Tariffs) लादले जातील. स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यापार युद्ध आणि राजकीय गणिते

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांना अमेरिकेसोबत दीर्घकालीन आणि स्थिर व्यापार करार हवे आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि आक्रमक धोरणांमुळे वाटाघाटी (Negotiations) सातत्याने फिस्कटत आहेत. ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ लादले होते, ज्यासाठी त्यांनी भारताचे रशियन तेल खरेदी करणे आणि व्यापार अडथळे (Trade Barriers) ही कारणे दिली होती.

अमेरिकन अधिकार्‍यांचे एक पथक या आठवड्यात चर्चेसाठी भारतात येत आहे, परंतु ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चेतून कोणताही मोठा तोडगा निघण्याची शक्यता धूसर झाली आहे.

ट्रम्प यांच्यासमोरील शेतकरी आणि महागाईचा पेच

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्यावर सध्या वाढती महागाई आणि ग्राहकांचा असंतोष कमी करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. अमेरिकन शेतकरी हे रिपब्लिकन पक्षाचे पारंपारिक मतदार आहेत, परंतु वाढता उत्पादन खर्च आणि अनिश्चित बाजारपेठेमुळे ते सध्या अडचणीत आहेत.पुढील वर्षी अमेरिकेत 'मिड-टर्म इलेक्शन्स' (Midterm Elections) आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची नाराजी ट्रम्प यांना परवडणारी नाही. त्यामुळेच भारतासारख्या देशांवर टॅरिफ लादून शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा एक राजकीय जुगार (Political Gamble) असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेत कोणत्या देशातून किती तांदूळ जातो ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 'डम्पिंग'चा (स्वस्त दरात माल खपवणे) आरोप केला आहे. आकडेवारी पाहिली तर खरी परिस्थिती थोडी वेगळी दिसते. अमेरिकेत तांदूळ निर्यात करण्यात भारत आघाडीवर असला तरी थायलंड भारतापेक्षा जास्त तांदूळ अमेरिकेला विकतो. भारत सुमारे ३,२०० ते ३,५०० कोटी रुपये तांदळाची निर्यात अमेरिकेत करतो तर याऊलट थायलंड सुमारे ७,४०० कोटी रुपये तांदळाची निर्यात अमेरिकोत करतो. अमेरिकेत भारतीय बासमती तांदळाला 'प्रीमियम' दर्जा आहे. ट्रम्प यांच्या आरोपांनुसार जर भारताने स्वस्त दरात तांदूळ विकला असेल, तर तो 'नॉन-बासमती' तांदूळ असू शकतो, जो अमेरिकन शेतकऱ्यांच्या स्थानिक उत्पादनाशी स्पर्धा करतो. थायलंडचा 'जास्मिन राईस' (Jasmine Rice) अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे. भारतापेक्षा थायलंडची निर्यात दुप्पट असूनही ट्रम्प यांनी विशेषतः भारताला लक्ष्य केले आहे

ट्रम्प यांच्या रडारवर भारत का ?

थायलंडची निर्यात जास्त असली, तरी गेल्या काही वर्षांत अमेरिकेत भारतीय तांदळाच्या निर्यातीचा वाढीचा वेग वाढला आहे.

भारतीय तांदूळ (विशेषतः नॉन-बासमती) हा अमेरिकन तांदळाच्या तुलनेत स्वस्त पडतो. अमेरिकन शेतकऱ्यांचा आरोप आहे की, भारत सरकार शेतकऱ्यांना सबसिडी (अनुदान) देते, ज्यामुळे जागतिक बाजारात भारतीय तांदूळ स्वस्त राहतो आणि अमेरिकन शेतकरी स्पर्धेत मागे पडतात.भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी (Trade Deals) सुरू आहेत. भारतावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प 'तांदूळ' आणि 'टॅरिफ'चा वापर हत्यारासारखा करत असावेत.

थोडक्यात सांगायचे तर, अमेरिकेत सर्वाधिक तांदूळ थायलंड विकतो, पण सर्वात स्वस्त आणि वेगाने बाजार काबीज करणारा देश म्हणून ट्रम्प यांनी भारताला रडारवर घेतले आहे. 

Tags:    

Similar News