Home > News Update > झाडातून आलं पाणी, जमले भक्त अडाणी

झाडातून आलं पाणी, जमले भक्त अडाणी

झाडातून आलं पाणी, जमले भक्त अडाणी
X

विज्ञानामध्ये आपण बरीच प्रगती केली. मात्र, तरीही डोक्यातली अंधश्रद्धा काही जात नाहीये. एका झाडातून अचानक पाणी यायला लागतं...बघता-बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते...आणि काही वेळातच अक्षरशः त्या झाडाचं रुपांतर एखाद्या मंदिरामध्ये होतं...अंधभक्त हळद-कुंकू लावून, हारतुरे घालून त्या झाडाची पूजा करु लागतात...काहीजण त्या झाडातून निघणारं पाणी हे तीर्थ म्हणून अंगावर घेतात, तीर्थ म्हणून ते पितातही...साधारणतः तासभर हा सगळा दांभिक तमाशा सुरु असतो...तासाभरानं येतो याचा क्लायमॅक्स...अन् मग या अंधभक्तांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात...

ही घटना आहे शिक्षण पंढरी पुणे महानगरातल्या पिंपरी-चिंचवड या उपनगरातील... अंधश्रद्धेविरोधात लढतच दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना याच पुण्यात आपला जीव गमवावा लागतो...त्यामुळं डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा लढा हा किती महत्त्वाचा होता याचा प्रत्यय आजही येतोय...

पिंपरी-चिंचवड शहरातील एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडातून ७ जून २०२५ च्या रात्री अचानक पाणी वाहू लागतं... झाडातून अमृतधारा वाहत असल्याची आवई उठते...स्थानिकांमधील भक्त जागृत होऊन मग झाडाभोवती गर्दी जमते...कुणी तीर्थ म्हणून तर कुणी स्वतःच्या अंगावरुन त्या पाण्याच्या धारा ओवाळून टाकतात...रात्री तासभर हा सगळा तमाशा त्या झाडाभोवती सुरु असतो...झाडातून वाहणाऱ्या या पाण्याला अमृतधारा समजून अंधभक्त त्याची पूजा करुन मोकळेही होतात...

कुणीतरी सूजाण नागरिक ही माहिती आपत्कालीन यंत्रणेपर्यंत पोहोचवतो...मग सवयीप्रमाणे अग्गिशामक दलताच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात...मग सुरु होतं पाण्याच्या उगमस्थानाचं शोधकार्य...एका बिल्डरच्या हलगर्जीपणामुळं या अमृतधारा भक्तांपर्यंत पोहोचल्या...खोदकाम करतांना पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली होती...मग मिळेल त्या वाटेनं पाणी बाहेर पडू लागलं...त्याच फुटलेल्या पाईपलाईनवर हे झाडं होतं... त्यामुळं झाडाच्या खोडामध्ये असलेल्या पोकळीतून पाणी बाहेर आलं आणि हा प्रकार घडला हे स्पष्ट झालं. मग पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला...त्यानंतर या तीर्थ अमृतधारांचं रुपांतर अंधभक्तांच्या अश्रूधारांमध्ये झालं...

झाडातून पाणी येतंय म्हणून जमणारे पिंपरी-चिंचवडचे नागरिक मात्र, अख्ख्या शहराला दूषित पाणी पुरवठा होत असतांनाही त्याविरोधात चर्चाही करतांना दिसत नाहीत. स्थानिक पत्रकार गोविंद वाकडे यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला नेटिझन्सनी प्रतिसाद दिलाय.

Updated : 9 Jun 2025 5:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top