Maharashtra's First Woman DCM : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
X
Maharashtra's First Woman Deputy Chief Minister महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज एक ऐतिहासिक क्षण उमटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (एनसीपी) राज्यसभा खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (विमान अपघातात) निर्माण झालेल्या राजकीय पोकळीला भरून काढण्यासाठी एनसीपीने घेतलेल्या निर्णयानुसार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षातील नेत्यांनी त्यांना एकमताने ही जबाबदारी दिली असून, सुनेत्रा पवार यांनीही पक्षाच्या भावनांचा आदर करून हे पद स्वीकारले आहे.
आज दुपारी २ वाजता विधान भवनात एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एनसीपी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड होईल. Sunetra Pawar Swearing-in Ceremony त्यानंतर सायंकाळी ५ वाजता लोकभवनात (मुंबई) राज्यपालांच्या हस्ते त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला असून, महायुती सरकारच्या वतीने सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) आणि क्रीडा ही खाती मिळण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची चर्चा आहे. शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवावी लागेल, कारण त्या सध्या राज्यसभा खासदार आहेत.
अजित पवार यांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ विमान अपघातात झाले. त्यानंतर फक्त तीन दिवसांतच पक्षाने उत्तराधिकारी ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण, ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रात काम केले असून, बारामतीतून राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्याकडे आली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरता आणण्यासह एनसीपीची एकजुटीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






