गांधी जयंती आणि संघाची शंभरी: ‘योगायोग' | MaxMaharashtra
Gandhi Jayanti and the RSS Sangh's centenary: 'Poetic justice' or a meaningful coincidence | MaxMaharashtra
X
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा स्थापना दिवस महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी यावा हा एक जणू ‘काव्यगत न्याय’ आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख संघाचे कार्यकर्ते खासगीत ‘गांधीवध’ असा करतात. वध हा शब्द खलप्रवृत्तीचे निर्दालन करण्यासाठी वापरला जातो, गांधींना खलप्रवृत्ती मानणाऱ्या संघाच्या कार्यकर्त्यांना आज गांधी प्रातःस्मरणीय मानावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. गांधींच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्याच पटेलांचा पुतळा संघाला उभा करावा लागतो, ही आणखी एक काव्यगत न्यायाची गोष्ट, पण ती नंतर कधीतरी… तर आजची गांधीजयंती विशेष ठरली. एकीकडे गांधी जयंती तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभरी… या दोन घटनांनी समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा घडवून आणली. विशेषतः एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबद्दलच्या भावना आणि मते यांची झुंज पाहण्यासारखी आहे.
गांधी जयंती हा दिवस अहिंसेचा जागतिक संदेश सर्वदूर पसरविण्याचा, त्यासाठी संकल्प करण्याचा आणि कृती करण्याचा दिवस आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने, सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांची लोकांनी उजळण केली. सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा प्रेरणा दिली. #GandhiJayanti आणि #NonViolenceDay हे हॅशटॅग X वर ट्रेंड करीत आहेत, लाखो लोकांनी गांधींच्या विचारांचे उदाहरण देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर अभिवादन केले. गांधीजींच्या विचारांतून आणि प्रेरणेतून सुरु असलेले स्वच्छ भारत अभियान आणि त्याअंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम देशभरात आयोजीत करण्यात आले.
गांधींजी म्हणाले होते की, “जगात जे बदल तुम्हाला हवे आहेत, ते स्वतःपासून सुरू करा” या आणि यासह त्यांच्या काही उद्गारांची लोकांनी सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर आठवण करुन दिली. याखेरीज बेन किंग्जले यांची प्रमुख भूमिका असलेला गांधी चित्रपट लोकांना आज आठवत असल्याचे दिसून आले. या चित्रपटातील दृश्ये लोकांनी आवर्जून शेअर केली. सत्य, अहिंसा आणि महत्वाचे म्हणजे मानवतावादी मूल्यांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या महात्म्याची लोकांनी आज पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण काढली. गांधींबद्दल नकारात्मक पोस्ट करणाऱ्यांची आज नेमकी गोची अशी झाली की नेमकी त्याच दिवशी त्यांच्या मातृसंस्थेची शताब्दी आहे. त्यामुळे खासगीत जरी नकारात्मक बोलायचे असले तरी सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर व्यक्त होताना त्यांना गांधींबाबत सकारात्मकच व्यक्त व्हावे लागले. यामुळेच गांधीबद्दलच्या सुमारे 95 टक्के पोस्ट या सकारात्मक आहेत.
दुसरीकडे राष्ट्रीय स्वसंसेवक संघ आपली शंभरी साजरी करीत आहे. संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यानंतर वेगळे होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हा दिवस हिंदू कॅलेंडरनुसार विजयादशमीचा होता. त्यामुळे प्रत्येक दसऱ्याला संघ आपला स्थापना दिवस साजरा करतो. संघाचे मुख्यालय मानल्या जाणाऱ्या रेशीम बागेत प्रधानमंत्री महोदयांनी यानिमित्ताने शंभर रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. तर विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच परिवर्तन याबाबत भाष्य केले. सामाजीक समरसता, पर्यावरण, शिक्षण, स्वदेशी आणि मूल्ये ही संघाची पंच परिवर्तन तत्वे आहेत. संघाच्या शंभरीनिमित्त सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर #RSS100Years आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. संघाच्या समर्थकांनी अपेक्षेप्रमाणे संघाची योगदानाची उजळण करुन देताना सकारात्मक पोस्ट केल्या आहेत. या जवळपास 65 टक्के एवढ्या आहेत. दुसरीकडे ही संस्था आपल्या स्थापनेपासूनच वादग्रस्त असल्याचा कंगोरा देखील चर्चेमध्ये मांडण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हते इथंपासून ते वर्णव्यवस्था, गांधीहत्या, संविधानाप्रतीची अनास्था, सामाजीक न्यायाबाबतची भूमिका आदींबाबत विरोधकांनी संघावर आरोपांचा भडीमार केला. सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या वादग्रस्त चर्चा जोरात आहेत. संघाला विरोध करणाऱ्या युजर्सनी गांधीजींचे एक विधान मांडले, ज्यामध्ये गांधींनी संघाचा उल्लेख जातियवादी आणि एकाधिकारशाही गाजविणारी संघटना असा केला होता. स्वातंत्र्यलढ्यात संघाची भूमिका, 1948 च्या गांधी हत्येनंतरचा बंदीचा इतिहास आणि सध्याच्या सामाजिक न्यायाच्या मुद्दे याबाबत सुमारे 15% नकारात्मक पोस्ट आहेत. तर तब्बल 20% पोस्ट या तटस्थ आहेत. पण त्या संघाबाबतची ऐतिहासिक तथ्ये किंवा माहिती मांडतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत पोस्ट करणारे लोक भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपाशी संबंधित आहेत. ही गोष्ट उघड सत्य आहे की, भाजपाकडे देशातील सर्वात शक्तीशाली अशी सोशल मिडिया उपस्थिती आहे. संघाबाबतच्या पोस्ट या भाजपाच्या संबंधित अकाऊंटवरुन करण्यात आल्या आहेत. सोशल मिडियाच्या पोस्टबाबत ‘ग्रोक’ ने विश्लेषण केले आहे. त्यातील सुमारे 65 टक्के पोस्ट या सकारात्मक आहेत. त्या संघाच्या शंभरीला राष्ट्रभक्ती आणि सेवाभावाचा विजय म्हणतात. या पोस्टसना सरासरी 300 च्या आसपास लाईक्स आहेत. तर 20 टक्के पोस्टस् या तटस्थ आहेत. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा आढावा घेतात. यामध्ये गांधीजींच्या हत्येनंतर या संघटनेवर घातलेल्या बंदीचा उल्लेख आहे. त्यानंतरचा प्रवास आणि थेट मत मात्र या पोस्ट व्यक्त करीत नाहीत. दुसरीकडे 15 टक्के पोस्ट या नकारात्मक आहेत. या पोस्ट गांधी हत्या, ब्रिटीशांसी निष्ठा आणि सध्याच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणाच्या संदर्भाने प्रश्नचिन्हं उपस्थित करतात. या पोस्टसना जास्त ‘व्ह्यूज’ मिळाल्या आहेत अगदी 10 हजार पर्यंत. शिवाय या पोस्टवर व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया देखील तीव्र स्वरुपाच्या आहेत.
गांधी जयंती आणि संघाची शंभरी हा संयोग विचार करायला लावणारा आहे. गांधींजींचा अहिंसा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश आजही जागतिक पातळीवर प्रेरणादायी आहे. तर संघाच्या शताब्दीने भारतातील राजकीय आणि सामाजिक संभाषणाला नवी धार दिली आहे. X वर गांधींच्या विचारांचा प्रभाव व्यापक आणि एकसंध आहे. संघाबद्दलच्या चर्चा उत्सवी आणि वादग्रस्त अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. हा विरोधाभास भारताच्या वैचारिक विविधतेचे दर्शन घडवितो. एक बाजू ही सत्य आणि अहिंसेची आहे, तर दुसरी बाजू ही आक्रस्ताळा राष्ट्रवाद आणि तथाकथित सांस्कृतिक पुनर्जागरणाची आहे. गांधी जयंतीमुळे ही विचारसरणी आजही देशाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, हे उघड झाले. पण संघाची शंभरी आणि त्याच्याशी संबंधित वाद यामुळे राजकीय चर्चा देखील तितकीच तीव्र आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला भारताच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल विचार करण्याची संधी देतात. आपण नेमकी कोणती मूल्ये घेऊन पुढे जाणार आहोत ? हा निर्णय मात्र सर्वस्वी आपल्या पिढीचा असेल हे नक्की.

Girish Awaghade
Girish Awaghade, also known as Girish Lata Pandharinath in various media, has been a journalist for the past 25 years, working across various media platforms. His journalism career began at the daily newspaper Dainik Prabhat. He later gained experience in the news division (infotainment) at channels like ETV, Mi Marathi, and Zee 24 Taas. Additionally, he has worked in various roles at newspapers such as Dainik Pudhari, Dainik Divya Marathi, Dainik Sakal, and Dainik Prabhat. He has nearly 9 years of experience as a Delhi correspondent and extensive experience working on the desks of both print media and news channels for a long period. He also wrote for a time for the daily newspapers Dainik Krushival and Dainik Ekmat. Furthermore, he contributes to various periodicals. He is also known as the author of two books: 'Aswasth Nondi' and 'Pausatla Sahyadri'.