CJI Bhushan Gavai On ED : ईडी बद्दल महाराष्ट्रात आम्हाला वाईट अनुभव आला – सरन्यायाधीश भूषण गवई
X
मागील १० वर्षात ED अर्थात सक्तवसुली संचालनालय ही संस्था फारशी चर्चेत नव्हती. मात्र, ही संस्था चर्चेत आली ती राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर जेव्हा ईडीनं धाडी टाकल्या, केसेस केल्या आणि काही जणांना तुरुंगात टाकल्यानंतर. विरोधकांनी या संस्थेवर सातत्यानं टीका केलीय. मात्र, आज थेट सर्वोच्च न्यायालयानंच ईडीच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांच्याविरोधात ईडीनं एक याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळत कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेले आदेश कायम ठेवले आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं ईडीला चांगलेच फैलावर घेतले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश के. विनोद चंद्रन यांच्या न्यायपीठानं ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी केली. कर्नाटकातील मुडा (Muda) घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात ईडीनं याचिका दाखल केली होती. त्यास कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यामुळं ईडीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ईडीची याचिका फेटाळत त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
ईडीच्या वतीनं अतिरिक्त महाधिवक्ता एस.व्ही.राजू यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. याचिकेवर सुनावणी करतांना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “मिस्टर राजू, कृपा करुन तुम्ही आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अन्यथा आम्हाला ईडीविरोधात कठोर शब्दांचा वापर करावा लागेल. दुर्देवानं तुमच्याबद्दल आम्हाला महाराष्ट्रात वाईट अनुभव आलाय. तोच प्रकार आता संपूर्ण देशात पसरवू नका. राजकीय लढाई ही मतदारांसमोर लढायला हवी. यामध्ये तुमचा वापर का केला जातोय ? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फैलावर घेतलं.