भाजपच्या वाचाळवीर विजय शाह यांना सर्वोच्च न्यायालयानंही झापलं
X
दिल्ली :- सार्वजनिक पदावरील व्यक्तीनं काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. मंत्र्यानं उच्चारलेलं प्रत्येक वाक्य जबाबदारीनं असलं पाहिजे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश सरकारचे मंत्री कुंवर विजय शाह यांना फटकारले आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे मध्यप्रदेश सरकारचे मंत्री शाह यांच्या वादग्रस्त विधानाची स्वतःहून दखल घेत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने शाह यांनाच चांगले सुनावले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच मंत्र्यांनी जबाबदारीने बोलताना, "तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्य करता," असा सवाल शाह यांना विचारला. भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्या अध्यक्षतेखाली दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी हे प्रकरण ऐकून घेऊ असे सांगितले आहे.
"संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदार असले पाहिजे... जेव्हा देश अशा परिस्थितीतून जात आहे... फक्त तुम्ही मंत्री आहात म्हणून...," अशा शब्दात सरन्यायाधीश गवई यांनी मंत्र्यांना सुनावले. कुंवर विजय शाह यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी ही याचिका न्यायालयासमोर मांडली तेव्हा सरन्यायाधीशांनी हे विधान केले. "जा आणि उच्च न्यायालयात माफी मागा." असेही मंत्री शाह यांना सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं असून इथं माफी मागू नका असेही स्पष्ट केले.