बार्टीच्या 94 विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत यश
प्रथमच बार्टी मार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईईचे मोफत प्रशिक्षण
X
नागपूर विभागातील 29 विद्यार्थांचा समावेश
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच जेईई पूर्व प्रशिक्षण योजना राबविल्या गेली. नुकत्याच या परीक्षेचा निकाल लागला. या निकालात बार्टीच्या 94 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या निकालाच्या आधारे विद्यार्थांना देशातील श्रेष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
राज्यातील मुंबई, पूणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरातून, विविध नामांकित प्रशिक्षण संस्थेत मागील दोन वर्षात 419 विद्यार्थ्यांना जेईई पूर्व प्रशिक्षण योजनेनुसार मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी मेरीट लिस्टनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आर्थिक दुर्बळ घटकास प्रशिक्षण काळात विद्यावेतन देण्यात आले. अभ्यासासाठी लागणार्या साहित्यासाठीही बार्टी मार्फत अर्थसाहाय्य करण्यात आले.
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बार्टीच्या वतीने पहिल्यांदाच ‘जेईई’ पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग लाभला. बिकट परिस्थितीत त्यांना मिळालेले यश विशेष उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांना आता देशातील दर्जेदार अभियांत्रिकी संस्थांमधे शिक्षण घेता येणार असल्याची माहिती दिली.
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शखाली व सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारामुळे अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रशिक्षण व संशोधन योजना राबविण्यात येत आहे.
तसेच येणार्या काळात नवनवीन तंत्रज्ञानानुसार, विद्यार्थ्यांच्या मागण्यानुसार नव-नवीन प्रशिक्षण योजना निर्माण केल्या जात आहे. बार्टीच्या वेबसाईटवर या सर्व योजनांची सविस्तर माहिती नमुद करण्यात आली आहे. त्याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.
जेईईच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत
माझे वडील भंडार्याला ऑर्डिनन्स फॅक्टरीत कामाला आहेत. मोठा भाऊ, मी, आई असे आमचे कुटूंब. मला दहावी झाल्यानंतर शाळेतून बार्टीच्या जेईई पूर्व प्रशिक्षण योजनेबाबत माहिती मिळाली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया झाल्यानंतर मेरीट लिस्ट नुसार नंबर लागला. पुढे नागपूरात खोली करुन प्रशिक्षण पुर्ण केले. बार्टीमुळे दोन वर्षात जेईईचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळाले. करीअरचा बेस पक्का करता आला. प्रशिक्षणा दरम्यान मिळणार्या अनुदानाने राहण्या-खाण्याचे आर्थिक प्रश्न मिटले. आत्मविश्वासाने यशस्वी होता आले.
-शिवम मनोज टेंभूर्णेकर
दहावी पास झाल्यानंतर जेईई द्यायची ठरवले. बार्टी कार्यालयात जाऊन जेईई पुर्व प्रशिक्षण योजनेची माहिती घेतली, अप्लाय केला. वडील प्रायव्हेट जॉब मधे आहे. घरी बहिण, भाऊ, आई आहेत. या परिस्थितीत प्रशिक्षणा दरम्यान मिळणार्या स्टायफंडचा खूप फायदा झाला. खूप चांगले कोचींग मिळाले. बार्टीमुळे आत्मविश्वासाने शिकता आले, पुढचा मार्ग सुकर झाला.
-शर्वरी संजय सहारे
मी बहादुरातून सेमी इंग्लिशमधे दहावी पास केले. माझे वडील पेंटींगची कामे करतात. घरी आई आणि लहान भाऊ आहे. सोशल मीडियावर बार्टीच्या जेईई प्रशिक्षण योजनेबाबत माहिती वाचली. गुणवत्ता यादीनुसार नंबर लागला. बार्टीतर्फे जवळपास दोन वर्ष जेईईचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. सर्व विषयाची चांगली तयारी करुन घेण्यात आली. स्टायफंड ने आर्थिक अडचणी दूर करता आल्या. मी आता जेईई अडव्हांसची तयारी करीत आहे.
-अक्षद वासुदेव वानखेडे