राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत झुंजत राहायचं तेवढंच आपल्या हातात आहे - अजित पवार
अजित पवार माणूस, नेता म्हणून कसे होते? राजकारणात काम करण्याची त्यांची पद्धत कशी होती? भल्या पहाटे कामाला सुरुवात करणाऱ्या अजित पवार यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा लेख
X
“संजयराव, फार मोठं राजकारण बघितलं हो आम्ही. गेले ते दिवस. पण, आता असंय. हे काही सोडता येत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत झुंजत राहायचं. तेवढंच आपल्या हातात आहे.” महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत भल्या सकाळी अजित पवारांशी गप्पा मारत होतो. एवढ्या दिलखुलास गप्पा रंगल्या की दोन तास झाले, हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. अर्थात, हा अपवाद नव्हता. अजित पवारांशी गप्पा अशाच व्हायच्या लांबरुंद आणि ऐसपैस. काहीही पोटात न ठेवता, थेटपणे बोलणारा माणूस. एवढा मनमोकळा आणि दिलखुलास नेता मी दुसरा पाहिला नाही.
अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेले, त्या विद्यापीठाचे राजकारणी. सत्ता मिळवायची. टिकवायची. त्यासाठी सगळे अपराध मान्य. मात्र, ही सत्ता लोकांसाठी आहे, हे कधी विसरायचे नाही. अजित पवार हे ‘स्टेट्समन’ होते. संसदीय राजकारणाची शिस्त समजणारे होते. उभा-आडवा महाराष्ट्र त्यांना माहीत होता. प्रशासनातले अधिकारी त्यांना घाबरत, कारण त्यातील ओळ ना ओळ त्यांना ठाऊक असे. अजित पवारांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. कधीच धर्माचे राजकारण केले नाही. लोकांचे काम करा आणि निवडून या, हा त्यांचा साधा खाक्या होता. अर्ध्या रात्रीही अजित पवार लोकांसाठी उभे असायचे. सतत काम करत असायचे. त्यामुळेच लोकांचे ते प्रचंड लाडके होते.
शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली वाढत असताना, एवढी स्वतंत्र उंची मिळवणे, ही सोपी गोष्ट नाही. काकांचेच बोट धरून ते राजकारणात आले, हे खरे, पण त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख तयार केली. ती स्वतःच्या कर्तबगारीने तयार केली. अहोरात्र काबाडकष्ट करून, अभ्यास करून, लोकांमध्ये जाऊन, स्वतःचे लोक मिळवून ती ओळख त्यांनी तयार केली.
अजित पवारांचा दरारा होता. पण, ती दहशत नव्हती. लोकांनाही त्यांची दादागिरी आवडे. कारण, त्याच्या मुळाशी एक प्रेमळ माणूस होता. अजित पवारांचे अख्खे राजकारणच काय, संपूर्ण आयुष्य इमोशन ड्रिव्हन होते. अत्यंत भावनाप्रधान होते. त्यांनी कायम त्यांच्या मनाचे ऐकले. फार व्यूहरचना अथवा असे काही करत न बसता, जे वाटले ते केले. त्यामुळेच कार्यकर्त्यांवर त्यांचा जीव होता. अगदी त्यांच्या स्टाफमधील सामान्य सहकार्यासोबतही ते तेवढ्याच प्रेमाने वागत. त्या प्रेमात अधिकारही असायचा. पण, अर्ध्या रात्री हाच दादा आपल्यासोबत असणार आहे, ही मुख्य खात्री असायची. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या सदैव सोबत असत.
कोणताही माणूस हा त्या काळाचे अपत्य असतो. अजित पवार काही महापुरूष नव्हते. या काळाचे नेते होते. या काळाच्या, या माणसांच्या मर्यादा त्यांना होत्या. त्यांच्या राजकारणाला होत्या. त्याचे स्वतंत्र मूल्यमापन करावे लागेल. पण, एक खरे की, हा सेंद्रिय, ऑर्गॅनिक नेता होता. मातीत उगवलेला होता. राजकारणाला धर्म मानणारा आणि त्यासाठी सच्चा असणारा असा नेता. नरेश अरोरा वगैरे त्यांनी नंतर नियुक्त केले खरे आणि गुलाबी जाकीटही घातले, पण तो काही त्यांचा स्वभाव नव्हता. जे आहे ते आहे, अशा प्रकारच्या नेत्याचा राजकारणात जन्म झाला, तेव्हा तो यशवंतराव- शंकरराव- वसंतदादा- शरद पवारांचा महाराष्ट्र होता. अजित पवार साठी उलटत असताना मात्र त्या राजकारणाचा आकार उकार पार बदलून गेला होता. त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत ते अखेरच्या क्षणापर्यंत करत राहिले.
साठी उलटलीय, असे वाटूच नये, असे व्यक्तिमत्त्व होते अजित पवारांचे. एकदम फिट. मोजका आहार. उत्तम व्यायाम. भल्या सकाळी कामाला सुरूवात. अखंड काम. शांत झोप ही माझ्या प्रकृतीची गुपिते आहेत, असे त्यांनी एकदा मला सांगितले होते.
पण दादा,
हे बरोबर नाही केले.
तुम्हाला घाई होतीच. पण, एवढी घाई बरोबर नाही.
आजवर तुम्ही अनेकदा भल्या सकाळी उठवले. “संजयराव, सकाळी सहा वाजता मुंबईतल्या बंगल्यावर या. गप्पा मारू”, असा निरोप आला की सकाळची झोप गेलीच. पहाटे शपथ घेऊनही तुम्ही झोपेतून जागे केले होते. पहाटे म्हटलेले तुम्हाला आवडायचे नाही. सकाळी आठ होते ते संजयराव, असे तुम्ही जाहीर मुलाखतीत जरबयुक्त आवाजात म्हणाला होतात. परवा अशीच भल्या सकाळी तुम्ही वेळ दिलीत आणि आंघोळही न करता आलो. आजही असेच सकाळी सकाळी जागे केलेत, दादा. पण, ही बातमी द्यायला नको होती.
सगळ्या धामधुमीत तुमच्यावर मी खूप जाहीर टीका केली. विनोद केले. तुम्ही हसत हसत ते झेललेही...
पण दादा, एक सांगायचं राहून गेलं.
तुम्ही मला आवडत होतात.
तुम्ही मलाही हक्काचे वाटत होतात.
हे सांगायचं राहून गेलं. आणि, आता तुम्ही गेलात!
हा धक्का पचवणं कठीण आहे!
(साभार - सदर पोस्ट संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






