Home > श्रद्धा बेलसरे-खारकर > चौथा स्तंभ: अतुल कुलकर्णी

चौथा स्तंभ: अतुल कुलकर्णी

सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आल्याची चर्चा सातत्याने होत असते. मात्र, या कठीण काळातही जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरणारा, ज्यांच्या बातम्यांची दखल घेऊन न्यायालयाने सरकारला खडसावले. आपल्या शोध पत्रकारितेने सरकारचे पितळ उघडे पाडले. अशा ज्येष्ठ पत्रकार, लेखक अतुल कुलकर्णी यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीवर माहिती व जनसंपर्क विभागाच्या माजी संचालिका श्रद्धा बेलसरे-खारकर यांनी टाकलेल्या प्रकाश fourth pillar of democracy Journalist Writer atul kulakarni journey share by Writer shardha belsare

चौथा स्तंभ: अतुल कुलकर्णी
X

त्यावेळी मी राज्याच्या जनसंपर्क महासंचालनालयात माहिती संचालक होते. अतुल कुलकर्णी औरंगाबादहून नव्यानेच 'लोकमतचा मुंबई प्रतिनिधी' म्हणून आला होता. तशी आमची पूर्वी एकदोन वेळेस भेट झाली होती. त्या दिवशी अतुल केबिनमध्ये आला आणि म्हणाला,

"नमस्कार मॅडम, मी अतुल कुलकर्णी. लोकमतचा मंत्रालय प्रतिनिधी म्हणून जॉईन झालो आहे. औरंगाबादहून आलोय. तुम्ही मराठवाड्याच्या आहात म्हणून मुद्दाम भेटायला आलो."

छान फॅशनेबल पण पेशाला शोभणारे कपडे घातलेल्या त्या उंच, गो-यापान मुलाला बघून मला वाटले - अरे हा देखणा मुलगा पत्रकारितेसारख्या रुक्ष क्षेत्रात कशाला आलाय? याने तर सिनेमा-नाटकात जायला हवे होते!




अतुलला त्याच्या पेपरने 'मंत्रालय बीट' दिलेले असल्याने मग आमच्या कामासाठी रोजच भेटी होऊ लागल्या. अतुलचा स्वभाव अतिशय लाघवी आहे. कुणाच्याही पोटात शिरून तो बातमी काढू शकतो. एक दिवस तो मला म्हणाला,

'मॅडम, तुम्हाला रोज केवढी तरी माणसं भेटत असतात. इतके अनुभव येतात. मग तुम्ही त्यावर आधारित असे एखादे सदर का लिहित नाही? मी म्हटले, "चांगली सूचना आहे. लिहित जाईन मी अधूनमधून." तो म्हणाला. "असं नको. तुम्ही दर आठवड्याला एक लेख लिहिणे सुरू करा." शेवटी त्याच्या आग्रहाने मी जवळपास दोन वर्ष लोकमतमध्ये "आसपास' हे सदर चालवले.

या काळात त्याची पत्नी दीपा आणि मुलगी गार्गीशीही चांगली जवळीक झाली. अतुल भावासारखा बनून गेला. एक दिवस तो माझ्याकडे आला होता. त्याच्या मुलीचा, गार्गीचा, एक छान फोटो त्याने मला दाखवला. मला फोटो खूप आवडला. 'हा फोटो माझ्याकडे राहू दे' मी म्हटले. यावर तो म्हणाला, 'मॅडम मुलगी औरंगाबादला असते म्हणून मुद्दाम फोटो माझ्याकडे ठेवला आहे.' मी म्हटले, 'अरे बाबा, तुझी मुलगी आहे तू अजून फोटो काढू शकतो. हा माझ्याकडे ठेव.' मग मी सेवानिवृत्त होईपर्यंत तो फोटो माझ्या टेबलावरच्या काचेखाली होता. मी एकदा त्याच्यासाठी एक लाल रंगाचा टीशर्ट आणला. तो म्हणाला,

'इतक्या महागाचा ब्रँडेड शर्ट कशाला घेतला? इतका खर्च का केला? मी म्हटले, 'महाग नाही.' त्याने विचारले, 'कुठे घेतला?' मी म्हटले, 'शिरपूरला.' इतकेच झाले. काही दिवसांनी अतुलचे एक फिचर वाचण्यात आले. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर येथे आमदार अमरीश पटेल यांचा टेक्स्टाईल पार्क आहे. तिथे कापसापासून सूत काढणे, सुतापासून कपडे तयार केले जातात. इथे केलेले टी-शर्ट परदेशात निर्यात केले जातात. अशी सर्व माहिती त्यात होती. म्हणजे अतुलने त्या शर्टावरून एवढी सगळी माहिती गोळा करून लगेच एक फिचरही तयार केले होते!



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पत्रकार अतुल कुलकर्णी

मराठवाड्यातील एक होतकरू मुलगा म्हणून माझे त्याच्या प्रगतीकडे लक्ष होते. आधीआधी अडखळत, चाचपडत काम करणारा अतूल लवकरच सराईतपणे बातम्या देऊ लागला. त्याचा पेपरही मोठा असल्याने त्याच्या बातम्या खूप गाजू लागल्या.

साधीसोपी भाषा आणि सरकारच्या कारभाराची बित्तंबातमी आकडेवारीसह काढण्याचे कौशल्य यामुळे त्याच्या बातम्या नावानिशी प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याच्या शोधपत्रकारितेतील कामगिरीमुळे त्याने अनेक गैरप्रकार उघडकीस आणले.

राज्य सहकारी बँकेत गडबड आहे. अशी कुजबूज होतीच परंतु अतुलने अगदी सखोल माहिती मिळवून त्या बँकेवर प्रदीर्घ लेखमालाच लिहिली. त्यावर विधानसभेत प्रचंड चर्चा झाली, गदारोळ झाला. शेवटी केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेने राज्य सहकार बँकेचे शिष्टमंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. आजही बँकेचे संचालक मंडळ बरखास्तच आहे. राज्याच्या इतिहासात एखाद्या बातमीमुळे अशी घटना प्रथमच घडली असेल असे मला तरी वाटते.



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत पत्रकार अतुल कुलकर्णी

लने अनेक विषय हाताळले. जलसिंचनाच्या बाबतीत झालेला घोळ असेल किंवा मटक्याचे राजकारण आणि त्यातून जोपासलेली गुन्हेगारी वृत्ती, म्हाडाच्या घरबांधणीचे राजकारण किंवा राज्यातील आरोग्य विभागाने घातलेला घोळ असो, ती बातमी फोडावी तर अतुलनेच..! औरंगाबादकरांना सिडकोचे नाट्यगृह अतुल ने केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळू शकले हे वास्तव आहे.

'धारावी पुनर्विकास प्रकल्पात' होत असलेल्या विलंबासह अनेक विषयांवर त्याने लेखमाला लिहिल्या आणि सरकारला धारेवर धरले. शिवाय त्याचे वेगळेपण म्हणजे तो कोणत्याही सरकारला मुद्दाम अनुकूल किंवा प्रतिकूल भूमिका घेत नसे.


विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पत्रकार अतुल कुलकर्णी

भाजपा शिवसेनेच्या काळातही सगळ्यात प्रथम पंकजा मुंडे यांच्या काळात झालेला 'चिक्की खरेदीच्याबाबतचे प्रकरण त्यानेच उघडकीस आणले. त्यासंदर्भात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्याचबरोबर 290 कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा त्याने उघडकीस आणला आणि त्याची दखल तर उच्च न्यायालयानेही घेतली होती.

एखाद्या पत्रकारने बातमी दिल्यावर त्याची दखल घेऊन जनहित याचिका दाखल व्हावी. असे फार क्वचित घडते. अतुलने इथेही एक रेकोर्ड उभे केले. त्याने लिहिलेल्या दहा वृत्तमालिकांना उच्च न्यायालयाने 'पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन' म्हणून दाखल करून घेतले आहे!



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत अतुल कुलकर्णी

एकाच पत्रकाराच्या बातमीपत्रावर इतक्या पी.आय.एल. होण्याचे असे दुसरे उदाहरण मला तरी माहित नाही. त्याच्या लेखमालिकेतील सर्व विषय सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेले होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके मिळणे, राज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान मिळणे, वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुधारणा अशा गोष्टी त्याने लिहिलेल्या लेख मालिकांमुळे घडल्या आहेत.

सिडकोतील ग्रीन बेल्ट प्रकरण, औरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आणि मतिमंद मुलांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रश्न, सिडकोतील तब्बल 26,000 अतिक्रमणे आणि परिवहन विभागातील असंख्य गैरप्रकार यावरच्या त्याच्या लेखमाला अतिशय गाजल्या.

अतुलला कोणत्याच विषयाचे वावडे नाही. मागे 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि आम्ही सगळेजण हादरलो! खूप बातम्या येत होत्या. या सगळ्या बातम्यांच्या मागे मूळ हल्ल्याचे कारण काय असावे? तो कोणी केला काहीच कळत नव्हते. सगळ्या देशात आणि वातावरणात प्रचंड तणाव होता. त्या पंधरा दिवसात राज्याच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ झाली!



दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्यासमवेत अतुल कुलकर्णी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला! या सगळ्या घटनाक्रमावर अतुलने '26/11- ऑपरेशन मुंबई' या नावाने एक पुस्तकच लिहिले. घटना घडल्यापासून अवघ्या तीन महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. एकापाठोपाठ सहा आवृत्त्या निघाल्या. मग पुस्तकाचे इंग्रजी, गुजराती भाषेत अनुवाद झाले. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विषयाच्या अभ्यासकाला हे पुस्तक म्हणजे वाचलेच पाहिजे असा एक दस्तऐवज बनले.

त्याने त्याच्या पत्रकारितेला कधीही साचेबंद स्वरूप येऊ दिले नाही. एक दिवस त्याने एक अफलातून कल्पना काढली. तो ज्या लोकमतमध्ये काम करतो .त्याचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण पत्रकार घडले. अनेकजण पत्रकारितेतून विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदावर गेले. या सगळ्यांकडून त्याने "त्या प्रत्येकाच्या जडणघडणीत राजेंद्र दर्डा यांचा वाटा" यावर एकेक लेख लिहून घेतला.




'आमचे विद्यापीठ' या नावाचं एक नितांत सुंदर पुस्तक त्याने प्रकाशित केलं. पुस्तकाची मांडणी, आशय, त्याचबरोबर छपाई यासाठी या पुस्तकाचे प्रचंड कौतुक झाले. राजेंद्र दर्डा यांनी लोकमत (औरंगाबादची) केलेली उभारणी, प्रिंट्रिंग टेक्नॉलॉजीतील त्यांचे ज्ञान, कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, सहका-यांबद्दलची सहानुभुती अशा विविध गुणांवर आधारित हे पुस्तक आहे.

मुद्रित माध्यमाचा मराठवाड्यासारख्या मागास भागातला सुरुवातीच्या काळातला इतिहास जर कोणाला अभ्यास करायचा असेल, तर ते पुस्तक उत्तम वस्तुपाठ आहे. शिवाय एखादे मोठे साखळी वृत्तपत्र उभे करू इच्छिणा-या उद्योजकासाठी हे पुस्तक कसे वागावे आणि तसे वागू नये. यासाठीची ब्लूप्रिंट ठरेल.

बातम्याबरोबरच अतुलने 'बिनचेह-याची माणसे' या नावाने एक सदर लिहिले होते. पुढे याच नावाचे त्याचे पुस्तक आले. ज्यात त्याने पत्रकार प्रकाश बाळ जोशी आणि सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह केलेला प्रयोग पुस्तकाच्या क्षेत्रात आजही पूर्णपणे वेगळा प्रयोग आहे. तसेच 'अधून-मधून' हा त्याचा सटायरिकल कॉलम अनेक वर्ष लोकमतमधून प्रसिद्ध होता.



'बडी दिदी' या हिंदी पुस्तकाचा त्याने मराठीत 'लुका' या नावाने अनुवादही केलेला आहे. एकदा त्याला सार्क परिषदेसाठी स्व.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींबरोबर पाकिस्तानचा दौरा करण्याची संधी आली. त्या दौ-याचा वृत्तांत वाचून आपणच त्या दौ-यात आहोत असे वाटे. औरंगाबादला असताना त्याने 'परिवर्तन' या सामाजिक संस्थेमध्ये बरेच काम केले. प्रख्यात विचारवंत श्रीमती नलिनी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली विचारवेध संमेलन भरवण्यात त्याचा मोठा वाटा होता. या हरहुन्नरी तरुणाने 'दिवाळी पहाट' ही संकल्पना औरंगाबादला प्रथमच राबवली होती. मराठवाड्यातील लोकांना नामवंत कलाकारांचे कार्यक्रम ऐन दिवाळीत प्रथमच पाहायला/ऐकायला मिळाले.

मंत्रालयात असताना मी आणि माझ्या एकदोन सहकारी दुपारचा डबा माझ्या केबिनमध्ये खात असू. अतुल हा तसा स्टार झालेला पत्रकारही अनेकदा आमच्या मराठवाडी साधेपणाने आमच्यात येऊन जेवत असे. माझे 'टिकली तर टिकली' हे पुस्तक केवळ त्याच्या आग्रहामुळे प्रकाशित झाले. इतकेच नाही तर औरंगाबादला केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, प्रसिद्ध दिगदर्शक जब्बार पटेल यांच्या उपस्थितीमध्ये झोकात त्या पुस्तकाचा प्रकाशनसोहळाही केवळ अतुलमुळेच संपन्न झाला होता. त्याला सामाजिक कामाची खूप आवड आहे. त्याने प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णीबरोबर "स्पंदन" हे त्रेमासिक मिशन म्हणून चालवले. अलीकडे आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक पालकांना मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात यासाठी हे त्रेमासिक होते.




लोकमतच्या पोर्टलवर अनेक राजकीय नेत्यांच्या खुसखुशीत मुलाखती घेत असतो. मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्या बातमीमुळे पहिली ते चौथीतल्या मुलांना मोफत पुस्तके मिळाली..! आणि मतीमंद मुलांना ते मतिमंद असल्याचे प्रमाणपत्र सहजपणे उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला ते केवळ त्याच्या बातम्यांमुळे...

शोधपत्रकारितेत त्याने स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले असले तरी तो अनेकदा खूप सकारात्मक बातम्या पण करतो. त्याने आमच्या ऑफिसच्याही अनेक चांगल्या बातम्या दिल्याचे मला आठवते. एकदा आम्ही 'लोकराज्य' मासिकात बदल करून त्याचे रंगरूप बदलण्याच्या प्रक्रियेत होतो. कमी खर्चात चांगली छपाई व्हावी. म्हणून आम्हाला अंक खाजगी मुद्रणालयाकडून छापून घ्यायचा होता. पण त्याला परवानगी मिळत नव्हती. मी अतुलला सहज बोलताबोलता ही अडचण सांगितली. त्याने दुस-याच दिवशी लोकमतमध्ये बातमी टाकली 'आता लोकराज्यची रंगीत छपाई होणार!' आणि पुढे आपोआप आमचा मार्ग मोकळा झाला. लोकराज्य रंगीत होण्याच्या प्रवासातला अतुल एक मदतगार आहे.

दरवर्षी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्यावर्षीच्या बैठकीसाठी आम्ही सगळे औरंगाबादला गेलो, आणि सकाळीसकाळी लोकमतला एक बातमी आली. त्यावरून एकच गदारोळ सुरू झाला! त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते.




राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी यांच्या विभागाला मिळणारा निधी मराठवाड्यासाठी अजिबात खर्च केला नव्हता. काँग्रेसने मात्र, या मागास भागासाठी नियोजित असलेला पैसा खर्च केला होता. त्यादिवशी मंत्रिमंडळ बैठक जवळपास तीन तास याच विषयावर झाली. बैठकीत प्रचंड वादावादी झाली. सरकारने खुलासा दिला पाहिजे असा आग्रह तेव्हांच्या एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी धरला. तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पक्षाचा खुलासा सरकार कसे करेल? असे म्हणत राष्ट्रवादीची अडचण केली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांच्याकडील खात्यात असलेला नियोजित निधी मराठवाड्यासाठी खर्च करावा लागला. उजनी धरणाचे 26 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळण्याचा मार्गही त्याच बैठकीत मोकळा झाला.

अशी शोध पत्रकारिता करणारा, प्रसंगी सरकारला धारेवर धरणारा त्याचवेळी चांगल्या कामाचे मुक्तहस्ते कौतुक करणारा, दहा पीआयएल स्वतःच्या नावावर नोंद असलेला हा गुणी पत्रकार केवळ भाषिक मर्यादेमुळे मराठीत अडकला आहे. हेच काम त्याने इंग्रजीत केले असते तर तो राष्ट्रीय पातळीवर नक्कीच गेला असता. दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाही. ही रुखरुख मात्र मला नक्कीच राहील...

- श्रद्धा बेलसरे-खारकर

मो ९८६९३५७९११

Updated : 16 Nov 2021 7:06 AM GMT
Next Story
Share it
Top