फ्युचरीस्टिक !

फ्युचरीस्टिक !
X

सरकारी कार्यालयात अतिखडूस चेहरा असलेला एक ऑडिटर रेकॉर्ड तपासत होता. आपण सोडून जगातील सर्व चोर आहेत आणि त्यांना पकडण्याचे काम आपल्याकडे आहे असा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. मोठमोठ्या फाईली आणि रजिस्टर तपासून तो काही काही ठिकाणी पेन्सिलीने खुणा करून त्याच्याजवळच्या वहीत त्याच्या नोट्स घेत होता. त्याच्याबरोबरचे अजून चारपाच सहायक सरकारी कार्यालयातील पिवळसर पडलेले जीर्ण कागद तपासात होते. कार्यालयातील साहेब त्यांच्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यासह जातीने समोर उभे होते. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे तातडीने उत्तर देत होते. एरवी साहेबांचा कडक अरेरावी दाखवणारा, अधिकार गाजवणारा आवाज, आज मात्र एकदमच भिजलेल्या मांजरासारखा नरम पडला होता. साहेबांनी चंदू शिपायाला सांगितले,

अरे चंदू साहेबांना जरा आले घातलेला स्पेशल चहा घेऊन ये बर.”

हे ऐकून चंदू कॅन्टीनकडे न वळता साहेबांच्या चेहऱ्याकडे बघू लागला.

संतापलेले साहेब आपला राग आवरत चंदूला म्हणाले, “चंदू तुला चहा आणायला सांगितला आहे. तू माझ्याकडे का बघतो आहेस?”

त्यावर चंदू उत्तरला, “साहेब माफी करा. पण तुमच्या आवाजाला काय झाले. तब्येतपाणी बरी आहे ना ? हो. मी ठीक आहे. तू चहा आण. माझ्या आवाजाला ही काही झाले नाही.” त्यावर चंदू म्हणाला, “साहेब, नेहमी तुमचा आवाज वाघाच्या डरकाळी सारखा असतो. म्हणून समजेना.”

त्यावर साहेबांनी त्याला मध्येच थांबवत करारी आवाजात सांगितले.

“चहा घेऊन ये.” अन चंदू धावत निघाला.

वन विभागाने गेल्यावर्षी २ कोटी झाडे लावली. यंदा ६ कोटी झाडे लावली या सगळ्याचे ऑडीट करण्यासाठी ऑडीट पार्टी आज ऑफिसला येऊन धडकली होती. कागदपत्रे बघून समाधान न झाल्याने ऑडीटर म्हणाले, चला, तुम्ही कुठे झाडे लावली ती दाखवा ? त्यांची ही मागणी ऐकताच साहेबांचे हात पाय थरथरू लागले. पण त्यांना आधार देत एक बिलंदर अधिकारी साहेबांच्या कानात कुजबुजला, “साहेब तुम्ही केबिनमध्ये जा. मी सांभाळतो सगळे.”

ऑडीट पार्टीला घेऊन कार्यालयाचे अधीक्षक जंगलात गेले. तिथे असलेल्या घनदाट झाडीकडे बोट करून ते म्हणाले, ‘सर, ही पहा आमची वृक्ष लागवड. मोजून घ्या पाहिजे तितकी झाडे.’ तिथल्या एका भरदार बहरलेल्या पिंपळाच्या झाडाकडे बघून ऑडीटर म्हणाले, ‘अहो, हे झाड किमान ५० वर्षे जुने दिसते आहे. तुम्ही कसा काय ह्याच्यावर हक्क सांगता?’ त्यावर अधीक्षक म्हणाले, सर ! आमच्या साहेबांनी नवीन टेक्नोलॉजी आणली आहे. त्यामुळे झाड लावल्यावर वर्षभरातच ते एवढे मोठे दिसते आणि त्याला आपण खास खतपाणी घालतो.’

‘हे कसे शक्य आहे?’ ऑडीटर

‘साहेब, काहीही शक्य आहे. मी वनविभागातला अधिकारी आहे. मला समझते न यातले काय आहे ते. तुम्ही जसे आकडेमोडीत तरबेज आहात, तसे आम्ही झाडे लावण्यात.’ आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढत. त्याची काच पुसत ऑडीटर म्हणाले,पण मिडियामध्ये तर वेगळ्याच बातम्या येत आहेत.’

‘साहेब, ते लोक फार खोट्या बातम्या देतात.’

‘अहो, मी प्रत्यक्ष वाचले, टी.व्ही.वर ही बघितले, की तुमचे साहेब आणि मातोश्रीचे साहेब या दोघांनी जो सोनचाफा लावला होता. तो फुललाच नाही म्हणे. तिथे फक्त एक लाकडाची आधार लावलेली एक दांडकी शिल्लक आहे.’

त्यांचे वाक्य तोडत अधीक्षक म्हणाला, ‘साहेब फेक न्यूज आहे.’

‘अशी कशी फेक न्यूज असेल? मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले!’

‘अहो, त्याच्यावर एका कवीने एक कवितापण खूप आधीच लिहिलेली आहे.’

‘चाफा बोलेना, चाफा बोलेना I

चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ll

चाफा बोलेना....’

‘साहेब, हे खोट आहे.

या मिडिया वाल्यांना बातम्या मिळाल्या नाही की ते अशीच कशाचीही बातमी करतात.

पण चाफा फुलला नाही हे तर खरे ना ??

साहेब चाफा फुलला नाही. त्याला वेळ लागतो फुल यायला. एका वर्षात का फुल येतात. पण त्याचा दांडका शिल्लक आहे. त्याला आपण नाव कलम करून लावू .

पण असली हलकी फुलकी झाडे कशाला लावता

हो साहेब चुकी झाली पुढच्या वेळी दुरुस्ती केली जाईल .

आता बघा ना, आपण येथे किती झाडे लावली, हे खोटे आहे का ?

‘अहो, ही तर शंभरसव्वाशे झाडे असतील. तुम्ही तर कोटीचा हिशोब दाखविला आहे.’

‘साहेब, ती बोलायची पद्धत असते.’

‘अगदी देवाधिकांच्या काळापासूनची ही पद्धत आहे, साहेब. आता बघा आपण गड चढताना काय म्हणतो, ‘नवलाख पायरी गडाला !’आता सांगा, असतात का नवू लाख पायऱ्या गडाला ? नाही ना? तर.. नऊ लाख दगडाचे चिरे लागले गडाच्या पायऱ्या बांधायला असा त्याचा अर्थ असतो. आता झाडांचे पण असेच असते ना ? मोजा बर. एक एकेका झाडाची पान मोजा. लाखाचा आकडा जमतो आहे ना? झाला बरोबर हिशोब?’

संतापलेले ऑडीट म्हणतात. ‘तुम्ही फ्रॉड आहात. या योजनेत भ्रष्टाचार झालेला आहे. झाडे लावलीच नाहीत आणि खर्च मात्र करून ठेवला आहे. हे माझे ऑडीट ऑबजेक्शन मी दाखविणारच आहे.’

‘साहेब दाखवा, दाखवा, जरूर दाखवा. तुमचे काम तुम्ही निवांत करा. पण साहेब तुम्ही जरा पाणी पिता का घोटभर?

‘मी कामवर असताना पाणी ही पीत नाही.’

‘साहेब, तुम्ही कामावर आहात. पण कामाच्या जागेवर नाही. आपण जंगलात आहोत. घोटभर पाणी प्या आणि शिवाय जेवायची वेळही झाली आहे. भाकर तुकडा खाऊया. इथे जवळच आपल वन विभागाचे विश्रामगृह आहे.’

बरीच पायपीट करुन थकलेली ऑडीट पार्टी विश्रामगृहात पोहोचली.

त्या आलिशान विश्रामगृहामध्ये झणझणीत मटणाचा वास सुटला होता. गेल्यागेल्या सरबत, सुका मेवा आणि झणझणीत जेवणावर ताव मारतामारता अधिक्षक म्हणाले, साहेब काळजी करू नका. सगळी व्यवस्था होईल आणि तुम्ही काही चुकीचे करत नाहीत तुकाराम महाराजांनीच म्हणून ठेवले आहे की - एका बीजापोटी तरु कोटी कोटी!’

तसेच आहे हे. इतके वृक्ष लावले म्हणजे तेवढी बीजे. तीच पुढे या संख्येच्या कितीतरी असा फ्युचरीस्टिक विचार करूनच आम्ही थोडी बेताचीच झाले लावलीत या वर्षी. पण कुणाचे श्रम फुकट कशाला घ्यायचे म्हणून कंत्राटदाराचे सगळे पैसे चुकते करून टाकले बर, साहेब.’

......हळूहळू गेस्टहाउसमधील आलिशान दालनात सुस्ती, आणि निद्रा धुक्यासारखी उतरी लागली आणि कागदांवर ऑडीटर साहेबांच्या सह्या केंव्हा झाल्या त्यांनाही कळले नाही.

Updated : 17 July 2017 9:43 AM GMT
Next Story
Share it
Top