Home > श्रद्धा बेलसरे-खारकर > ढूंढते रहे जाओगे !

ढूंढते रहे जाओगे !

ढूंढते रहे जाओगे !
X

आज नेहमीप्रमाणे प्रधानजी राज्याची खबरबात घेण्यासाठी दरबारात गेले नाहीत तर त्यांनी त्यांच्या कचेरीतच सरदारांचा दरबार भरवला होता. नेहमी ‘राज्यात सगळे आलबेल आहे’ असे सांगणारे प्रधानजी आज मात्र चिंताग्रस्त दिसत होते. बैठकीतले वातावरण एकदम तंग होते. सरदारांसाठी मेजावर बिसलेरीच्या बाटल्या, वाफाळलेला चहा, बरोबरच चीझ-सँडवीच आणि सुका मेवाही ठेवलेला होता. पण प्रधानजींच्या चेहऱ्याकडे बघताच कुणाचीच सुका मेवा खाण्याची हिम्मत झाली नाही. टेबलावर फाईल, अहवाल, यांचे ढिगारे पडले होते. ते डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा लावून काहीतरी शोधात होते.

शेवटी सर्वांनाच असह्य झालेल्या शांततेचा भंग करत प्रधानजी ओरडले, ‘आज तुमच्यामुळे माझी नाचक्की झाली. तुम्ही आणलेल्या फाईलींवर मी गप्पगुमान सह्या करतो. पण तुम्ही मला तोंडघाशी पाडलेत ! तुम्हाला माहित आहे का, मी या ६ महिन्यात निवृत्त होणार आहे. पुढे तुमच्या या असल्या परफॉर्मंसमुळे एखाद्या आयोगावर/महामंडळावर माझी वर्णी लागेल, किती अवघड होईल ते?’

‘नाही हो, प्रधानजी. तुमचे रेकॉर्ड किती चांगले आहे ! पण आता नक्की काय झाले आहे ते कृपा करून सांगाल का?एकाने विचारले. तोंडावर आलेला राग कसाबसा आवरत ते म्हणाले, ‘अहो कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत तुम्ही चक्क ८१३ शेतकरी चक्क मुंबईत दाखविलेत ! कुठून आणलेत हे शेतकरी, जरा मला सांगा बरे !’ सगळे सरदार चिडीचूप झाले. उघडच होते, राज्याच्या राजधानीत शेती ?

नगरविकासाचे सरदार म्हणाले,८०० शेतकरी.’ त्यावर वित्त खात्याचे सरदार म्हणाले, ८०० नाही हो, ८१३.’ अहो तेच हो.’

‘अरे पण मला सांगा बाबानो, इथे राजधानीत शेती? कुणी केली होती तुमच्या....?’

‘नाही प्रधानजी. प्रश्न गंभीर आहे, मान्य ! पण एक उपाय काढता येईल. जरा हिशोब केला तर अल्पभूधारक म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला किमान १ एकर, नाहीतर गेला बाजार अर्धा एकर जमीन तरी त्यांच्या मालकीची दाखवावी लागेल.’

‘धन्य आहात. अहो, मुंबईत, जिथे पाय ठेवायला जागा नाही तिथे, शेतीसाठी एवढी ४०० एकर जमीन कुठून आणायची ?’

नगरविकासाचे सरदार, ‘तेच तर मी सांगतोय.’

‘इथे १० फूट जरी मोकळ्या जमिनीचा तुकडा असला तरी तो आम्हाला दिसतोच आणि आम्हाला दिसला नाही तर बिल्डर आम्हाला दाखवून देतोच.’

‘दररोज आमच्या कार्यालयात इतक्या बिल्डरांची वर्दळ असते, कोणीच कसे बोलले नाही?

हे ऐकून प्रधानजी संतापले, ‘गप्प बसा हो, तुमची चर्चा ऐकायला मी इथे थांबलो नाही.

आता मला सांगा हे शेतकरी दाखवायचे कुठे? सगळा मिडिया आपल्यावर हल्ला करतो आहे आणि खुद्द महाराजही नाराज झाले आहेत. आपल्याला कुठून तरी हे शेतकरी दाखवावेच लागतील.’ यावर सगळे डोक खाजवू लागले. फाईलचे गठ्ठे, laptop, tablet , अहवालांच्या गठ्ठ्यात ते उगाच शोधू लागले. इतक्यात महसूल सांभाळणाऱ्या सरदाराने इकडेतिकडे बघत दोन बदाम तोंडात टाकले त्यांच्याकडे बघून सर्वच जण सुक्यामेव्यावर तुटून पडले.

‘अरे सारखे काय खात बसता? कधी तरी काम करा,’ प्रधानजी वैतागले.

त्यावर नियोजन विभागाचा सरदार म्हणाला, आपण एखाद्या खाजगी संस्थेला हे सर्वे् करायचे काम देऊ. ते एका आठवड्यात त्यांच्या ४-५ टीम लावून सर्वे करून देतील. माझ्या ओळखीचे काही रिसर्च ग्रुप आहेत. त्यांना मी सांगू शकतो.’

‘अरे कसला रिसर्च घेऊन बसलात? ते सर्वेवाले आपलीच माहिती गोलगोल करून आपल्यालाच देतात.’

गृह खात्याचे सचिव म्हणाले, ‘खाजगी गुप्तहेराला हे काम देऊया. तो गाजावाजा न करता हवी ती माहिती आपल्याला देईल.’

कुठलेच महत्वाचे खाते नसलेले क्रीडा आणि युवक कल्याणवाले म्हणाले, एखाद्या कारकुनाला बळीचा बकरा बनवा आणि चूक झाली म्हणून त्याला निलंबित करा थोडे दिवस.’ मिडिया शांत होईल.

ही सगळी चर्चा ऐकून तिसऱ्या लेनमध्ये बसलेल्या सरदाराचा मदतनीस म्हणाला, प्रधानजी अभय द्यावे. माझ्याकडे एक कल्पना आहे.’

‘सांगा काय आहे ते, पण थोडक्यात.’

‘हो सांगतो.’ तो म्हणाला.

‘आपण जर शेतकऱ्यांची जसे अल्पभूधारक अशी व्याख्या केली आहे. त्यामध्ये बदल करू या. मोठे शेतकरी, छोटे शेतकरी, अल्पभूधारक आणि “अति अत्यल्पभूधारक” अशीही मांडणी करू.

म्हणजे बघा मुंबईसारख्या महानगरात अनेक जण आपल्या घराच्या गॅलरीत झाडे लावतात त्याला फुले येतात. त्याला आपण फुलशेती म्हणू या. काही ठिकाणी गच्च्यावर भाजीपाला लावतात. तर काही ठिकाणी फळेही लावलेली मी बघितली आहेत. कृषी विभागाचे सरदार म्हणाले, ‘हे शक्यच नाही. मुंबईमध्ये फळ येणे शक्यच नाही.’ त्यांना मध्येच थोपवून, प्रधानजी म्हणाले, “हा तरुण मुलगा बोलतोय ते खरे आहे. माझ्याही घरात मागच्या गॅलरीत मिरच्या आल्या आहेत आणि २-३ वांगी ही लागली आहेत. नरीमन पॉईंटच्या एका मित्राच्या ऑफिसच्या गच्चीत छोट्या झाडाला लिंबेही लागलेली मी पाहिली आहे. आपण ४ कोटी झाडे लावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या छोट्यामोठ्या झाडांचा हिशोबसुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. मग प्रधानजीसह सर्व सरदारांना आपल्या गॅलरीत असलेल्या बागांची आठवण झाली.

आनंदीत होऊन प्रधानजी म्हणाले, तरुण मुला, तू अत्यंत बुद्धिमान आहेस. ‘आता मला सांग या तुझ्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची?'

सोपे आहे सर, त्यांच्या कुंड्या नव्या करून दिल्या असे दाखवायचे. तसेच किटकनाशाके वाटली, खते वाटली आणि पाणीपुरवठा करायचा, गॅलरीला जाळी लावली. सर, खर्च करायचा असेल तर कसाही करता येतो आणि खर्च न करता तो कागदावर दाखवताही येतो. तसा आपण दाखवू या.

आणि मग एकदम बैठकीचा नूर पालटला. बँकेचे कर्ज घ्यावे लागावे इतका खर्च गॅलरीतला बागेवर झाला असे दाखवायच्या एकेक भन्नाट कल्पना पुढे येऊ लागल्या. निर्भय होऊन सर्वांनी मग आपल्या समोरील डीश जवळ ओढल्या आणि गरम चहाचे घुटके घेत दरबारातील बैठक ‘पारंपारिक पद्धतीने’ सुरु झाली. सर्वच जण अत्यल्प अल्प-भूधारक शेतकऱ्याची परिभाषा करण्यात गुंतून गेले.

- श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 8 July 2017 7:22 AM GMT
Next Story
Share it
Top