Home > News Update > आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरु असतांनाच बोरीवलीच्या तहसीलदारांवर निवडणुकीची जबाबदारी, राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरु असतांनाच बोरीवलीच्या तहसीलदारांवर निवडणुकीची जबाबदारी, राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

While the Economic Offences Wing investigation is underway, the Borivali Tehsildar has been given election duties; the NCP demands action.

आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरु असतांनाच बोरीवलीच्या तहसीलदारांवर निवडणुकीची जबाबदारी, राष्ट्रवादीची कारवाईची मागणी
X

मुंबई : बोरीवलीचे तहसलीदार तथा पदोन्नतीनं उपजिल्हाधिकारी झालेल्या इरेश गंगाराम चप्पलवार यांची आर्थिक गुन्हेशाखेकडून चौकशी सुरु असतांना त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी देण्यात आलीय. त्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते सुनील माने यांनी केलीय.

बोरीवलीचे तहसलीदार चप्पलवार यांची मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केलीय. त्यामुळं निवडणूकांमध्ये चप्पलवार यांच्याकडून नि:पक्षपातीपणे काम होईल का, अशी शंकाही सुनील माने यांनी उपस्थित केलीय.

तहसीलदार चप्पलवार यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. अशावेळी त्यांना कुठल्याही पदावर न ठेवता, चौकशी करणं अपेक्षित होतं. मात्र, तरीही चप्पलवार हे मुंबईतल्या बोरिवली इथं तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. शिवाय त्यांच्याकडे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा पदभारही सोपविलाय. विशेष म्हणजे २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतही चप्पलवार यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. आर्थिक गुन्हे शाखे सारख्या संस्थेकडून भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्याची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्हं उभं करणारीच होती, अशी प्रतिक्रिया माने यांनी दिलीय.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार इतकं मेहरबान का झालंय ? असा सवाल सुनील माने यांनी उपस्थित केलाय. महायुती सरकारनं भ्रष्ट कारभाराला अभय देण्याचचं धोरण ठरवलंय. अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकारी सरकारलाही जुमानत नाहीत. कारण या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय की, जिथं भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होत नाही, तिथं हे सरकार आपल्याला संरक्षण देईल, अशीच मानसिकता तहसीलदार चप्पलवार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची झालीय, अशी टीकाही माने यांनी केलीय.

कित्येक वर्षानंतर महापालिकेच्या महत्त्वाच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केलेली आहे. या निवडणूकीत लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच शक्य तेवढ्या गैरप्रकाराचा वापर करुन निवडणूका जिंकण्याचा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा प्रयत्न दिसतोय. त्याचाच एक भाग म्हणून बोरीवलीचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्याकडे पाहता येईल, अशी टीकाही सुनील माने यांनी केलीय. आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु असलेल्या चप्पलवार सारख्या अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करण्याऐवजी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं त्यांना आपल्या पदराखाली घेतलंय. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अशी अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्याची गरज आहे. नाहीतर चप्पलवार यांनी नोकरीचा राजीनामा देऊन थेट भाजप कार्यकर्ता म्हणून काम करावं, अशी टीकाही सुनील माने यांनी केलीय.

राज्यातल्या २९ महापालिकांमध्ये सध्या निवडणूका सुरु आहेत. त्यामुळं भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इरेश चप्पलवार यांच्यासारखे किती अधिकारी भाजपनं निवडणूकीच्या कामात पेरलेले आहेत, याची तपासणी करण्याची मागणीही सुनील माने यांनी केलीय.

EOW कडून चौकशी सुरु आहे म्हणजे कारवाई सुरु आहे – संजय उपाध्याय, आमदार, बोरीवली

निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचा आरोप असलेले तहसीलदार इरेश चप्पलवार यांची निवडणूक अधिकारी म्हणून का केली ? यावर मी बोलू शकत नाही. त्याविषयी निवडणूक आयोगच बोलू शकेल. मात्र, ज्याअर्थी चप्पलवार यांची EOW कडून चौकशी सुरु आहे, त्याअर्थी कारवाई सुरु आहे.

Updated : 22 Dec 2025 9:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top