चेंबूरच्या श्री नारायण मंदिर समितीचे गरीब वस्तीतील शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
X
चेंबूर मुंबई येथे गेल्या ६१ वर्षांपासून शैक्षणिक कार्य करीत असलेल्या श्री नारायण मंदिर समितीचे गोरगरीब, उपेक्षित व कनिष्ठ मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य कौतुकास्पद असून समाजाला गरीब विद्यार्थ्यांना शिक्षित करणाऱ्या अश्या संस्थांची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.
राज्यपालांच्या उपस्थितीत चेंबूर मुंबई येथील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन संस्थेच्या चेंबूर येथील श्री नारायण शिक्षण संकुल परिसरात रविवारी (दि. १८ मे) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री नारायण मंदिर समिती विश्वस्ततेच्या भावनेने कार्य करीत असल्याबद्दल अभिनंदन करताना संस्था आज नऊ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच तंत्र शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. श्री नारायण गुरु यांनी जातीभेद व धर्मभेद विरहित समाजाची संकल्पना मांडली व समतेचा पुरस्कार केला. त्यांची शिकवण अंगिकारली तर आपण निश्चितपणे अधिक प्रगती करु असे राज्यपालांनी नमूद केले.
नारायण गुरूंसारखे प्रागतिक विचारांचे समाजसुधारक संत निर्माण झाले नसते तर केरळमध्ये सनातन धर्म टिकला नसता. ज्या - ज्या वेळी सनातन धर्म संकटात आला आहे, त्यावेळी केरळ राज्य मदतीला धावून आले आहे असे सांगून राज्यपालांनी कालडीच्या आदी शंकराचार्यांच्या कार्याचा उल्लेख केला.
भारत समर्थ आणि संपन्न झाला तर तो स्वतःसोबत जगाचे कल्याण करील असे सांगून कोविड लस भारताने केवळ स्वतःपुरता निर्माण न करता ती अनेक देशांना मोफत वाटल्याचे राज्यपालांनी सांगितले. पाश्चात्य देशांनी लस निर्मिती केली असती तर लसीच्या किमती फार मोठ्या राहिल्या असत्या व कंपन्यांनी लाखो करोडो रुपये कमावले असते, असे त्यांनी सांगितले.
श्री नारायण मंदिर समिती शिक्षण संस्था चेंबूर परिसरात गेल्या सहा दशकांपासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची व्यवस्था करीत असून आपले वडील दीना बामा पाटील यांच्यापासून आपण संस्थेसोबत कार्य करीत आहो असे सांगताना या संस्थेच्या कार्यातून इतर शैक्षणिक संस्थांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन खासदार संजय दीना पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या आवारातील श्री नारायण गुरु मंदिरात जाऊन नारायण गुरूंची आरती पूजा केली.
संस्थेचे महासचिव ओ के प्रसाद यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष एम आय दामोदरन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाला श्री नारायण मंदिर समितीचे चेअरमन एन मोहनदास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू, इतर पदाधिकारी तसेच शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते.