Home > Top News > “प्रस्थापितांविरोधात आवाज करायचा म्हटलं, की दडपशाही आलीच” कॉम्रेड नारकर धमकी प्रकरण

“प्रस्थापितांविरोधात आवाज करायचा म्हटलं, की दडपशाही आलीच” कॉम्रेड नारकर धमकी प्रकरण

“प्रस्थापितांविरोधात आवाज करायचा म्हटलं, की दडपशाही आलीच” कॉम्रेड नारकर धमकी प्रकरण
X

मी लहान, म्हणजे साधारण १६-१७ वर्षांचा होतो, तेव्हाची एक आठवण. मी तेव्हा कोल्हापुरातल्या एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात होतो. आमचं हे कॉलेज जरा विचित्र होतं. कोणी विद्यार्थी गैरहजर राहिला, किंवा प्राचार्यांच्या मनात आलं, की मुलांना दंड व्हायचा. उगीचच. १० रुपयांपासून दंड गोळा केला जायचा. मग या दंडाची नोंदणी कॉलेजच्या ऑफिसात वर्षभर केली जायची. आता हे असलं ॲडिशनल काम करायला कोणाला वेळ असायचा कुणास ठाऊक..! पण कुणीतरी हे काम नेटानं करायचं. वर्षाच्या शेवटी कोणाच्या दंडाची किती रक्कम आहे, असलं गणपती वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळासारखं कॉलेजचा स्टाफ काम करायचा. बारावीमध्ये मी असताना हे जरा अतीच झालं होतं. ज्यांनी कुणी दंड भरला नाही, त्यांना बारावीच्या परीक्षेला बसायला लागणारं हॉल तिकिट मिळणार नाही असं प्राचार्यांनी चक्क जाहीर करून टाकलं. आमच्या दृष्टीनं हा सरळसरळ भ्रष्टाचार होता. फी भरायची आणि वर कॉलेजला आलं नाही, उशिरा आलं म्हणून आर्थिक दंडही सोसायचा? कुठल्या नियमात हे बसत होतं? मी म्हटलं आपण संप करूया. वर्गातल्या पोरापोरींनी तयारी दाखवली आणि त्या कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी संप केला. जोपर्यंत प्राचार्य आम्हाला हॉल तिकिटं देणार नाहीत, तोपर्यंत वर्गात बसणार नाही अशी आमची भूमिका होती. प्रशासनानं नेहमीप्रमाणं साम-दाम-दंड-भेद या प्राचीन नियमानुसार आम्हाला वठणीवर आणायचं ठरवलं होतं.

एके दिवशी आम्ही कॉलेजच्या गेटवर उभे होतो. सगळा वर्ग. मग सीनियर कॉलेजमधली काही पोरं आली. मी त्यांना ओळखत होतो. काही तर “मित्र” होते. पण त्या पोरांनी मला साईडला घेतलं आणि भयानक दम दिला. एकानं माझे दोन्ही हात एकमेकांवर दाबून धरले आणि धमक्या दिल्या. म्हणजे त्या दिवशी मी जिवंत घरी जाईन का नाही इतका मी घाबरलो होतो. माझा तत्कालीन मित्र नासीर शेख बसमधून घरापर्यंत मला सोबत करायला आला होता. त्यानंतर पुढचा अख्खा दिवस मी घामेघूम अवस्थेत काढला. त्यादिवशी आई विद्यापीठातून परत आल्यावर मी तिला झाला प्रकार सांगितला. मला वाटलं आई जरा सांत्वन वगैरे करेल. पण तिनं मला परखडपणे सांगितलं, “प्रस्थापितांविरोधात आवाज करायचा म्हटलं, की दडपशाही आलीच. ते गुंड घालणार. मारहाण करणार. संप वगैरे करायची खुमखुमी असेल, बंडखोरी करायची हौस असेल, तर हे असलं सगळं सहन करायची तयारी असायला हवी” या आशयाचे डोस तिनं माझ्या नरड्यात कोंबले होते. तेव्हा ते झोंबलं होतं. पण मोठं होत होताना अनेक वेळेला आईच्या त्या शब्दांचा प्रत्यय मला अनेक वेळा यायचा. अर्थातच मी तसा घाबरट स्वभावाचा असल्यामुळं आपल्याला हे असलं काही झेपणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. तो माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा संप.

दादू म्हणजे माझा सगळ्यात मोठा भाऊ, अमित - त्यानं त्याच्या कॉलेजमध्ये प्राचार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून आंदोलन केलं होतं. तेव्हा तो १८-१९ वर्षांचा आणि मी १०-११ वर्षांचा असेन. त्याला मारायला रात्री २०-२५ पोरं आई-बाबा घरी नाहीत हे बघून घरी आली होती. आई आणि बाबा - दोघांनाही अनेकदा गुंडगिरीचा सामना करायला लागला आहे. एकदा एका संस्थाचालकानं आईला आणि तिच्यासोबत असलेल्या प्राध्यापकाला त्याच्या कॉलेजच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि तऱ्हेतऱ्हेच्या धमक्या दिल्या होत्या. आम्ही कोल्हापुरातल्या रांगड्या संस्कृतीत वाढलो असल्यानं खेळ, नाटक, गाणं याचसोबत बडवून काढू, मारून टाकू, मुलांना उचलून नेऊ - अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी धमक्या ऐकायचं बाळकडूही आम्हाला मिळालं होतं.

याची मला आज इतकी प्रकर्षानं जाणीव झाली कारण, तीन दिवसांपूर्वी माझे वडील (ज्यांना मी समानतेच्या तत्वावर ए बाबा म्हणतो) कॉम्रेड उदय नारकर यांना फोनवरून धमक्या यायला सुरुवात झाली. गेल्या महिन्यात आमचे जवळचे मित्र, कॉम्रेड सुभाष जाधवना हार्टॲटॅक आला आणि ते अचानक गेले. त्यांच्या जाण्याच्या दुःखात आम्ही सगळे असताना बाबावर एक जबाबदारी येऊन पडली. एका खाजगी कारखान्याची. हा कारखाना गेली अनेक वर्षं या ना त्या कारणानं चर्चेत आहे. बऱ्याच जणांनी मिळून हा बुडवला. मग कामगारांनीच पुढाकार घेऊन हा कारखाना चालवला. आता तो एका खाजगी कंपनीनं चालवायला घेतला आहे. कॉम्रेड सुभाष जाधव या कारखान्याच्या कामगार युनियनचं काम बघायचे. पण ते गेले आणि ती जबाबदारी बाबाकडं आली.

गेला एक महिना हाच विषय सुरू आहे. कामगारांची वेतन श्रेणी, कामाचे तास, सु्ट्ट्यांचे दिवस, बोनस, हे तर दूरच पण शिफ्टवरच्या कामगारांना घालायला हेल्मेट आणि बूटसुद्धा द्यायला हे व्यवस्थापन तयार नव्हतं. तर अशा अनेक कारणांमुळं गेले काही आठवडे कारखान्याचं व्यवस्थापन, कामगार, माझा बाबा, त्याचे सहकारी कॉम्रेड आबासाहेब चौगुले, जिल्हाधिकारी, आयुक्त अशा विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होती. याचा उद्देश एकच होता. हा तिढा लवकर सुटून कारखाना सुरू व्हावा. म्हणजे याच्याशी जोडले गेलेले सगळे घटक - शेतकरी, मजूर, वाहतूकदार, गाडीमालक, कामगार या सगळ्यांचं होणारं आर्थिक नुकसान थांबेल. पण काही लोकं आहेत, ज्यांना हे व्हायला नको आहे.

३१ तारखेला, म्हणजे शुक्रवारी मी माझ्या वाढदिवसाची मटण बिर्याणी बनवत असताना बाबा याच संदर्भात पुण्याला गेला होता. त्याला त्या दिवशी काही फोन्स आले. एक इसम जरा आक्रमकपणे बोलत होता. त्याची समजूत काढत, तो अजून चिडू नये म्हणून बाबानं त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण काय उपयोग..! तसं मी एरवी त्याच्या कामात लक्ष घालत नाही. पण मला जरा वाईटच वाटलं. म्हणजे मी पाहुण्यांबरोबर बिर्याणी हादडतोय आणि माझा बाप संपूर्ण प्रवासात ही असली भाषा ऐकतोय. पण हा असला विषय नेहमीचाच असल्यानं बिर्याणीच्या चवीपुढं तो फिका पडला. हा होता शुक्रवार. शनिवारी दुपारी पुन्हा फोन्स. याखेपेला भाषा अजून जास्त अर्वाच्च आणि आक्रमक. पण माझा बाप तरीही त्या बोलणाऱ्या माणसाला समजावूनच सांगत होता. माझा संतापानं तिळपापड होत होता. का एवढं सौम्य बोलायचं असल्या माणसांबरोबर? मी असतो, तर ये इकडं, मी सुद्धा बघतो तू काय करतोयस असं कायतर बोलून मोकळा झालो असतो. पण हाच फरक असतो, सामान्य माणसांमध्ये आणि आयुष्य कॉम्रेड म्हणून काढणाऱ्या लोकांमध्ये. ते व्यक्तिगत अपमान, हेवेदावे, कोण मला काय बोललं या गोष्टींचा बाऊ न करता तत्वानुसार, इतरांच्या हितासाठी जे करणं गरजेचं असतं ते करतात. त्या माणसानं आबांनाही फोनवर धमक्या दिल्या पण त्यांची भाषाही सौम्यच. “तू इकडं ये, आपण बोलू. उगाच कशाला डोक्यात जाळ करून घ्यायलायस वगैरे…” असो.

तर अनेक धमक्यांचे अनेक फोन झाल्यानंतर रात्री कारखान्याच्या एका कामगाराचा फोन आला, “सर, तुमच्या घराकडं तो माणूस उद्या सकाळी येणार आहे. दोन गाड्या भरून माणसं आणणार आहे. काळजी घ्या. आम्हीही येतो.” पण बाबानं त्यांना “तुम्ही कशाला येताय? ते आले तर आम्ही बघून घेऊ” असं सांगितलं. त्या रात्री मलाच नीट झोप लागली नाही. पण बाबा घोरत झोपला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन. दोन गाड्या तुमच्या घराच्या दिशेनं निघाल्या आहेत. आम्हीसुद्धा येतोय. माणसं लागणार. पण मग आम्हीच लावून धरलं म्हणून बाबानं पोलिसांना कळवलं. लगेच पोलीस आले. आम्हाला दिलासा देऊन गेले. तोपर्यंत आमचे काही मित्रही दारात उभे राहिले होते. राज साळोखे, पंकज, चंदू, सुरेश, लिंगू आणि इतर काही पार्टी कॉम्रेड आणि जुने मित्र. आलीच माणसं तर बघू काय करायचं! तोपर्यंत एक जीपसारखी गाडी कोपऱ्यावरून चकरा मारत होती. राजनं त्या गाडीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण ती गायब झाली.

काही वेळात पोलीस स्टेशनवरून फोन आला, की ती माणसं तिकडं गेली आहेत. बाबाही तिथंच होता. त्यानं सकाळी नाश्ता केला नव्हता. त्याला डायबटीस आहे, जानेवारीत हार्ट ॲटॅक येऊन गेलेला. गोळ्याही खाल्ल्या नव्हत्या. मी सगळ्यांबरोबर बाबाचा नाश्ता आणि गोळ्या घेऊन राजच्या गाडीवरून गेलो. पोलीस स्टेशनच्या बाहेर भलीमोठी गर्दी. कडक इस्त्री, डोळ्यावर रेबॅन, सहा-साडेसहा फूट उंचीची बरीच भीतीदायक माणसं तिथं होती. सुदैवानं मी कोण हे त्यांना माहित नव्हतं, त्यामुळं त्यांच्यातूनच वाट काढत मी आत गेलो. तिथं शिवसेनेचे विजय देवणे यांच्याशी ओळख झाली. बाबाला धमकी देणारा माणूस येणार हे कळताच तेही आले होते. मग बाबाला नाश्ता आणि गोळ्या देऊन मी बाहेर.

बाहेर आलो तसे मला माझे काही जुने मित्र भेटले. झाला प्रकार बघून तिथं आले होते. आदित्य, संग्राम, रणजीत माजगावकर, वगैरे. आधी एबीपी माझाला रिपोर्टिंग करायचे. आता सामबरोबर असतात. तर एक माणूस त्यांच्याशी चर्चा करत होता. मी आपलं शांतपणे ऐकत होतो. नंतर मला समजलं, की हा माणूस कारखाना चालवायला घेणारा माणूस होता आणि नुकताच आतमध्ये माझ्या बाबाला पोलिसांसमोर धमकी देऊन आला होता. पोलिसांनी त्याला बाहेर काढलं होतं. असो. तोपर्यंत रायट पोलिसांची एक तुकडी बसभरून आली आणि त्या माणसासोबत आलेल्या शंभरेक लोकांनी लगेच कलटी मारली. हाच फरक असतो. कॉम्रेड लोकं कलट्या मारत नाहीत. ती हसतमुखानं गप्पा मारत बसतात. बाबानं एफआयआर केला आणि तो बाहेर आला. मग आम्ही सगळे घरी.

आता सगळा मामला पोलीस, प्रशासन, कलेक्टर वगैरे लोकांच्या हातात आहे. पण काल मला पोलिसांच्या वागणुकीवरून चांगलाच दिलासा मिळाला. अतिशय प्रोफेशनल वागणं, चांगली भाषा, संयम, बोलण्यात एक क्लॅरिटी… आमचे आजपर्यंतचे पोलिसांबद्दलचे अनुभव काही फारसे बरे नाहीत. पण हे नवे पोलीस बघून बरं वाटलं. त्यातली बरीच तर शेतकऱ्यांची पोरं. त्यातल्या एका साहेबांना घरची चकली दिली. त्यांच्याशी गप्पाही मारल्या. मस्त वाटलं. अर्थात हे सगळे पोलीस पुढं हे सगळं कसं हाताळतात हे बघणंही महत्त्वाचं. असो.

मला हे सगळं का लिहावंसं वाटलं? तीन कारणं आहेत. एक म्हणजे बरेच लोकं फोन करून विचारतायत, “बाबा/कॉम्रेड/सर ठीक आहेत ना? आता काही प्रॉब्लेम नाही ना? नेमकं काय झालं? आम्ही येऊ का?” सगळ्यांना हे सगळं फोनवरून सांगणं शक्य नाही. आपल्या मित्रांना, आप्तांना, हितचिंतकांना हे कळावं हे एक कारण. दुसरं म्हणजे बाबाला धमकावणाऱ्यांना हे कळावं, की कॉम्रेड लोकांना या असल्या धमक्यांचा काहीही फरक पडत नसतो. माझ्या भावाला कधी पडला नाही, आईलाही नाही आणि बापाला तर नाहीच नाही. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ही माणसं आपलं ठरवलेलं काम करतायत. त्यांनी इमर्जन्सीतली दडपशाही, अनेक दंगली, शैक्षणिक क्षेत्रातले गुंड, दारुडी माणसं, राजकीय संघर्षातली मारहाण, खून-बलात्काराच्या धमक्या, ब्रेनस्ट्रोक, हार्ट ॲटॅक, कॅन्सर, डायबटीसही पचवलेले आहेत. या असल्या धमक्यांचा त्यांच्यावर काय परिणाम होणार? तिसरं कारण म्हणजे राजकारणातले सहकारी आणि मित्र, हे सगळं कळताच बाबाबरोबर उभे राहिले. कॉम्रेड्स, इतर पक्षांमधले मित्र. नारकर सरांना धमकी येते म्हणजे काय..! असाच काहीसा सूर सगळ्यांचा होता. खूप बरं वाटलं. की पार्टीत नसली, तरी कोल्हापूरची माणसं वेळ आली, की आपल्या माणसांसोबत उभी रहातात. कम्युनिस्टही तसेच. मग शंभरजण येऊंदेत, नायतर दोनशे.

तर यानिमित्तानं मला हे सांगावंसं वाटतं, की मला नेहमी वाईट वाटत असतं, की आपल्यात आपल्या आईबापाची धमक नाही. पण आज मला अभिमान आहे, की कितीही धमक्यांचे फोन आले, माणसं चालून आली, तरी आम्ही योग्य जे आहे, तेच करू असं सौम्य शब्दांमध्ये पण ठामपणे सांगणाऱ्या आपल्या बापाचा आणि होऊ दे काय व्हायचंय ते, बघू आपण असं म्हणणाऱ्या आईचा..!

नीरज नारकर

(लेखक)

(साभार - सदर पोस्ट नीरज नारकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 4 Nov 2025 4:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top