Home > News Update > BMC Elections : रामदास आठवले नाराज, महायुतीच्या जागावाटपावरून RPI नेत्याचा 'विश्वासघात'चा आरोप

BMC Elections : रामदास आठवले नाराज, महायुतीच्या जागावाटपावरून RPI नेत्याचा 'विश्वासघात'चा आरोप

BMC Elections : रामदास आठवले नाराज, महायुतीच्या जागावाटपावरून RPI नेत्याचा विश्वासघातचा आरोप
X

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीत मोठा वाद निर्माण झाला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (RPI - आठवले गट) चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जागावाटपावरून BJP भाजप आणि Shivsena शिंदे गटाच्या शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याला 'विश्वासघात' आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानावर आघात असल्याचे म्हटले आहे.

आठवले यांनी सोशल मीडियावर(Xवर)पोस्ट करून म्हटलं आहे की,

"महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल."

दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून मुंबईत रिपाईला सन्मानजक जागा सोडल्या जातील, असे सांगितले होते. रिपाई हा महायुतीमधील महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

मात्र, काल रात्री शिवसेना आणि भाजपचे जागावाटप जाहीर झाले. यामध्ये भाजप 137 आणि शिंदे गट 90 अशी वाटणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये रिपाईला सोडण्यात आलेल्या जागांचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे आता रामदास आठवले यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता भाजप आणि शिंदे गट काय तोडगा काढणार, आपल्या कोट्यातून रिपाईला आयत्यावेळी जागा सोडणार का, हे आता पाहावे लागेल.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत असताना महायुतीतील हा वाद निवडणुकीच्या रणनीतीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, विरोधी आघाडीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे युती करून लढत असून, त्यांच्यातील जागावाटपही अंतिम टप्प्यात आहे. बीएमसी निवडणुकीत महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंच्या युतीची थेट लढत अपेक्षित असताना आठवले यांची नाराजी महायुतीला महागात पडू शकते.

Updated : 30 Dec 2025 3:14 PM IST
Next Story
Share it
Top