डॉ. उमेश कांबळे यांची असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेचे अध्यक्षपदावर नियुक्ती
X
मुंबई/नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२५ – देशातील सर्वोच्च व्यावसायिक संस्था असोचॅमने खाद्यतंत्रज्ञान तज्ज्ञ आणि पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक डॉ. उमेश मुंजाजी कांबळे यांची २०२५-२६ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निर्मल के. मिंडा यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. कांबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र दिले. या नियुक्तीसह डॉ. कांबळे हे असोचॅमच्या राष्ट्रीय व्यवस्थापन समितीचेही सदस्य राहतील.
असोचॅमने डॉ. कांबळे यांच्याकडे वर्षभरात किमान चार परिषद बैठका घेणे, महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्राला मजबूत करणारी धोरणपत्रे व ज्ञान-अहवाल तयार करणे, मोठ्या परिषदा व सेमिनार आयोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यां-मंत्र्यांसमोर उद्योगांच्या हितांचा पुरस्कार करणे तसेच परिषदेच्या विविध उपक्रमांसाठी निधी उभारणी करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
नियुक्ती स्वीकारल्यानंतर डॉ. उमेश कांबळे म्हणाले, “असोचॅमच्या या मोठ्या व्यासपीठावरून मी महाराष्ट्राला देशातील सर्वात गुंतवणूक-स्नेही आणि नाविन्यपूर्ण राज्य बनवण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे. खाद्यसुरक्षा, अन्नप्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शेतकऱ्यांना बळ देण्याबरोबरच अन्नकचरा शून्याकडे नेण्याचा प्रयत्न करेन. विकसित भारत २०४७ चे स्वप्न महाराष्ट्रातूनच साकार करायचे आहे.”
डॉ. कांबळे यांच्याकडे खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील २१ वर्षांचा अनुभव असून ते सध्या एफटूएफ कॉर्पोरेट कन्सल्टंट्स प्रा. लि., वेस्ट टू बेस्ट एन्व्हायरो इंजिनिअरिंग एलएलपी, फूडटेक पाठशाला प्रा. लि. या कंपन्यांचे संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी एसजीएस इंडिया, रिलायन्स रिटेल आणि गोडरेज अॅग्रोव्हेट येथे वरिष्ठ पदांवर काम केले आहे. २०२३ साली त्यांना एएफएसटीआय-एफएसएसएआय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील उद्योग, अन्नप्रक्रिया आणि स्टार्टअप क्षेत्रातून डॉ. उमेश कांबळे यांचे मोठ्या उत्साहात अभिनंदन होत आहे.






