२३ वर्षीय खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी, तुर्भ्यातील क्रिकेटपटू किशोरचे निधन
सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
X
नवी मुंबई : तुर्भेमध्ये जुन्या वादातून क्रिकेट बॅट व फायबर रॉडने तीन तरुणांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किशोर वरक (२३) या तरुणाचा पाच दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच दिवसांपासून वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये किशोर याच्यावर उपचार सुरू होते, मात्र रविवारी (१२ ऑक्टबर २०२५) त्याची प्राणज्योत मावळली. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी या मारहाण प्रकरणात अटक केलेल्या ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे.
८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री तुर्भे सेक्टर-२१ येथे ही घटना घडली होती. जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने विक्रम ऊर्फ विकी पाटील याने आशुतोष धुर्वे याला आपल्या घरी बोलावले होते. त्यानुसार, आशुतोष हा किशोर वरक आणि विकी कांबळे या मित्रांसह विक्रम पाटील याच्या घरी गेला होता. त्यावेळी विकी पाटील, त्याची पत्नी चारुशिला तसेच त्याचे मित्र संकेत लाड, ओंकार वाघमारे, वेदांत ऊर्फ विश्वेश घरत, झकील शेख, मौलाली ऊर्फ मौला भंडर व इतरांनी या तिघांवर क्रिकेट बॅट, फायबर रॉड आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात किशोर वरक गंभीर जखमी झाला होता, तर आशुतोष धुर्वेचा हात फॅक्चर झाला आणि विकी कांबळेच्या बरगड्यांना दुखापत झाली होती.
त्यातील किशोर याच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या मारहाण प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यावर पोलिसांनी विक्रम पाटील, संकेत, वेदांत ऊर्फ विश्वेश (२२), झकील (१९), मौलाली (२६) व मौला नबीलाल मकरंद (२६) यांना अटक केली होती. मात्र, रविवारी किशोचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
किशोरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याच्या उपचारासाठी मित्रपरिवार व समाजातील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी सढळ हस्ते त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतही केली; परंतु रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाल्याने त्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले.
मूळचा संगमेश्वर तालुक्यातील आंबेड गावचा रहिवासी असलेला किशोर तुर्भ सेक्टर-२१ मध्ये आई, वडील, भाऊ व त्याची पत्नी यांच्यासह राहत होता. तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. एका प्रतिभावान क्रिकेटपटूला केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.