कोण आहेत सुनेत्रा पवार ?
X
Ajit Pawar अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांची जागा कोण घेणार? अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे ते म्हणजे दिवंगत अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत. सुनेत्रा पवार गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची ओळख फक्त अजित पवार यांच्या पत्नी किंवा पवार कुटुंबातील सून म्हणून मर्यादित नसून त्यांची स्वतंत्र आणि सक्षम अशी ओळख समाजकार्यात आहे. समाजकार्यात, पर्यावरण क्षेत्रात त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. सुनेत्रा पवार यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असा क्षण असणारेय. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार कोण आहेत त्यांचे राजकारणाविषयी काय विचार आहेत जाणून घेऊयात.
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३, धाराशिव/उस्मानाबाद मध्ये झाला. या महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) राज्यसभा खासदार असून, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज (३१ जानेवारी २०२६) त्यांचा शपथविधी होणार आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी म्हणून त्या ओळखल्या जातात, पण त्यांचा स्वतंत्र सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय प्रवास खूपच प्रभावशाली आहे. महाराष्ट्रात लोक त्यांना प्रेमाने "वाहिनी" म्हणून संबोधतात. सुनेत्रा पवार यांचा जन्म एका शेतकरी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्थानिक राजकीय नेते होते. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी राज्य मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत. १९८५ मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. या लग्नामुळे त्या पवार कुटुंबात आल्या, जिथे शरद पवार यांचा प्रभाव आहे.
त्यांना दोन मुले आहेत:
पार्थ पवार – राजकारणात सक्रिय, बारामतीतून लोकसभा निवडणुक लढवलेले.
जय पवार – कौटुंबिक व्यवसाय सांभाळतात.
शिक्षण आणि व्यावसायिक पार्श्वभूमी
सुनेत्रा पवार यांचे शिक्षण बी.कॉम. पर्यंत झाले आहे. त्यांनी शेती, उद्योग आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क आणि बारामती टेक्सटाईल कंपनी च्या चेअरपर्सन आहेत. तसेच एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) या संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
सामाजिक आणि पर्यावरणीय कार्य
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण, सेंद्रिय शेती, ग्रामीण विकास आणि महिला सशक्तीकरणावर भर दिला. त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या माध्यमातून:
इको-व्हिलेज संकल्पना रुजवली.
महाराष्ट्रातील ८६ गावांमध्ये स्वच्छ ग्राम मोहीम राबवली.
स्वयंसहाय्यता गट चळवळीला चालना दिली.
ग्रीन वॉरियर अवॉर्ड सारखे सन्मान मिळवले.
त्या विद्या प्रतिष्ठान सारख्या शिक्षण संस्थांच्या ट्रस्टी देखील आहेत, जिथे हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण होत आहे.
राजकीय प्रवास
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या राजकीय जीवनात पाठिंबा दिला, पण स्वतः सक्रिय राजकारणात उशिरा आल्या. २०२४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून एनसीपीकडून उमेदवारी केली, पण पराभव झाला. त्यानंतर जून २०२४ मध्ये त्या राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या (बिनविरोध). सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास हा "पडद्यामागची ताकद" ते "प्रकाशझोतात येणे" असा आहे. त्यांनी अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरता आणण्यासाठी आणि पवार कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे.
दरम्यान सुनेत्रा पवार हे राजकारणाकडे कसे पाहतात? जमिनीशी त्यांचं घट्ट नातं कसं आहे. यावर मॅक्सवुमनच्या संपादिक प्रियदर्शनी हिंगे यांनी वर्षभरापूर्वी घेतलेली मुलाखत पाहा.






