Home > मॅक्स व्हिडीओ > Ajit Pawar's interview : पवारांनी केले भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Ajit Pawar's interview : पवारांनी केले भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Ajit Pawars interview : पवारांनी केले भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
X

शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चेवर अजित पवारांची भूमिका: भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, भडकाऊ भाषणांवर खडे बोल, भाजपवर पैशाच्या गैरवापराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवृत्तीविषयी सुरू असलेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. “शरद पवारांनी निवृत्त व्हावं असं मला वाटत नाही. पवार साहेब आमचं दैवत आहेत. त्यांना ६० वर्षांचा प्रचंड राजकीय अनुभव आहे. अशा नेत्याने निवृत्त व्हावं, असं वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही,” असे स्पष्ट शब्दांत अजित पवार म्हणाले. याआधी शरद पवार निवृत्त का होत नाहीत असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली होती.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांचना दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवारांनी सांगितलं की, सध्या कोणत्याही मर्जरचा विचार करण्यात आलेला नाही. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून अशी मागणी झाली असली तरी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आणि आम्ही सर्वजण मेहनतीने मैदानात उतरलो आहोत, असे ते म्हणाले.

शरद पवारांसोबतच्या पहिल्या बैठकीबाबत काही गैरसमज पसरवण्यात आल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले की, “माझ्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल असं मी म्हटलं, असं बातम्यांत आलं. मी असं कसं म्हणेन? हे पूर्णपणे चुकीचं चित्र रंगवण्यात आलं.” त्यांनी २०१७ च्या निवडणुकांचा संदर्भ देत सांगितलं की त्या वेळीही मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले होते, मात्र निवडणुका संपल्यानंतर सर्वजण पुन्हा आपापल्या कामाला लागले. अशा आरोपांमुळे कायमची कटुता निर्माण होत नाही, कारण ही निवडणूक राज्याची नसून केवळ शहरापुरती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीदरम्यान होणाऱ्या घोषणांबाबत “आरेला कारे होतंच, अशा गोष्टी राजकारणात घडत असतात,” असं सांगत अजित पवारांनी आपल्या भाषणांचा रोख विकासावर असल्याचं ठामपणे मांडलं. “जे कारभारी सत्तेत होते, त्यांनी काय भ्रष्टाचार केला, कुठे विकास थांबवला, हे मी आकडेवारीसह दाखवलं आहे,” असे ते म्हणाले.

भाजपवर हल्लाबोल करताना अजित पवारांनी थेट भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका वाचून दाखवली. त्यांनी सांगितलं की १२ कोटी रुपयांचं सॉफ्टवेअर तब्बल १२० कोटी रुपयांना खरेदी केलं गेलं, झाडांची मोजणी न करताच बिलं काढण्यात आली, ७० लाखांच्या पुलाचं बिल वाढवून ७ कोटी करण्यात आलं. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र त्यातील ७० टक्के कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. पाण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी टँकर माफियाकडे बोट दाखवत सांगितलं की नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही, तर टँकर माफियांचं जाळं फोफावलं आहे. रस्ते अरुंद आणि फुटपाथ मात्र मोठे, अशी टीका करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा दाखला देताना अजित पवार म्हणाले की पिंपरी-चिंचवड महापालिकेवर २५ वर्षे सत्ता असताना एकही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर किंवा प्रशासनावर झाला नाही. पुढील काळात हायटेक रुग्णालय, दररोज पाणीपुरवठा, रोज झाडलोट व यंत्रांच्या साह्याने स्वच्छता, ट्रॅफिकमुक्त आणि खड्डेमुक्त शहर, तसेच प्रदूषण कमी करणे ही कामं प्राधान्याने केली जातील, असं त्यांनी सांगितलं. सध्या शहरात दररोज ४०० एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडलं जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

भडकाऊ भाषणांबाबत बोलताना अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “काही लोक मतं खेचण्यासाठी सतत भडकाऊ वक्तव्य करत आहेत. सरकारकडून शांततेची अपेक्षा असते, पण अशा भाषणांमुळे समाजात भीती निर्माण झाली आहे, कटुता वाढली आहे. लोक भीतीयुक्त जीवन जगत आहेत, हे नाकारता येणार नाही,” असं ते म्हणाले.

उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याबाबत बोलताना अजित पवारांनी त्यांचा बचाव केला. “या देशाच्या भल्यासाठी कुणी उद्योगपती विकासाचा विचार करत असेल, लाखो रोजगार निर्माण करत असेल, मेहनत आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वतःला वाढवत असेल, तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. अदानी-अंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचा फायदा त्यांना होतोच, पण देशालाही होतो,” असं ते म्हणाले. अदानींची मोनोपॉली होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, लोकशाही आणि संविधानात कर्तबगार व्यक्तींना पुढे जाण्याची मुभा आहे. “तुमच्यात क्षमता, ताकद आणि धमक असेल, तर कोणीही पुढे जाऊ शकतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

पर्यावरणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या पिढीचं नुकसान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. विकास हवा, पण पर्यावरण राखूनच. विकासाच्या नावाखाली कुणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर भाष्य करताना त्यांनी प्रशासनावर टीका केली. कारवाई करताना सामान्य लोकांचा विचार केला गेला नाही, मशीनरी तोडफोड झाली, कर्ज काढून व्यवसाय करणाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हे योग्य नाही, म्हणूनच आपण मैदानात उतरलो आहोत, असं अजित पवार म्हणाले.

निवडणुकीत मतदारांबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की मतदार काय निर्णय घेईल, हे कुणालाच सांगता येत नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर प्रलोभनं दाखवली जात आहेत, पैशाचा वापर सुरू आहे. मतदारांनी जर प्रलोभनाला बळी पडून अल्पकालीन विचार केला, तर वेगळं चित्र दिसेल. मात्र माझं काम पाहून दीर्घकालीन विचार केला, तर माझाच महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाहतूक आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की पुण्यात सुमारे ३० लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २३ लाख वाहनांची नोंद आहे. त्यातील निम्मी जरी दररोज रस्त्यावर आली, तरी प्रचंड प्रदूषण होतं आणि पैशांची मोठी नासाडी होते. दररोज सुमारे १२५ कोटी रुपये वाया जात आहेत. मोफत मेट्रो आणि पीएमपीएल सेवा राबवायची झाली, तर ५०० कोटी रुपये खर्च येईल, पण त्यामुळे रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होईल आणि शहराला दिलासा मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.

जातीयवाद, धर्मवाद आणि भीतीच्या राजकारणाला ठाम विरोध दर्शवताना, “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीयवाद केला नाही. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य उभारलं. आज काही लोक विकासाऐवजी मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम मुद्दे पुढे करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा थेट आरोप करत अजित पवारांनी केला आहे.

Updated : 14 Jan 2026 3:29 PM IST
Next Story
Share it
Top