Special Report: केरळमधून बोलावून घेतलेल्या कोव्हीड योद्ध्यांची मुंबईत परवड

2733
team on doctors from Kerala who have been denied salaries and even a basic protein based diet in Mumbai
Representative Image

मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढत असताना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी राज्य सरकारच्या वतीने केरळमधून ४० स्पेशालिस्ट डॉक्टरांना मुंबईत रुग्णांवर उपचारांसाठी बोलावले होते. आज या डॉक्टरांना दोन पातळ्यांवर लढावे लागत आहे. एक म्हणजे ते कोरोना विरोधात लढा देत आहेतच, तर दुसरीकडे त्यांना राज्य सरकारने आश्वासन दिलेला पगार मिळालेला नाही. एवढेच नाही तर या डॉक्टरांना स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही झगडावे लागत आहे. अंधेरीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये

महाराष्ट्रातील १६० आणि केरळमधील ४० डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. पण या डॉक्टरांच्या आहारातून प्रोटीनयुक्त पदार्थसुद्धा गायब झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांची समस्या सुटलेली नाही. त्यांच्या जेवणात साधे एक अंडेसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीये. प्रोटीन देणारे मांसाहाराचे जेवणदेखील त्यांना गेल्या महिनाभरात मिळू शकलेले नाही. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार करणाऱ्या चाळीस डॉक्टरांना गेल्या महिनाभरापासून एक भाजी, तीन पोळ्या आणि वरण -भात एवढंच जेवण मिळतं आहे. या जेवणाची वारंवार तक्रार करूनही या तक्रारीची दखल हॉटेल प्रशासनाकडून घेतली जात नाहीये. या डॉक्टरांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अशा तक्रारींचा रोज पाढा वाचला जातोय.

डॉक्टरांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डीन आणि हॉटेलचे मॅनेजर या दोघांनाही 11 जून रोजी एक पत्र लिहिले. पण या पत्राला अजूनपर्यंत उत्तर देण्यात आलेले नाही.

हे ही वाचा…

डॉक्टर साजिश एस यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा खूपच कमी आहे. ” आम्ही वारंवार मांसाहारी जेवण, फळं आणि कच्च्या भाज्यांबद्दल विचारत आहोत. आम्ही जेवणाच्या बाबतीत पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहोत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे. या आठवड्यात आम्हाला अंडी आणि फळे पुरवली जातील असं आश्वासन तुम्ही दिलं होतं, पण यापैकी आम्हाला मंगळवारी फक्त केळी मिळाली. एवढेच नाही तर दुसऱ्या कुठल्या एखाद्या ॲप वरून आम्हाला बाहेरून अन्नपदार्थ मागवण्याची परवानगी देखील दिली जात नाहीये. एवढ्या कमी दर्जाचे जेवण उपलब्ध केले जात असल्याबद्दल फाइव स्टार हॉटेललाच माहिती नसल्याचे दिसत आहे. आमच्या साध्या गरजादेखील ते पूर्ण करू शकत नाहीयेत” असं डॉक्टर सजिश म्हणतात.

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना डॉ. सजिश सांगतात की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या डीननादेखील आम्ही सांगितले आहे की, “तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर व्यवस्थापनाशी बोला. फाइव स्टार हॉटेलला या अन्नाच्या दर्जाबाबत माहिती नसेल तर आम्हाला किमान बाहेरून सकस अन्नपदार्थ आणण्याची परवानगी तरी द्या.” एवढेच नाही तर जे अन्न सध्या पुरवले जात आहे ते शिळं असतं आणि त्यामुळे अनेक सहकारी डॉक्टरांना डायरियाचा त्रास देखील झाल्याचे डॉ. सजिश सांगतात.

एकीकडे चांगल्या जेवणासाठी या डॉक्टरांचा संघर्ष सुरू असताना जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे त्यांना देण्यात आलेले पगाराचे आश्वासनदेखील पाळण्यात आलेले नाही. केरळमधील 40 डॉक्टर आणि 25 नर्सेसचे पगार अजूनही झालेले नाहीयेत. डॉ. तात्याराव लहाने यांनी केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पगाराबाबत आश्वासन दिलं होतं. केरळमध्ये कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात चांगलं यश आलं म्हणून तिथल्या डॉक्टर आणि नर्सेसना मुंबईमध्ये मदतीसाठी बोलावण्यात आले आहे.

केरळमधील या डॉक्टरांपैकी एकाने मॅक्स महाराष्ट्राला माहिती दिली की, मुंबई महापालिकेकडून अजूनही त्यांचा पगार देण्यात आलेला नाही. चौकशी केल्यानंतर आयुक्त इक्बाल चहल यांची सही राहिली असल्याने पगार रखडल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे .

“आफ्रिकेतील सेनेगल इथे इबोला या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. या आजारामध्ये रुग्णांचा मृत्यूदर 60 ते 80 टक्के एवढा होता. अशा ठिकाणी आम्ही काम केलेले आहे. मुंबईत जर कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल आणि
मृत्यूदर कमी ठेवायचा असेल तर आयसीयू आणि तज्ञ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. कोरोनाचे संकट नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आम्ही आमचं जेवण आणि पगाराच्या समस्या बाजूला ठेवून काम करत आहोत. पण अशावेळी महापालिकेचे कर्मचारी आमचा पगार पंधरा ते वीस दिवसांनी होईल असे उत्तर देतात तेव्हा त्रास होतो,” अशी खंत एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

-रेनी अब्राहम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here