Home > मॅक्स रिपोर्ट > ऊस तोड कामगारांच्या वेदनांना वाली कोण? उसतोड महामंडळाची नोंदणी रखडली..

ऊस तोड कामगारांच्या वेदनांना वाली कोण? उसतोड महामंडळाची नोंदणी रखडली..

बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगाराचा जिल्हा इथून साडेपाच लाख लोक ऊस तोडणी साठी पश्चिम महाराष्ट्र सह इतर राज्यात आपली पोटाची खळगी भरण्यासाठी जातात, याच ऊसतोड कामगारांच्या जीवावर राज्यातील राजकारणी राज्य करतात, मात्र या ऊसतोड कामगारांचं महामंडळ मोठ्या थाटात उद्घाटन केलं मात्र जिल्ह्यासह राज्यातील ऊसतोड कामगारांचे नोंद नसल्याने अनेक कामगार अडचणीत आले आहेत, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा रिपोर्ट...

ऊस तोड कामगारांच्या वेदनांना वाली कोण? उसतोड महामंडळाची नोंदणी रखडली..
X

बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख या जिल्ह्यातून साडेपाच लाख लोक ऊस तोडणी साठी पश्चिम महाराष्ट्र सह इतर राज्यात आपली पोटाची खळगी भरण्यासाठी जातात. याच ऊसतोड कामगारांच्या जीवावर राज्यातील राजकारणी राज्य करतात. मात्र या ऊसतोड कामगारांचं महामंडळ मोठ्या थाटात महाविकास आघाडी सरकारने पुण्यामध्ये उद्घाटन केलं. मात्र जिल्ह्यासह राज्यातील ऊसतोड कामगारांचे नोंद नसल्याने अनेक कामगार अडचणीत आले आहेत. मागील 3 वर्षापूर्वी कारखान्याला जातावेळी काही कामगारांचे अपघात झाले त्यामध्ये काही कामगारांचा मृत्यू देखील झाले. तीन वर्षे झाले, तरीही त्या कामगारांना त्यांना मदत ना... कारखान्याने दिली ना महामंडळाने... ना त्यांना कुठली मदत मिळाली.

उसतोड कामगार श्रीमंत रावसाहेब थोरात म्हणाले, मी गेले पंधरा वर्षापासून ऊस तोडणी साठी कारखान्यावर जात आहे. माझ्याबरोबर माझे मुलं ही घेऊन जात होतो. माझा मुलगा 19 वर्षाचा होता दिवसभर आम्ही ऊस तोडला ट्रॅक्टर भरून दिले. ट्रॅक्टर भैरवनाथ शुगर ला घेऊन जाता वेळेस ट्रॅक्टर सहित पाटात गेले व त्याचा अपघाती मृत्यू झाला. आम्ही इथे गावात आलो आणि त्या कारखान्याचे साहेब लोक आले आणि इन्शुरन्स वाले आमच्या सह्या घेतल्या. एक- दोन महिन्यात तुम्हाला चेक पाठवू. चेक आम्हाला दिला नाही आम्ही दोन-तीन वेळेस कारखान्याला चकरा मारल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विजय खटके नावाचा जो अधिकारी आहे त्याला आम्ही भेटलो. पण एक- दोन महिन्यात होईल असं सांगितलं. पुन्हा आमच्याकडे कोणी आलंही नाही आणि गेलही नाही. तीन वर्षे झालं ही घटना होऊन आमच्याकडे कोणी आलंही नाही गेलं ही नाही. त्याची मदत मला भेटली की नाही आणि कोणी आलंही नाही. महामंडळाचं कार्यालय झालंय पण आम्हाला त्याचं कुणी काही सांगितलं नाही, कुणी अधिकारी आले नाही केले नाही माझं पोटचं लेकरू गेलं... मला कोणी मदत केली नाही.

कारखान्याला जाता वेळेस मालक ट्रॅक्टर मधून पडले... पडले असे काहीही बोलले नाही, जाग्यावरच गेले... तिथून त्यांना अकलूजला घेऊन गेलो, दवाखान्यात काहीच इलाज झाला नाही. डॉक्टर म्हणाले हे मरण पावले आहेत. आमच्या सह्या घेतल्या व त्यांची चिरफाड केली. संध्याकाळी दहा वाजता गावाकडे पाठवून दिले. तिकडं ट्रॅक्टर मालकाने काय केलं ते आम्हाला काही माहीत नाही... त्यांनी तिकडेच तोंड दाबले... आम्हाला काही त्याची मदत मिळाली नाही, आमचं त्याच्यावर भांडण चालू आहे पण आम्हाला अजून पर्यंत रुपयाही मिळाला नाही, पुन्हा आम्ही कारखान्याला जाता वेळेस माझी बहीणही वारली. मलाही बरंच लागलं होतं, मी पण शुद्धीवर नव्हते बहीण वारली याचं पण मला भान नव्हतं, त्यावर आमच्याकडे कोणी आलं की नाही आणि गेलं नाही. आम्हाला रुपयाही मिळाला नाही आम्ही बदलून दवाखान्याचा खर्च केला... आमच्या भावाने सांगितलं की त्याचा खर्च एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे, आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही, त्यामुळे आम्ही एक एकर जमीन विकली, मला कुणीही सहकार्य केलं नाही... ना कारखान्यांनी मदत केली ना मुकादमाने मदत केली... मालक आमच्याकडे बघायला सुद्धा आला नाही... म्हणून आम्ही आमच्या खर्चासाठी एक एकर जमीन विकली, आम्हाला अजून पर्यंत तीन वर्ष झाले तरीही आम्हाला कुठली मदत मिळाली नाही, असे शारदा गोरख ढेंगे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार संजय आव्हाने सांगतात, माझे वडील ऊस तोडीत होते. 14 -15 वर्ष वडिलांनी ऊस तोडला. त्यानंतर मी ऊस तोडायला सुरू केला माझं काही शिक्षण झालेलं नाही, कारण माझे वडील ऊस तोडत असल्यामुळे माझं शिक्षण झालं नाही. मला ऊस तोडायची वेळ आली आहे... माझं लग्न झालेलं आहे मला तीन मुली आहेत. माझ्या मुलांची शिक्षणाची सोय लागत नाही. त्यामुळे मला कारखान्याला जावं लागत आहे. जसं आम्ही ऊस तोडायला जातो तसं आमचे लेखकही आमच्याबरोबर ऊस तोडायला येतात. स्वामी फडफ जातो तसं आमच्याबरोबर लेकरही आमच्याबरोबर येतात. त्यामुळे आमच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय लागत नाही,आमचं ऊसतोड महामंडळ झालेला आहे मात्र त्याचं कुणीही आमच्याकडे आलेलं नाही... कोणते कागदपत्र द्यायचे असतात ते आम्हाला काही माहीत नाही.

किसन शिदे पुढे सांगतात, गेली पंधरा वर्षापासून ऊस तोडीचे काम करत आहे. आमची नोंदणी कुठेच झालेली नाही... लहान लेकराला घेऊन आम्हाला कारखान्याला जावं लागतं... जमीन थोडीच आहे त्याच्यामध्ये आमचं काही भागत नाही, निसर्ग कधी साथ देत नाही. कधी जास्त पाऊस पडतो तर कधी कमी पाऊस पडतो. त्यामुळे शेतीत उत्पन्न जास्त येत नाही, यावर्षी सुद्धा मला ऊसतोडीला जायचं आहे,एक लाख रुपये उचल घेतलेले आहे ती फेडायची आहे म्हणून कारखान्याला जायचं आहे. फलटण कारखान्याला यावर्षी ऊस तोडी ला जायचं आहे, माझ्याबरोबर माझी बायको दोन-तीन मुलं घेऊन मला जावं लागत आहे.

कुठली सोय झालेली नाही आणि शासन काही लक्ष घालत नाही, माझी लहान लहान मुलं आहेत एक चौथीला आहे एक पाचवीला आहे आणि एक त्याच्यापेक्षा लहान आहे त्यांच्या शिक्षणाची काय सोय होत नाही...गावाकडे कोणी त्यांना सांभाळण्यासाठी नाही म्हणून आम्हाला बरोबर न्यावे लागतात व त्या ठिकाणी शिक्षणाची त्यांची सुविधा होत नाही.

मी वयाच्या पंधरा वर्षापासून ऊस तोडत आहे. माझे आई-वडील ही ऊस तोडत होते, त्यामुळे माझ्यावरही ऊस तोडण्याची वेळ आली आहे, मला तीन मुली आहेत त्यांची शिक्षणाची कोणतीही सुविधा त्यांना मिळत नाही, पाण्याची सुद्धा सुविधा नसती... काही वेळेस आम्हाला मुलांना पडतही न्यावं लागतं, आमच्याकडे महामंडळाचे कोणी अधिकारी आलेले नाहीत.गावातली कोणी अधिकारीही आमच्याकडे आले नाहीत, मुकादम सुद्धा मनाला नाही की अशाने अशी नोंद करायची आहे म्हणून आमची काही नोंद झालेली नाही, आणि आम्हाला कुठली सुविधा मिळालेली नाही, असे उसतोड कामगार नितीन राजाभाऊ माळी म्हणाले.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ मोठ्या थाटामाटा स्थापन झालं... बीड जिल्हा सह महाराष्ट्रातील सर्वच ऊसतोड कामगारांची नोंदणी होणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात 14 लाख ऊसतोड कामगार काम करत आहेत असा अंदाजित आकडा आहे, त्यापैकी आठ लाख ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून कुठल्याच गावात ऊसतोड कामगाराची नोंदणी झालेली नाही. काही लोकांचे डॉक्युमेंट जमा करून ठेवले आहेत. मात्र कुठलाच फिक्स आकडा या शासन दरबारी नाही... कामगारांसाठी जे ऊसतोड महामंडळाने जी घोषणा केली त्यांना घरकुल भेटलं पाहिजे... त्यांची सुरक्षा झाली पाहिजे... विम्याचा लाभ भेटला पाहिजे त्यांच्या मुलांसाठी निवासी वस्तीगृहाची सोय झाली पाहिजे. ध्येय खूप मोठे मोठे आहेत मात्र अंमलबजावणी मात्र शून्य आहे. मी प्रत्यक्षात वीस गावांमध्ये फिरून याविषयी चौकशी केली. ग्रामपंचायत स्तरावर कागदपत्र गोळा केले आहेत मात्र त्या कामगाराला त्याचं कुठलंही ओळखपत्र दिलेलं नाही...

कुठलंही हेल्थ कार्ड दिले नाही. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार सुविधेपासून वंचित आहेत, आणि या वरती आता बोलणे गरजेचे आहे, राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील सर्व कामगारांसाठी काम करणाऱ्या संस्था संघटना पक्षांना विनंती करतो की आपण याविषयी आवाज उठवला पाहिजे, हा ऊस तोडीचा हंगामा अत्यंत जवळ आलेला आहे, एक महिन्यानंतर ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये भेटणार नाही आणि शासनालाही भेटणार नाही... कामगार एकदा कारखान्याला निघून गेला की तो भेटत नाही आणि त्यामुळे या ऊसतोड कामगारांची नोंदणी होणे गरजेचे आहे... त्यांचे हेल्थ कार्ड मिळणे गरजेचे आहे त्यांना त्यांचं ओळखपत्र मिळणे गरजेचे आहे त्यांना त्यांच्या सगळ्या सुविधा मिळणे गरजेचे आहे... मात्र प्रशासकीय पातळीवर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही, मात्र हा गंभीर प्रश्न बीड जिल्ह्याचा आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ही ऊसतोड कामगारांचा आहे, असे सामाजिक कार्यकर्ते ओम प्रकाश गिरी म्हणाले.


Updated : 15 Sep 2022 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top