Max Maharashtra Impact : आदिवासी पाड्यावर पोहोचली शासकीय यंत्रणा
X
जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यास यंत्रणेला भाग पाडण्याचे काम मॅक्स महाराष्ट्र सातत्याने करत आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांना शहराशी जोडणारा रस्ताच नसल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दाखवले होते. या वृत्ताची दखल पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता पुढच्या वर्षापर्यंत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर सोमवारी तहसीलदार स्वत: या पाड्यावर पोहोचले.
जव्हारपासून 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधा पासून कोसो दूर आहेत. स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत असून रस्त्या अभावी वृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले आणि चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी पेशंटला लाकडाची डोली करून 6 ते 7 किलोमीटरचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य केंद्र गाठावे लागत असल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले होते.
संबंधित बातमी
7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?
'गरोदर महिलेने 7 किमीचा डोंगर कसा पार करावा' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. सोमवारी २१/०९/२०२० रोजी जव्हारचे तहसीलदार बाळू भल्ला यांनी या पाड्यांना भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमता वन विभागाच्या परवानगीचा प्रश्न सोडवावा लागेल. यानंतर बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून येथील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत अमोल चौधरी (सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता, जव्हार), पोलिस पाटील व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.