Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पिकांसह शेतातील मातीही गेली वाहून, बंधारा फुटल्याने शेतकरी उध्वस्त

Ground Report : पिकांसह शेतातील मातीही गेली वाहून, बंधारा फुटल्याने शेतकरी उध्वस्त

मराठवाड्यात गेल्या १५ दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण औरंगपूरमध्ये मात्र बंधारा फुटल्याने शेतातील पिकांसह मातीसुद्धा वाहून गेल्याने अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत. प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Ground Report : पिकांसह शेतातील मातीही गेली वाहून, बंधारा फुटल्याने शेतकरी उध्वस्त
X

"पीक वाहून गेलं तर पुन्हा पेरता येतं...पण शेतंच वाहून गेलं तर आम्ही कुठे पेरावं आणि काय खावं?" हा सवाल आहे बीड जिल्ह्यातील औरंगपूर परिसरातील शेतकऱ्यांचा....बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरल्याने पिकांसह मातीही वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याचे काम, कंत्राटदाराने केलेली बनवाबनवी, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टी यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...

बीड तालुक्यातील औरंगपुर परिसरामध्ये पावसाने सुरवातीपासूनच दांडी मारल्याने जेमतेम पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकरी वर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडला होता. यावर्षी कोरडा दुष्काळ पडतो की काय, अशी परिस्थिती ऑगस्ट महिन्यात होती. शिवारातील औरंगपुर,चिंचोली माळी, दहिफळ, पारगाव, घो.राजुरी, पिंपरी, नाळवंडी, या गावांमधील शेतकरी चातकासारखा पावसाची प्रतीक्षा करत होता. अखेर गेल्या पंधरवड्यात पावसाने पुनरागमन केले. पण परतीचा पाऊस एवढा बरसला की आता शेतकरी पुन्हा ओल्या दुष्काळाच्या संकटात अडकला आहे. शेकडो हेक्टरवरील पिकं उध्वस्त झाली आहेत.एकीकडे अतिवृष्टीने थैमान घातले असताना दुसरीकडे औरंगपूरमध्ये बंधारा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इथे केवळ पिंक नाही तर शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. "अतिवृष्टीने आमचे नुकसान झाले आहे, शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, आम्हाला उभं करावं, आमच्या शेतातील माती वाहून गेली, त्यामुळे आम्ही आता काय करावं हा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे, शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी आले, सांत्वनपर भेट दिली पण आम्हाला लवकरात लवकर मदत करुन आमच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व नुकसान भरपाई करुन द्या," अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

याबद्दल राजु उनवणे यांनी सांगितले की, "हा बंधारा 1992 -93 मध्ये झाला असून या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. 2017 मध्ये जे टेंडर निघालं ते ओपन टेंडर होतं. त्यामध्ये दरवाजे टाकण्याचे काम शहा नावाच्या गुत्तेदार व्यक्तीने केलं. या ठिकाणची पिचिंग भिंत तुटलेली होती. त्यामुळे हा बंधारा फुटला. आम्ही शहा नामक व्यक्तीला वारंवार फोन करून सांगितलं. मात्र त्यांनी काहीही ऐकलं नाही. त्यामुळे साइडची भिंत तुटण्याची भीती आहे, असे आम्ही सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही व माझी तब्येत ठीक नाही असं कारण सांगत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. सपोर्टिंग भिंत थोडी तुटलेली होती, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरलं. शहा यांच्या हलगर्जीपणामुळे हे झाले आहे, त्यामुळे शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा आणि त्याचबरोबर पाईपलाईन, झाडं यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कशी मिळणार, असा प्रश्नही उनवणे यांनी विचारला आहे. त्यामुळे शेतच आता वाहून गेले, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

"हे दरवाजे आम्ही जूनमध्ये काढण्यासाठी प्रयत्न केला, मात्र दरवाजे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते तुटले व आम्हाला काढता आले नाही. त्यावेळी आम्ही शहा यांना फोनवरून सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकलं नाही व आज आमच्यावर अशी वेळ आली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने न्याय मिळवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

कंत्राटदाराचे म्हणणे काय?

या बंधाऱ्याचे काम करणारे मे. जय साई कंट्रक्शनचे मालक नितेश शहा यांना आम्ही संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, 2017 18 मध्ये सदरील काम जलसंधारण विभाग यांच्याकडून 80 लाख रुपये किमतीने घेतले होते. हे काम आपण पूर्ण केले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या बाजूची जमीन वाहुन गेली त्या बाजूला पिचिंग भिंत कमकुवत असल्याने त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यास सांगितले होते. मात्र ही दुरूस्ती न केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. परंतु कंत्राटदाराने हा आरोप फेटाळल आहे. तसेच 2017 -18 पासून आजपर्यंत एकही रुपयाचे बिल मिळालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

"पावसाने बंधारा वाहून गेला आहे, शेत वाहून गेले, पीक वाहून गेले, माती वाहून गेली... दोन-तीन एकर शेत गेलं. जिल्हाधिकारी येतेत, कुणी कुणी अधिकारी येतेत, बघून जाते. पण आमची नुकसान भरपाई कोण देणार? आम्हाला अन्न खाऊ वाटत नाही... आमचं शेतीवरच अवलंबून आहे सारं... राहिलेल्या पिकाला पाणी द्यायचं कसं, एवडे सगळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आमची नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी महिला शेतकऱ्यांना केली आहे.
"बंधाऱ्यालगत माझी जमीन होती. अतिवृष्टी झाल्यामुळे माझी एक एकर जमीन पूर्णच वाहून गेली. त्यामुळे त्यात असलेली पीकही वाहून गेले. वीस फुटांपर्यंत खड्डा इथे पडला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याचबरोबर बंदराच्या शेजारी असणाऱ्या जमिनीला संरक्षण भिंत नसल्यामुळे शेतात पाणी शिरलं आणि अख्खं शेत घेऊन गेलं. त्यामुळे आमच्यावर मोठं संकट ओढावले आहे" असे एका पीडित शेतकऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांचे फक्त दौरे, मदत नाहीच

अतिवृष्टग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागांचे दौरे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या सगळ्यांनी केले. सर्व अधिकारी येऊन यांनी सांत्वनपर भेट दिल्या मा्ञ आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार हे आम्हाला अजून माहित नाही, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. एकूण बंधाऱ्याचे निकृष्ट काम, त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 15 Sep 2021 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top