Home > मॅक्स रिपोर्ट > दुष्कळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर.....शेतपिकांचं प्रचंड नुकसान...

दुष्कळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर.....शेतपिकांचं प्रचंड नुकसान...

दुष्काळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

दुष्कळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर.....शेतपिकांचं प्रचंड नुकसान...
X

दुष्काळी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीकं वाहून गेले आहे. तर कित्येक शेतजमिनीचे देखील नुकसान झाले आहे.

यामुळं आता कुठं पेरावं ? जगावं कसं ? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय ? बीड जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. त्यात अनेकांनी दुबार पेरणी देखील केली. मात्र त्यानंतर पाऊस झाल्याने पिके देखील जोमात आली. आता या पिकांनी चांगलाच बहर घेतला होता. उडीद, मूग, सोयाबीन भुईमूगाला चांगल्या शेंगा आल्या होत्या. कापसाने देखील बहर घेतला. मात्र सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने उभी पीकं वाहून गेले. एवढेच नाही तर बीडच्या पोखरी गावातील अनेक शेतकऱ्यांची शेतातील माती देखील वाहून गेली.त्यामुळे पिकं तर वाहून गेलीच, मात्र आता जमीनही वाहून गेल्याने आता या जमिनीवर पेरावं कसं ? कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय.

तर याविषयी शेतकरी शामराव चव्हाण म्हणाले की, "पिक तर वाहून गेलेचं आहे, जमीन देखील वाहून गेली आहे.आज शेतात होत्याचं नव्हतं झालंय. त्यात शासन पीक विमा देत नाही, तीन वर्षापासून पिक विमा भरतोय. मात्र एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याची वेळ आलीय. त्यामुळं शासनाने आता तरी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी" अशी मागणी शेतकरी शामराव चव्हाण यांनी केली आहे..

तर जिल्ह्यातील वडवणी, धारूर, केज, माजलगाव, गेवराई, बीडसह सर्वच तालुक्यात पावसाने कहर केलाय. जिल्ह्यातील रोहितळ, राजापूर, राहेरी, खंडोबाचीवाडी या गावांसह अनेक गावांत पाणी शिरलं होतं. तर अनेक गावांचा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. त्यांचबरोबर शेतातील मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, कापूस, मका, ऊस या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. यामुळं दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे राहिले आहे. यामुळं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Updated : 1 Sep 2021 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top