News Update
Home > मॅक्स किसान > सोलापूरी केळीला इराण-इराक देशात मागणी

सोलापूरी केळीला इराण-इराक देशात मागणी

दुष्काळी सोलापूर जिल्यातील करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव प्रतिकुलतेलाअपवादात्मक असून या गावच्या आसपासच्या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे केळीच्या व्यापारातून वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. कंदरची केळी मार्केटमध्ये 'कंदरची केळी' म्हणून प्रसिद्ध असून ही केळी इराण-इराक देशात एक्सपोर्ट होते, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट

सोलापूरी केळीला इराण-इराक देशात मागणी
X

केळी खाण्यास आरोग्यासाठी उत्तम अशी मानली जाते. सणाला आणि पूजेसाठी केळीला विशेष मान असतो. केळीच्या बाबतीत असेही सांगितले जाते की केळी खाल्याने वजन वाढते. म्हणूनच लोक आवडीने केळी खात असावे असे वाटते. महाराष्ट्रात केळीच्या उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या विविध भागात केळी एक्सपोर्ट होते. जोपर्यंत जळगाव जिल्ह्यातील केळीचा हंगाम संपत नाही, तोपर्यंत राज्याच्या इतर भागात असलेल्या केळीच्या पिकाला मार्केटमध्ये कमी प्रमाणात मागणी असते. तसे पाहिले तर राज्याच्या अनेक जिल्ह्यात केळी पिकाचे उत्पादन तुरळक घेतले जाते. पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव याला अपवादात्मक आहे. या गावच्या आसपासच्या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.


येथे केळीच्या व्यापारातून वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. कंदरची केळी मार्केटमध्ये 'कंदरची केळी' म्हणून प्रसिद्ध असून ही केळी इराण-इराक देशात एक्सपोर्ट होते. सध्या या केळीची मागणी बाजारात वाढली आहे. कंदर गाव उजनी धरणाच्या पायथ्याला असल्याने येथील शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. उजनी धरणाच्या आसपास ऊसाची शेती पहायला मिळते. पण गेल्या काही दिवसात ऊसाच्या शेतीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे येथे केळीच्या बागांचे क्षेत्र वाढू लागले आहे. ऊस कारखान्याला जाऊनही शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना केळी पिकाची शेती लाभदायक वाटू लागली आहे. या भागातील शेतकरी वर्षाला केळीच्या पिकातून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दोन वर्षे मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेती माल विकता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले होते. सध्या शेती क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

सोलापूरी केळीला मार्केटमध्ये वाढली मागणी

जिल्ह्यात शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. त्यातून शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या जळगावची केळी संपली असून सोलापूरी केळीला मार्केटमध्ये मागणी वाढली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केळी कवडीमोल किंमतीने बाजारामध्ये शेतकऱ्यांना विकावी लागली होती. केळीला कमी भाव मिळत असल्याने वैतागून काही शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर कुऱ्हाड चालवली होते. सोलापूरी केळीच्या पिकाला मार्केटमध्ये मागणी वाढली असून तिच्या भावात वाढ झाली आहे. सध्या ही केळी 17 ते 18 रुपये किलोने व्यापाऱ्यांना विकली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात पिकणाऱ्या या कंदरच्या केळीला इराण-इराक देशात मोठ्या प्रमाणात मागणी असून तेथे सध्या केळी एक्सपोर्ट केली जात आहे. परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या या केळीचे नाव जैन असे आहे. या केळीचे उत्पादन जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकरी ब्रम्हदेव चौधरी यांनी घेतले असून भविष्यात भाव जर असाच राहिला तर 10 लाख रुपयांच्या आसपास फायदा होईल असे शेतकरी ब्रम्हदेव चौधरी यांना वाटत आहे.

मार्केटला केळी घेऊन जाण्याच्या खर्चात होतेय बचत

शेतकरी ब्रम्हदेव चौधरी यांच्या शेतात सध्या केळीची तोडणी सुरू आहे. त्यांच्या शेतातील केळीचा एक घड 40 ते 45 किलोच्या आसपास भरत आहे. केळीचे पीकही अगदी जोमात आले आहे. या केळीची खरेदी व्यापारी शेतात येऊन जाग्यावरच करत आहेत. त्यामुळे केळी मार्केटला घेऊन जाण्याच्या खर्चात बचत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. केळीच्या तोडणीसाठी सध्या चौधरी यांचे कुटुंब मेहनत घेत आहेत. यासाठी पश्चिम बंगाल येथून कामगार आणले आहेत. सध्या कंदर गावच्या आजूबाजूच्या परिसरातील केळीच्या बागेत पश्चिम बंगालचे कामगार काम करताना दिसत आहेत.

मार्केटला केळी पाठवण्याआधी तिच्यावर होते प्रक्रिया

केळी मार्केटला विक्रीसाठी पाठवण्याआधी तिच्यावर प्रक्रिया केली जाते. बागेतून केळीचा घड तोडल्यानंतर बंगाली कामगार खांद्यावर वाहून आणतात. या केळीवर प्रक्रिया करण्यासाठी 8 ते 10 कामगार काम करतात. बागेतून वाहून आणलेला केळीचा घड दोरीच्या मदतीने टांगला जातो. या घडातील केळीची एक- एक फणी चाकूच्या सहाय्याने तोडली जाते. तोडलेल्या केळीच्या फणी स्वच्छ करण्यासाठी पाण्याने भरलेल्या पाण्याच्या टँकमध्ये टाकल्या जातात. या केळीच्या फणी एका पाण्याच्या टँकमधून काढून दुसऱ्या पाण्याच्या टँकमध्ये टाकल्या जातात. पहिल्या टँकमधून केळी काढत असताना फणीत असणाऱ्या खराब केळीची छाटणी केली जाते. केळी दुसऱ्या टँकमध्ये टाकल्यानंतर तिला स्वच्छ करून काढली जाते. तिचे वजन केले जाते. त्यानंतर तिला हवेच्या फ्रेशरने सुकवली जाते. सुकलेल्या केळीवर स्टिकर चिटकवले जातात. तिला मशीनच्या सहाय्याने प्लास्टिकच्या पिशवीत बॉक्समध्ये पँक केले जाते. बॉक्समध्ये केळी बंद करत असताना थोडीशी हिरवी असते. बॉक्समध्ये बंद केलेल्या केळीचे बॉक्स गाडीत भरून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात.

मार्च-एप्रिल महिन्यात कंदरच्या केळीला मार्केटमध्ये वाढतो भाव

कंदरच्या केळीला मार्केटमध्ये सध्या चांगली मागणी आहे. जळगावची केळी संपल्यानंतर या केळीची मागणी मार्केटमध्ये वाढते. या केळीची क्वालिटी पण चांगली आहे. सुरुवातीला आम्ही पण 2 ते 3 रुपये किलोने केळी विकली आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान ही सोसावे लागले होते. त्यावेळेस आम्ही बाग तोडून टाकली होती. पण त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा एप्रिल महिन्यात केळीच्या बागेची लागवड केली. जळगावची केळी संपल्यानंतर व्यापारी कंदरच्या केळीकडे धाव घेऊ लागले आहेत. कंदरच्या केळीला मार्च ते एप्रिल महिन्यात भाव मिळतो. कोरोनाच्या कारणाने गेली दोन वर्षे मार्केट बंद होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. आता ही केळी इराण-इराक या देशात सुद्धा जात आहे. त्याचबरोबर भारतातील पंजाब,हरियाणा, दिल्ली येथे एक्सपोर्ट होते. केळीची बाग लावण्यासाठी सुमारे 3 लाख रुपये खर्च आला होता. मार्केटमध्ये सध्या केळी 16 ते 17 रुपये किलोने विकली जात आहे. जर भाव असाच राहिला तर 10 लाख रुपयांच्या आसपास केळीचे उत्पन्न जाईल,असे शेतकरी ब्रह्मदेव चौधरी यांनी बोलताना सांगितले.

अवकाळी पावसाचे केळीच्या बागांवर संकट

सध्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार आणि केळी उत्पादक बागायतदार चिंतेत आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात केळीची बाग उध्वस्त झाल्यास केळीला व्यापारी फुकट देखील घेऊन जात नाहीत. या केळीच्या बागांना सर्वात जास्त धोका गारपिटीचा आहे. गारपिटीमुळे केळीच्या झाडांचे अपरिमित नुकसान तर होतेच त्याचबरोबर केळीच्या घडांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. त्यामुळे अवकाळी पाऊस नाही पडलेला बरा, असे या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाटत आहे.

Updated : 2022-04-27T14:34:13+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top