Top
Home > मॅक्स किसान > मराठवाडा: परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस मातीमोल

मराठवाडा: परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस मातीमोल

अतिवृष्टीने वेचणीला आलेला कापूस गळून पडला, सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका...पाहा काय ग्राउंड झिरोवर शेतकऱ्यांची स्थिती? पाहा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रतिनिधी मोसीन शेख यांचे विशेष विश्लेषण...!

मराठवाडा: परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस मातीमोल
X

औरंगाबाद : अतिवृष्टीने हैराण केलेल्या पावसाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर वेचणीला आलेला कापूस गळून पडला असून सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील देविदास घोडके यांनी आपल्या अडीच एकर शेतात कापूस लावला होता. फवारणी खत खुरपणी हे सगळे मिळून त्यांना जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च लागला. तर एवढं सगळं करुन हातात हातात तीस कुंटल पेक्षा जास्त कापूस येईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, अतिवृष्टी आणि त्यात आता परतीच्या पावसाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले आहे. तसेच अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर हातात सात ते आठ क्विंटल ही कापूस येणार नसल्याचं घोडके म्हणाले. त्यामुळे लावलेला खर्चही त्यांच्या हातात पडणार नाही आणि नेहमीप्रमाणे तोट्यातील शेती त्यांना यावेळीही करावी लागल्याची खंत घोडके बोलून दाखवतात.


औरंगाबाद जिल्ह्यात एकूण पिकांमध्ये सर्वाधिक 85 टक्के क्षेत्रफळ हे कापूस आणि मक्याचे असतात. त्यात कापूस 60 टक्के क्षेत्र तर 25 टक्के मक्याचं लागवड केल्याची नोंद आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या पावसामुळे सर्वाधिक या दोन पिकांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. तर प्रशासनाने दिलेल्या अंदाजे आकडेवारी नुसार जिल्ह्यात पावसामुळे 94 हजार शेतकऱ्यांचे 39 हजार 325 हेक्टरवर नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे लातुर जिल्ह्यातील खरिपातील मुख्य समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे आकडेवारीनुसार 1 लाख 14 हजार हेक्टरवरील सोयाबीन हातातून गेलं आहे. तर यावेळी 4 लाख 59 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यासंदर्भात आम्ही औरंगाबादचे कृषी अधिक्षक तुकाराम मोटे यांच्याशी बातचित केली.

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पंचनामे करण्यात आले असून यामध्ये 94000 हजार शेतकऱ्यांचे 39325 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. कोरडवाहू आणि जिराईत पिकांसाठी 6800, बागाईत जमिनीवरील पिकांसाठी 13800, तर फळपिकांसाठी 18000 हेक्टरी भरपाई देण्यात येते. त्यानुसार 32.33 कोटींची मदत मागितली असून निधी मिळताच तो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात होईल. असं मोटे यांनी म्हटलं आहे.
परतीच्या पावसाचा फटका बीड जिल्ह्याला सुद्धा बसला असून, सोयाबीन, कापूससह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. 1 लाख 45 हेक्टरवरील सोयाबीन तर 2 लाख 10 हजार हेक्टरवर लावलेल्या कापसाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तूर आणि इतर पिकांना सुद्धा पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार काय मदत करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Updated : 17 Oct 2020 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top