Home > मॅक्स किसान > अतिवृष्टीच्या नुकसानीचा धसका घेऊन बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीच्या नुकसानीचा धसका घेऊन बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीच्या नुकसानीचा धसका घेऊन बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
X

राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आता शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढणार अशी भीती व्यक्त केली जात असताना बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

भाऊसाहेब दशरथ पांढरे वय 55 वर्षे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भाऊसाहेब पांढरे यांच्या पिकाचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं, असुन या परिस्थितीमध्ये कर्ज कसं फेडायचं, पुढे येणाऱ्या प्रसंगांना तोंड कसं द्यायचं? या विवंचनेमुळे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ही घटना सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे १ ऑक्टोबर रोजी घडली. भाऊसाहेब दशरथ पांढरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते, शिवाय सेंट्रल बँकेचे पीककर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे शेताचं अतोनात नुकसान झालं आहे. या नैराश्येतून त्यांनी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घराजवळील पत्र्याच्या शेडमागील सुबाभळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, गेवराई पोलीस स्टेशन अंतर्गत मादळमोही चौकी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असुन, मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला आहे.

Updated : 2021-10-02T17:29:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top