Home > मॅक्स किसान > कृषी-बाजारसमितीतले अडते-दलाल-व्यापारी आणि अंबानी-अदानी दोन्हीही रेंट सिकींग: संदिप डांगे

कृषी-बाजारसमितीतले अडते-दलाल-व्यापारी आणि अंबानी-अदानी दोन्हीही रेंट सिकींग: संदिप डांगे

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांवर आज भारत बंद सुरू असताना माध्यम आणि समाज माध्यमांमध्ये या कायद्यांवरून विचारमंथन सुरू आहे. कृषी व्यवस्थे मधील अडत दलाल व्यापारी असो की अदानी अंबानी सगळेच रेंट सिंकिंग प्रकारात मोडत असल्याचे विश्लेषण केलयं संदीप डांगे यांनी....

कृषी-बाजारसमितीतले अडते-दलाल-व्यापारी आणि अंबानी-अदानी दोन्हीही रेंट सिकींग: संदिप डांगे
X


समजा, तुम्ही एका नवख्या शहरात दोन दिवसासाठी काही कामासाठी गेलात.

साहजिकच रात्र काढण्यासाठी एखादे हॉटेल शोधाल. एक हॉटेल मिळते. तिथे गेल्यावर तुम्हाला कळते की त्यांचे दर इतर शहरांच्या हॉटेल्सच्या मानाने दहापट आहेत.मग तुम्ही साहजिकच दुसरे एखादे छोटे हॉटेल शोधायचा विचार करता. पण त्या भागात दुसरे हॉटेल नाही असे कळते. कारण तिथल्या सरकारी कायद्यानुसार पन्नास रुम्सपेक्षा छोटे हॉटेल चालत नाही.

मग तुम्ही म्हणता, एखादे होम-स्टे शोधतो. तर तिथल्या कायद्यानुसार घरगुती कुटूंबाना असे पाहूणे ठेवून घेण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही म्हणाल, जाऊदे माझ्या कारमध्येच रात्र काढतो. तर तसे करण्यास रात्री गस्त घालणारे पोलीस चोरीमारी-हत्या इत्यादीचे कारण सांगून परवानगी देत नाहीत.

हताश होऊन तुम्ही म्हणता, जाऊदे, इकडे दहापट पैसे घेताय तर सर्विस चांगली असेल, बेड्स उत्तम असतील, सुरक्षा चांगली असेल, खाद्यपदार्थ उत्तम असतील. तर तिथला मॅनेजर सांगतो की ह्याची आम्ही कोणतीही गॅरंटी देत नाही, तशी कायद्याने आम्हाला कोणतीही सक्ती नाही. तुम्हाला रुम्स पाहायला मिळणार नाही. आधी पैसे भरल्यावर जी मिळेल ती रुम घ्यावी लागेल. शेवटी मॅनेजर तुम्हाला सुचवतो, की आमच्याकडे सर्व सुविधायुक्त, सुरक्षित आणि उत्तम रुम्स आहेत पण खूप कमी आहेत, त्यांचे दर मात्र ह्या 'नॉर्मल' दरांपेक्षा दुप्पट आहेत. तुमच्याकडे पर्याय राहत नाही. तुम्ही त्या हॉटेलच्या 'रेंट सिकींग बिहेवियरचे' बळी झालेले असता.

दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळते की त्या हॉटेलचे मालक तिथले खासदार, पोलीस कमिशनर आणि पालिका-आयुक्त आहेत.

रेंट सिकींग बिहेवियर म्हणजे काय?

कायदेशीरपणे उत्पन्न मिळवण्याचे तीन प्रमुख मार्ग असतात. पगार, नफा आणि भाडे.

सर्व कामगार, नोकरदार, मजूर हे अंगमेहनतीचे, बुद्धीचे काम करुन त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतात. ते त्यांचे उत्पन्न.

उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, विक्रेते हे आपल्या उपक्रमातून वस्तू-सेवा कमी पैशात खरेदी करुन (मूल्य वाढवून) जास्त पैशात ग्राहकांना विकतात. खरेदी-विक्रीच्या किंमतीतला फरक म्हणजे नफा. नफा हे त्यांचे उत्पन्न.

तिसरा प्रकार असतो भाडे. ह्यात एखाद्या संसाधनावर मालकीहक्क-ताबाहक्क मिळवून त्याचा वापर इतरांना करायला देणे व त्या वापराचे मिळणारे पैसे हे त्या मालकांचे उत्पन्न .

नॉर्मली आपल्याला घर-जागाभाडे, गाडीभाडे, वस्तूभाडे अशा माध्यमातून भाडे ही संकल्पना कळते. अर्थशास्त्रात ही संकल्पना व्यापक पातळीवर अभ्यासली जाते. इंग्रजीत ह्याला Rent Seeking / economic rent असे म्हटले जाते. ह्यात मूळ संसाधनावर मालकाची गुंतवणूक त्याला मिळणार्‍या फायद्याच्या तुलनेत जवळजवळ काहीच नसते. भाडे म्हणजे वरचेवर काहीही न करता फक्त मालकीहक्क-ताबाहक्क आहे म्हणून मिळणारे उत्पन्न.

economic rentच्या उदाहरणांमध्ये काही प्रकार आहेत.

वैयक्तिक बाबतीत विशिष्ट घटकांना मिळणारी सरकारी मदत, सवलती, सबसिडी, पैसे हे येते. हे मिळवण्यासाठीत या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीत असणे आवश्यक असते. त्यांना मिळणार्‍या मदतीच्या बदल्यात ते स्वतः कोणतेही उत्पादक काम करत नसतात.

'व्यावसायिक परवाने' हा दुसरा प्रकार. ह्यात काम करुन उत्पन्न कमवायला विशिष्ट लायसन्स आवश्यक असणारी क्षेत्रं येतात. ह्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट अर्हता, कौशल्य आणि अनुभव आवश्यक असला तरी निव्वळ तेवढ्या भांडवलावर काम करणे शक्य होत नसते. परवाना लागतो. परवान्याच्या सक्तीमुळे आपोआप इतर लायसन्स नसलेले लायक उमेदवार क्षेत्रात प्रवेश करु शकत नाहीत. व ज्यांच्याकडे लायसन्स आहेत ते संगनमत करुन आपल्या मनाप्रमाणे सेवा-वस्तूंच्या किंमती लावून उत्पन्न कमवतात. ह्यात त्यांच्या कौशल्याचा, अनुभवाच्या अनुषंगाने येणार्‍या स्पर्धेचा संबंध नसतो. लॉबीइंग करुन आपल्या फायद्याचे कायदे व नियम तयार करुन हे 'रेंट' अधिकाधिक कसे मिळवता येईल ह्याबद्दल ते आग्रही असतात. ह्यात डॉक्टर्स, पायलट्स, सीए, आर्किटेक्ट इत्यादी अनेक क्षेत्र येतात.

तिसर्‍या प्रकारात उद्योजक-व्यापारी क्षेत्र येतात. ह्यात आपल्या क्षेत्रात इतरांना अटकाव होईल असे प्रयत्न केले जातात. त्यासाठी लॉबीइंग, भ्रष्टाचार करुन सरकारी कायदे, अटी, शर्ती ह्या आपल्या व्यवसायाला अनुकूल अशा करुन घेणे, स्पर्धा उभीच राहू नये म्हणून साम-दाम-दंड-भेद नीती वापरणे हे प्रकार केले जातात. ह्यामुळे ग्राहकांना अतिशय मर्यादीत पर्याय उपलब्ध होतात. मर्यादीत पर्यायांमुळे साहजिकच किंमती वाढतात व ग्राहकांकडून अनावश्यकरित्या जास्त पैसे उकळले जातात. ह्यात समान सेवा देणार्‍या उद्योजकांमध्ये स्पर्धाच नसल्याने ग्राहकाला मिळणार्‍या दर्जात कोणतीही वाढ होत नाही. वाढीव दरांचे कोणतेही स्पष्टीकरण नसते. निकृष्ट सेवेसाठी भरमसाठ किंमत मोजणे घडते. ह्यालाच रेंट सिकींग म्हटले जाते. ओळखीचा शब्द म्हणजे 'मोनोपली'. मोबाईलफोनसाठी आवश्यक असणारे रेडीओ-स्पेक्ट्रम हे एक ओळखीचे उदाहरण. तुम्ही-आम्ही निसर्गाकडून मोफत उपलब्ध असलेले स्पेक्ट्रम वापरून स्वत:ची टेलिफोन सेवा सुरु करू शकत नाही, शक्य असले तरी.

'रेंट सीकींग' प्रकार भांडवलवादी अर्थव्यवस्थेच्या आरोग्यास मारक समजले जातात. उद्योजकांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा होऊन ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा-वस्तू कमीत-कमी किंमतीत मिळणे हे अपेक्षित असते ते 'रेंट सिकिंग' प्रवृत्तीमुळे घडत नाही. विशिष्ट घटकांचाच अतोनात फायदा होत असल्याने अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडते आणि एकूणच सामाजिक-राजकिय-आर्थिक रचना धोक्यात येते. हे समाजातल्या सर्व घटकांवर परिणाम करणारे ठरते.

रेंट सिकींग प्रवृत्ती ओळखून तिचा विरोध करणे आवश्यक असते. आपले कायदे अशा वृत्तींना प्रोत्साहन देत नाहीयेत ना ह्यावर कडक लक्ष ठेवणे आवश्यक असते. कृषी-बाजारसमितीतले अडते-दलाल-व्यापारी आणि अंबानी-अदानी दोन्हीही रेंट सिकींग प्रवृत्तीचे प्रकार आहेत.

(सध्याच्या शेतीविषयक कायद्यांच्या संदर्भाने)

Updated : 8 Dec 2020 4:00 AM GMT
Next Story
Share it
Top