Home > मॅक्स ब्लॉग्ज > Zohran Mamdani Oath : New York कुणाचं, तर इथे राहाणाऱ्या प्रत्येकाचं!

Zohran Mamdani Oath : New York कुणाचं, तर इथे राहाणाऱ्या प्रत्येकाचं!

एखादं शहर जेव्हा त्या शहरात राहाणाऱ्या माणसांचं असतं तेव्हा कुठलीही छोट्यात छोटी गरजही पूर्ण होते… कुठलीही व्यक्ती निरोगी राहावी यासाठी ती आजारी पडायची वाट पाहिली जात नाही आणि न्यूयॉर्कला घर मानणारी व्यक्ती कधीही एकटी नसते हे जगाला दाखवून देऊया! - झोहरान ममदानी

Zohran Mamdani Oath : New York कुणाचं, तर इथे राहाणाऱ्या प्रत्येकाचं!
X

Zohran Mamdani Oath झोहरान ममदानीने न्यूयॉर्कच्या महापौरपदाची शपथ घेतली.

Zohran Mamdani Mayor Speech ही शपथ घेताना त्याने केलेलं भाषण काल ऐकलं... सध्या आपल्या आजूबाजूलाही महापालिका निवडणुकांचे वारे वाहात असताना, बातमीदारीच्या निमित्ताने काही मोजके का होईना पण महापौर (आणि त्यांची प्रखर बुद्धीमत्ता!) अशा दोन्ही गोष्टी जवळून पाहिलेल्या असल्यामुळे हा असा सगळ्यांच्या सलोख्याची भाषा करणारा महापौर नाही म्हटलं तरी पुन्हा एकदा जरा भावलाच.

झोहरानने कुरानवर हात ठेवून शपथ घेतली यावरुन आता रान उठवलं जातंय. त्याने उमर खालीदला पाठवलेल्या पत्रामुळेही तो डोळ्यात खुपण्यासाठी अनेकांना नवीन कारण मिळालं आहेच. पण इतरांच्या श्रद्धेच्या, श्रद्धा स्वातंत्र्याच्या आड न येता स्वतःची श्रद्धा जोपासणं, तेही आजच्या काळात हेही बहुसंख्यांकांनी त्याच्याकडून शिकावं असंच आहे.

ज्या मतदारांनी मला प्रचंड बहुमताने निवडून आणलं त्यांचे आभार, तुमचं कुठलंही काम यापुढे अडणार नाही, अशी भाषणं आपण सर्रास ऐकली आहेत. पण ज्यांनी आपल्याला मत दिलेलं नाही त्यांच्यासाठीही आपण उपलब्ध असू हे झोहरानच्या परवाच्या भाषणाचं वेगळेपण...

'न्यूयॉर्कमधलं जगणं अत्यंत आव्हानात्मक असतानाही या शहराला आपलं मानून इथे राहाणाऱ्या आणि आतापर्यंत दुर्लक्षितांचं जगणं जगलेल्या प्रत्येकाचा मी महापौर आहे' असं तो म्हणाला. प्रशासनाकडून कुठल्याही अपेक्षा नसलेले आणि राजकारण म्हणजे दलदल आहे असं मानणारे अनेक जण आजूबाजूला आहेत, त्यांचं ते मत बदलण्यासाठी प्रत्यक्ष कृती हा एकमेव उपाय आहे’ असं म्हणत ‘आपण वेगळ्या/विरोधी विचारांचे असलो तरी तुमच्या प्रत्येक सुखात, दुःखात मी तुमच्याबरोबर आहे आणि एक क्षणही मी तुम्हाला अंतर देणार नाही,’ हे त्या भाषणातले त्याचे शब्द आहेत. आपल्याकडे कुठला महापौर, लोकप्रतिनिधी हे असं काही बोलेल? उलट, 'मत देऊ नकाच, मग बघतो' हीच भाषा आपल्या अधिक परिचयाची आहे, नाही?

झोहरान ममदानीचं संपूर्ण भाषणच मला इंटरेस्टिंग वाटलं.

असं भाषण करणारा, अशा विचारांचा महापौर आपल्याला लाभायची या जन्मात काही शक्यता नाही, पण जगात असा विचार करणारे लोकही आहेत हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झोहरान ममदानीच्या भाषणातील काही भागाचा हा स्वैर मराठी अनुवाद -

“आपल्याला आतापर्यंत केलेल्या प्रॉमिसेसपैकी फार कमी प्रॉमिसेस पूर्ण झाली आहेत, त्यामुळे जे चित्र बदलायला हवं होतं, ते बहुतेक आहे तसंच आहे. या शहराचा कायापालट झालेला ज्यांना बघायचा होता त्यांची प्रतिक्षा संपलेली नाही, उलट त्या प्रतिक्षेचं ओझं दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मला असं सांगण्यात आलंय की हा दिवस तुमच्या अपेक्षा 'रिसेट' करण्याचा आहे. तुम्ही काहीतरी लहानसहान अपेक्षा कराव्यात आणि त्याबदल्यात त्याहून कमी काहीतरी तुमच्या हातावर टेकवण्यात यावं यासाठी मी तुम्हाला 'एन्करेज' करावं, पण मी असं काहीही करणार नाही... लहानसहान अपेक्षा हा विचारच आता आपण जरा 'रिसेट' करुया असं मला वाटतं.

आपण यापुढे धडाडीने कामाला लागूया, आपल्याला प्रत्येक कामात नेहमीच यश येईल असं नाही, पण प्रयत्न करायचं धाडसही आपण दाखवलं नाही ही रुखरुख तरी भविष्यात लागून राहाणार नाही. तुमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मला मिळालेल्या सत्तेचा वापर करायला मी अजिबात मागेपुढे पहाणार नाही, हा माझा आज तुम्हाला शब्द आहे.

न्यूयॉर्क कुणाचं या प्रश्नाचं वर्षानुवर्षे उत्तर ‘धनिकांचं आणि थोरामोठ्यांचं, त्यांच्यात उठबस असलेल्याचं’ असंच होतं. न्यूयॉर्क ही फक्त बड्या लोकांची मक्तेदारी नाही असं मानणारे महापौरही गेल्या काही वर्षांत इथे झाले. हे शहर गरिबांचं आणि श्रमिकांचंही असावं यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, पण त्या सगळ्यांनाच काही खूप यश आलं नाही. मात्र, सरकारने त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर ते शक्य आहे हे मात्र त्यांच्या कृतीतून दिसलं. तेच प्रयत्न पुढे नेताना मला माडिबांच्या, म्हणजे नेल्सन मंडेलांच्या शब्दांत असं म्हणावंसं वाटतंय की न्यूयॉर्क कुणाचं, तर इथे राहाणाऱ्या प्रत्येकाचं!

यापुढे न्यूयॉर्कची कहाणी आपण सगळे मिळून नव्याने लिहूया. ही कहाणी इथल्या मुठभर श्रीमंतांची नसेल… गरीब विरुद्ध श्रीमंतांची नसेल. ती असेल स्वतःला न्यूयॉर्कर म्हणवणाऱ्या प्रत्येकाची - इथे राहाणाऱ्या साडेआठ मिलिअन लोकांची! ही कहाणी लिहिणारं कुणी पश्तू बोलत असेल तर कुणी मॅंडरीन… कुणी मशिदीत प्रार्थना करत असेल तर कुणी चर्च, गुरुद्वारा किंवा मंदिरात! अनेक जण असतील जे प्रार्थनाही करत नसतील! ही कहाणी त्यांचीही असेल! ती लिहिणाऱ्यांमध्ये रशियन ज्यू निर्वासित असतील, इटालियन्स आणि आयरिश असतील… कोणे एके काळी बऱ्या आयुष्याच्या शोधात इथे आलेले आणि ते स्वप्न विरलं असेही अनेकजण असतील. मार्बल हिल परिसरात, सबवे गेल्यावर धडधडणाऱ्या भिंतीच्या घरांमध्ये राहाणारे तरुण, तुटपुंजे पगार आणि मेहनत यांच्याशी दोन हात करत स्वतःच्या घरांमध्ये राहाणारे ब्लॅक घरमालक आणि सर्वसमावेशकतेची भाषा बोलणारे राजकारणी आपल्याला कसे सहज वगळतात याचा अनुभव घेणारे बे रिजमधले पॅलेस्टिनी न्यूयॉर्कर्स - नवी कहाणी या सगळ्यांची असेल.

याच्या दुसऱ्या टोकावरचं आयुष्य जगणारेही काही मोजके न्यूयॉर्कर्स असतीलच. मला मत देण्याच्या वर्षभर आधी त्यांनी प्रेसिडंट ट्रंपना मत दिलं असेल. त्यांच्या पक्षाने त्यांचा भ्रमनिरास केला असेल. आपल्याला अपेक्षित असलेल्या भाषेत ते कदाचित बोलणारही नाहीत. अनेक वर्ष सभ्य राजकीय मुखवट्यांचा वापर क्रुरतेवर पांघरूण घालण्यासाठीच झालाय. त्यामुळे यातल्या अनेकांचा आता व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या अपेक्षा आणि स्वप्नही आपल्यासाठी महत्त्वाची आहेत.

या शहरात राहाणारे हे सगळे समुदाय आतापर्यंत वेगवेगळे जगले असतील तर आता आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणू. तुम्ही कुठे राहाता, काय खाता, प्रार्थना कुठे, कशी करता, कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा आपण सगळे ‘न्यूयॉर्कर्स’ या एकाच झेंड्याखाली एकत्र येणं आवश्यक आहे. आपण सगळे साडेआठ मिलियन लोक आता या नव्या काळाच्या भाषेत बोलू. खणखणीत आणि स्पष्ट. आपल्या जिवाभावाच्या न्यूयॉर्क सारखंच! आपल्या या लाडक्या न्यूयॉर्कमध्ये बराच काळ स्वातंत्र्य हे पैसेवाल्यांची मक्तेदारी होतं. यापुढे ते तसं नसेल, ते सगळ्यांसाठी असेल!

सिटी हॉलच्या कार्यपद्धतीत यापुढे बदल होतील. एखाद्या कामासाठी ‘नाही’ म्हणण्याऐवजी ती ‘कशी’ करता येईल हे आम्ही बघू. लोकशाही आम्हीच चालवतो अशा भ्रमात जगणाऱ्या मोजक्या धनिक आणि सरंजामदारांनाच नाही तर अगदी सर्वसामान्यांनाही आम्ही उत्तरदायी असू. मला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून तुम्ही निवडून दिलंत, मी माझा कारभारही डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणूनच करेन. तुम्ही मला ‘रॅडिकल’ म्हणाल या भितीने मी माझ्या मुल्यांशी कधीही तडजोड करणार नाही, कारण कुणीतरी म्हटलंय तसं, मूठभर लोकांकडे सगळं असणं आणि बहुसंख्य लोकांकडे मात्र साध्यासुध्या गोष्टीही नसणं हे खरं ‘रॅडिकल’ असणं आहे, ते तसं असणं मला मान्य नाही!

आपण आजपासून जे करणार आहोत त्याचे पडसाद दूरपर्यंत उमटणार आहेत. अनेकांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. डावे काय आणि कसं राज्य करतात हे त्यांना पहायचं आहे. त्यांचे संघर्ष दूर होतात की नाही आणि त्यांना पुन्हा नवीन आशा ठेवायला जागा आहे की नाही याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यामुळेच न्यूयॉर्कर्सना जे सगळ्यात चांगलं जमतं ते आपण करु, ते म्हणजे आपल्या कृतीतून एक उदाहरण घालून देऊ. एखादं शहर जेव्हा त्या शहरात राहाणाऱ्या माणसांचं असतं तेव्हा कुठलीही छोट्यात छोटी गरजही पूर्ण होते… कुठलीही व्यक्ती निरोगी राहावी यासाठी ती आजारी पडायची वाट पाहिली जात नाही आणि न्यूयॉर्कला घर मानणारी व्यक्ती कधीही एकटी नसते हे जगाला दाखवून देऊया!

मित्रांनो, काम आत्ता कुठे सुरु झालंय, आणि ते सुरुच राहील, पुढे जाईल, जात राहील!”

स्वैर मराठी अनुवाद - भक्ती बिसुरे.

(भक्ती बिसुरे यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

Updated : 5 Jan 2026 5:22 PM IST
Next Story
Share it
Top