Home > मॅक्स ब्लॉग्ज > दारुबंदी: नेमकी 'ही' जनता कोण आहे?

दारुबंदी: नेमकी 'ही' जनता कोण आहे?

दारुबंदी उठवल्यानंतर नक्की कोणाचा फायदा होणार? अलिकडे विजय वड्डेटीवार यांनी दारुबंदी उठवण्याची जनतेनं मागणी केल्याचं म्हटलं होतं? मात्र, लोकप्रतिनिधी जेव्हा ही जनतेची मागणी आहे. असे म्हणतात तेव्हा ही नेमकी कोणती जनता आहे? की पक्षाच्या टोप्या व मफलर घालून हिंडनारे भाडोत्री कार्यकर्ते आहेत? असा सवाल तरुण सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चुनारकर यांनी एका पत्राद्वारे राज्यकर्त्यांना विचारला आहे...

दारुबंदी: नेमकी ही जनता कोण आहे?
X

तरुणाचे तरुणांना पत्र:
प्रिय मित्र-मैत्रिणींनो
नमस्कार !

मी रवींद्र चुनारकर. मुळचा गडचिरोलीतील अहेरी तालुक्याचा असून शिक्षणाने इंजिनिअर आहे. मागील चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये ग्रामविकासासाठी काम करतोय. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्यासाठी काही हालचाली सुरु झाल्या आहेत, यावर बोलणे आता गरजेच आहे. संपूर्ण जनतेचा दारूबंदीला विरोध आहे असा संभ्रम पसरवून, दिशाभूल करून जे पाऊले उचले जात आहेत. यावर खऱ्या माहितीचा आधार घेऊन बोलन अत्यंत महत्वाचे झाले आहे.

१९९३ पासुन गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे. म्हणजेच माझ्या जन्मापासून मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खुलेआम उघडी दारूचे दुकाने, बियरबार ह्या गोष्टी कधीच बघितल्या नाहीत. त्याच एक आंतरिक समाधान आहे. सामजिक क्षेत्रात काम करावं असं ठरवल्यावर कॉलेज जीवनात असतांना गावातील युवकांना एकत्र करून काय केल्या जाऊ शकेल? ज्यामुळे गावात शांतता व समृद्धता नांदेल असा विचार केला. तर सगळ्या युवक व महिलांचे अस एकमत झाले की गावातील अवैध दारू सर्वात आधी बंद व्हायला पाहिजे. पार्श्वभूमी सांगण्याचं कारण हे की गडचिरोलीतील दारू ही फार मोठी समस्या आहे.

मुळात दारूचा सर्वात मोठा परिणाम हा महिलांवर व घरातील लहान मुलांवर होतो. दारू पिणाऱ्या पुरुषांकडून त्यांना प्रचंड शारिरिक व मानसिक त्रास होता. दारूबंदी उठवावी असे जे म्हणतात. 'खरंच त्यांना आपल्या घरच्या महिलांकडून तरी पाठींबा असेल का?' हो, हा एक प्रश्नच आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की, जे लोक दारूबंदी उठवावी असा सूर लावत आहेत. ते महिलांवर होणाऱ्या अत्याचार, शारीरिक आणि मानसिक छळाला समर्थन देणारी मंडळी आहे. आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लग्न जुळवताना आपला एक प्रश्न ठरलेला असतो. तो म्हणजे मुलगा दारू पितो का? कारण हे वास्तव आहे की दारुचे व्यसन व दारू ही फार मोठी समस्या आहे.

या समस्येला संपविल्याशिवाय विकास होणे नाही, कुटुंबात शांतता नाही, पैसा टिकणार नाही. सगळ्यात जास्त घरगुती भांडणाचे कारण ही दारूच असते. कित्येक लोक दारू पिऊन अपघातात मरतात. दारू पिल्याने लिवर खराब होऊन अथवा दारू पिऊन अपघाताने मरण पावलेल्या आपला जवळच्या लोकांना खांदा देणारे पण याच समर्थन करतील का? हा माझा प्रश्न आहे. दारू ही मौजेची वस्तूच नाही. त्याच्यामुळे युवकांना माझं हे आवाहन आहे की, दारूच्या ग्लासापासून स्वतःला दूर ठेवा. स्थानिक लोक प्रतिनिधी जेव्हा ही जनतेची मागणी आहे. असे म्हणतात तेव्हा सगळ्यांना कळू द्या की ही नेमकी कोणती जनता आहे? तुमच्या पक्षाच्या टोप्या व मफलर घालून हिंडनाऱ्याना भाडोत्री कार्यकर्त्यांना तुम्ही जर जनता म्हणत असाल तर ते चुकीचं आहे.

आता राहिली गोष्ट अवैध दारूची, मुळात कायदा व सुव्यवस्था राखणे व नियमांची कठोर अंमलबजावणी करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. तर नेमक कोण कोणाला दारूबंदी फसवी आहे असं म्हणावं हा पण एक प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ही भाजप सत्तेत असतांना झाली. आताच सरकार असं म्हणत की चंद्रपूरची दारूबंदी फसवी आहे. मग तुमच्याकडे आता संधी आहे की, त्या फसव्या दारूबंदीला यशस्वी दारूबंदी करून दाखवणे. ना की दारूबंदी उठवणे. आपल्या नेतृत्व गुणाचा वापर करून दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करावी. अशी माझी युवक म्हणून विनंती आहे.

गडचिरोलीतील ग्रामीण व आदिवासी भागात काम करतांना लक्षात आले आहे की, प्रत्येक सभा आणि ग्रामसभामध्ये महिला, युवा आणि लहान बालकांकडून दारूबंदी व्हावी व कुठेही अवैध दारू मिळू नये अशीच मागणी असते. हे वास्तव आहे की व्यसनाधीन तरुण काय देशाचं, गावच किंवा कुटुंबाचं भवितव्य ठरवू शकणार. आता सरकारने हे ठरवायला पाहिजे की त्यांना देश घडवणारे युवक पाहिजेत की नशेत डूबलेले व गटारीत लोळलेले तरुण पाहिजेत. आजकालच्या युवकांवर जाहिरांतीचा फार मोठा प्रभाव पडतो काय तर म्हणे मार्क ऑफ प्यूरीटी.

दारूचा खोटा ब्रैंड अम्बेसिडर तथाकथित आदिवासी नेत्यांना एक सामन्य व सजग तरुण म्हणून विनंती आहे की हे दारूबंदी उठवण्याचं थोतांड बाजूला ठेऊन गडचिरोली जिह्यातील खऱ्या, ज्वलंत व आवश्यक समस्या सोडवाव्यात. किती तरी आदिवासी लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नाहीत. त्यामुळे ते अनेक योजनांपासून व परिणामी शिक्षण व नौकरी पासून ते वंचित आहेत. वनहक्क कायदा येऊन १४ वर्ष झाली आहेत. अजूनही आदिवासी लोकांकडे वैयक्तिक जमिनीचा अधिकार पत्र नाही. सामुहिक वनाचा पट्टा नाही. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून गडचिरोली जिल्ह्याच्या उज्ज्वल व निर्व्यसनी भविष्याकडे लक्ष देण्यात यावे. महसूल डूबतोय म्हणून गडचीरोलीचाचा विकास थांबला आहे. असे म्हणणाऱ्यांनी एकदा दारूच्या महसुलाचे अभ्यास करणे गरजेचे आहे.

युवक म्हणून माझी तयारी आहे की वेळ पडल्यास एक टाईम जेवण करून राहील. पण अशा पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास नको. ज्यात कितीतरी महिलांच्या आक्रोश आहे. दारूमुळे अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे आहेत. सोबत शिकलेला मित्र जेव्हा दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्याची मुलगी व २०-२१ वर्षाच्या पत्नीला ठेऊन जातो. या दु:खाची खरंच आपण कल्पना करू शकू का? त्या निरागस मुलीचा काय दोष? दारूबंदी उठवा म्हणणाऱ्यांनो त्या मुलीच्या नजरेला नजर देऊ शकाल का?

प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक ना एक उदाहरण आहे. की ज्याचं दारूमुळे आयूष्य उध्वस्त झालं आहे. तरी आपण दारूबंदी उठवण्याचं समर्थन करणार का? हा प्रत्येकांनी विचार करण्याचा विषय आहे. हे बघा मित्रांनो आपणच त्या नेत्यांना निवडून दिलं आहे. आपले योग्य ते नेतृत्व करतील व आपल्या भागातील विकासाला चालना देतील. म्हणून, पण जर ते चुकत असतील तर मूकपणे त्यांच्यासोबत न जाता आपल्याला विरोध करावाच लागेल. वैयक्तिक कुणाचाही राग नाही. पण दारूबंदी उठवण्यास सत्याग्रही मार्गाने कठोर विरोध राहील.

-

रवींद्र चुनारकर

( लेखक सामाजिक कार्यकर्ते असून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामविकास करण्यासाठीचे काम करतात)

Updated : 5 Nov 2020 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top