Delhi Blast वारंवार इंटेलिजन्स फेल्युअर का होते?
X
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारच्या स्फोटाचे मीडियातील फोटो पाहून पोटात खड्डा पडला. एनएसजी तपास करीत आहे. तपासाची पूर्ण माहिती हाती येईपर्यंत त्यावर भाष्य करणे आततायी आणि राजकारण करणारे ठरेल. पण आजवरच्या अपघातांच्या आणि घातपातांच्या नंतर केंद्र सरकारने ज्यापध्दतीने तपास केला आहे ते पाहता या दुर्घटनेचा तपास प्रामाणिकपणे होईल का? यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटना घडली त्याचदिवशी त्या घटनेचा पूर्ण तपास होणार नाही असं भाकीत मी केले होते. माझा एका अत्यंत निकटवर्तीय संघ स्वयंसेवक युवा मित्राने माझ्या त्या भूमिकेबद्दल माझ्याकडे आक्षेप नोंदवला होता. मीदेखील तो आक्षेप अतिशय प्रामाणिकपणे स्विकारला होता. अगदी महाभारतात गांधारीने दिलेला श्राप श्रीकृष्णाने हसतमुखाने स्विकारला त्याच भावनेने मी मित्राचा आक्षेप स्विकारला होता.
पण आजच्या घडीला अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास पाहिला तर माझीच भूमिका योग्य होती याची प्रचिती येते. संपूर्ण तपास यंत्रणेने पायलटला दोषी ठरवले. तज्ञ आणि अभ्यासक तपासाच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. अर्थात अशा तज्ञांना, अभ्यासकांना फाट्यावर मारणे २०१४ नंतर सर्वसाधारण बाब आहे.
भारतासाठी हा तपास केव्हाच संपलेला आहे. मात्र कोणीतरी नैतिकतेची चाड असलेला सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता, अशी भूमिका घेऊन एकाही लढत असतो. तसेच १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) दुर्घटनेबाबत मायक अँड्र्यूज (Mike Andrews) नावाचा एक वरिष्ठ अमेरिकन वकील आणि विमान दुर्घटना तज्ज्ञ पारदर्शक तपासासाठी अमेरिकेत लढत आहे.
१२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी अमेरिकेच्या फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट अंतर्गत अमेरिकेच्या फेडरल अॅविएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड कडे ब्लॅक बॉक्स डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, ही मागणी पीडित कुटुंबीयांच्या न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. त्यांचेकडील दस्तऐवज सांगतात की, अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या काही आठवडे आधी मे २०२५ मध्ये फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीट्रेशन ने बोईंग ७८७ विमानांमध्ये वॉटर लीक समस्या असल्याचे निर्देश जारी केले होते, ज्यात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बेस मध्ये पाणी गळतीमुळे उपकरणे बदलावी लागल्याचे सांगितले होते.
अँड्र्यूज यांचा असा युक्तिवाद आहे की, ही समस्या दुर्घटनेचे मुख्य कारण असू शकते, आणि ब्लॅक बॉक्स डेटा हे सिद्ध करेल. ही मागणी बोईंगविरुद्ध अमेरिकेत खटला दाखल करण्याच्या तयारीचा भाग आहे. अँड्र्यूज म्हणतो, 'जर डेटा सिस्टम फेल्युअर दाखवत असेल, तर पायलट्सवर दोष टाकणे चुकीचे आहे.' मात्र भारताप्रमाणेच अमेरिकेतही बोईंगला वाचवण्यासाठी डेटा दडपला जात आहे.
अमेरिकेतील तपास अजून पूर्ण नाही. अंतिम अहवाल डिसेंबर २०२५ पर्यंत येण्याची शक्यता आहे. अँड्र्यूजची जर मागणी मान्य झाली, तर डेटा सार्वजनिक होऊन बोईंगविरुद्ध खटला मजबूत होईल. मात्र तसे होण्याची चिन्हे कमी आहेत. जगाच्या पाठीवर सर्वच सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालायचे असते. मानवी जीव मात्र हकनाक जातात.
दिल्लीतही काही वेगळे झालेले नाही. बिहार विधानसभा निवडणूकीचा दुसरा टप्पा शिल्लक असताना स्फोट होणे आणि गोदी मेडीयाने पाकिस्तान कनेक्शन जोडणे यात शंका उपस्थित करण्यासारखे किंवा नवल वाटण्यासारखं काहीच नाही. पुलवामाचा तपास झाला का? अहमदाबाद दुर्घटनेचा तपास समोरच आहे. प्रदीप कुरुलकर वरती किमान देशद्रोहाचा खटला तरी भरला का?
वारंवार इंटेलिजन्स फेल्युअर का होते? कोणाचीही जबाबदारी निश्चित होत नाही. कोणावरही कारवाई होत नाही. नैतिकता दाखवून कोणीही राजीनामा देत नाही. जीव मात्र सामान्य माणसाला गमवावा लागतो. ज्यांची हकनाक कर्ती माणसे जातात त्या कुटुंबातील सदस्य दररोज थोडे थोडे मरत असतात. एका क्षणात आयुष्य उध्वस्त होते.
अपघात / घातपात धर्म, जात, पंथ, पक्ष विचारुन होत नाही. कोणासोबतही हे घडू शकते. आणि हे घडू नये यासाठीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नावाचे पांढरे हत्ती जनतेच्या पैशातून पोसायचे असतात. देशाच्या राजधानीत एवढी मोठी दुर्घटना घडली, जीव गेले असताना स्वतःला प्रधानसेवक, चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान भूतानच्या चौथ्या राजाचा ७० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी चालले आहेत हा लोककेंद्री कारभार आहे?
बिहार राज्यात निवडणूक आयोगाने Special Intensive Revision द्वारे विशेष मदत करुनही निवडणूकीचा पहिला टप्पा अवघड गेला असेल तर अशा घटना घडणे स्वाभाविक आहे. अशा घटनांवरुन पंतप्रधानांना नैतिकतेच्या आधारे प्रश्न उपस्थित करणे देशद्रोह आहे. आपल्या सारख्या नैतिकेची चाड असलेल्यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे की, जोपर्यंत रक्तामांसाचा चिखल होत नाही तोपर्यंत गिधाडे खूश होत नाहीत.
असो, स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय बांधवांना भावपूर्ण श्रध्दांजली.
तुषार गायकवाड
शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता
मो.९०१११२१३१२
ईमेल - [email protected]






