Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > बहुजनांचे खरे देव कोणते?

बहुजनांचे खरे देव कोणते?

खंडोबा, सकरोबा, बिरोबा, भैरोबा, साती आसरा या ग्रामीण भागातील बहुजनांची देवदेवतांची जागा गणपती, सरस्वती, तीनमुखी दत्त, श्रीराम, विष्णू, श्रीकृष्ण, लक्ष्मी ने कशी घेतली? बहुजनांचे खरे देव कोणते? वाचा आनंद शितोळे यांचा लेख

बहुजनांचे खरे देव कोणते?
X

Courtesy -Social media

संस्कृतीचा पाया जसा व्यक्त होण्याची भाषा असते. तसाच तश्याच संस्कृतीच्या ठळक पाऊलखुणा सामान्य माणसांच्या प्रथांमध्ये सापडतात. त्यांचा अभ्यास केला, नीट संगती लावली तर आपण नेमके कोण? याचाही शोध लागतो. तसाच आपण कुणाच्या पालखीचे भोई होतोय. याचाही साक्षात्कार होतो. तीन चार पिढ्या आधी पर्यंत देवदेवता आणि कुळाचार पण वेगवेगळे असायचे. लोकांचे ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भेद ठळकपणे जाणवायचा. सार्वजनिक गणपती ही भानगड नव्हती ना? चौकात रस्यावर मांडव घालून घट बसवले जात नव्हते.

तेव्हा गणपती, सरस्वती, तीनमुखी दत्त, श्रीराम, विष्णू, श्रीकृष्ण, लक्ष्मी ह्या देवता शक्यतो कोकणात आणि मुंबई भागात जास्त करून पुजल्या जात. अष्टविनायक म्हणा किंवा एकुणात गणपती पूजनाचा जामानीमा जास्त करून तथाकथित अभिजन वर्गाची मक्तेदारी होती. भवानीमाता, अंबाबाई ( जिला महालक्ष्मी करण्याचा बळेच घाट घातलाय सध्या ) ही साडेतीन पीठ, नाथपंथीय, म्हसोबा, खंडोबा, सकरोबा, बिरोबा, भैरोबा हे सगळे शंकराचे गण आणि खुद्द शंकर, साती आसरा हे सगळं ग्रामीण भागात बहुजनांचे देवदेवता पूजले जायचे.

पुजण्याच्या पद्धती वेगवेगळ्या न सगळाच कारभार वेगळा. यामध्ये एक महत्वाचा फरक पटकन लक्षात येणारा. बहुजन समाज ज्यांचे कुळाचार पाळतो. त्या देवीची, खंडोबाची आरती-जागरण-गोंधळ-कवन-कलगीतुरा यामध्ये असणारी भाषा ही निखळ ग्रामीण बोलीभाषा असते. वारकरी पंथाने केलेल्या अभंग आणि सगळ्या रचना प्राकृत भाषेत आहेत. मात्र, अभिजनांची स्तोत्र वगैरे सगळं संस्कृतमध्ये आहे. अपवाद गणपतीची आरती.

जेजुरी, पाल, जोतीबा, कोरठण, औरंगाबाद जवळ सातारा ही सगळी खंडोबा ची देवस्थान. बहुजन वर्गातल्या लोकांची त्या त्या भागानुसार कुलदैवत ठरलेली. बाकी गावच्या ग्रामदैवताची पूजा आणि मान वेगळाच. अगदी सार्वजनिक गणपती महाराष्ट्रात सुरु झाल्यावर सुद्धा गणपती सार्वजनिक होता. ग्रामीण भागात घरात गणपती बसवण्याची पद्धत देशावर नसावी. पंढरीचा विठोबा त्याच सगळंच वेगळं. आताआता पर्यंत वारीत क्वचित बोडक्या डोक्यानं माणूस दिसायचा. सगळी पांढऱ्या टोप्या नाहीतर फेटे असायचे.

जसं जसं गाव शहरात आणि शहर गावात यायला लागलं. माणसांची सरमिसळ व्हायला लागली. आर्थिक स्तर बदलायला लागले तसतशी बहुजन वर्गाची अदृश्य असलेल्या वरच्या पायरीवर, अभिजन होण्याची लालसा, इच्छा समोर यायला लागली. दरम्यान, सार्वजनिक म्हणून सुरु झालेला गणपती पार गाव खेड्यात थेट लोकांच्या घरात पोहोचला. मागेमागे गौरी इकडं महालक्ष्मी बनून आल्यात आणि चांगल्याच स्थिरावल्यात. एरवी देवघरात खाजगीरित्या बसणारे घट आता थेट रस्त्यावर मंडप घालून बसायला लागलेत. रामनवमी , गोकुळाष्टमी दणक्यात साजरी व्हायला लागलीय.

ज्योतिबा-खंडोबा आणि तुळजापूर-अंबाबाई-सप्तशृंगी ह्या मोजक्या सोडल्या तर बाकी भैरोबा , रोकडोबा , बिरोबा , सकरोबा साईडला पडलेत. आता वारी एक इव्हेंट झालाय. हवशे नवशे गवशे सगळेच एन्जॉय करायला वारीत जातात, पण विठ्ठल अजूनही अभिजनात मुरलेला नाही. अगदी शास्त्रीय गायकांनी सवाई मध्ये त्याची भजन गायली तरी विठ्ठल तिथच सवाईच्या मंडपात मर्यादित आहे. अजून त्यानं अभिजनांचा उंबरा ओलांडला नाही. हा देवतांचा बदललेला प्रवासही बरंच काही सांगतोय.

त्यात पुन्हा गणपती शंकर मुळात आर्य कि अनार्य, स्त्रीरूपातली देवी आर्य की अनार्य, कुठले वैदिक देव कुठले सिंधू संस्कृती मधले? ह्या सगळ्याच्या खोलात गेलं तर आपण कोण आहोत? ह्याचा उलगडा नक्कीच होईल. ह्या देवतांचा प्रवास समजला, नक्की कोणी कुणाला पळवलं आणि कोण कुठे रूप बदलत गेलं हे समजल तर मग आजचा वैदिक धर्म वेगळा आणि हिंदू धर्म म्हणवला जाणारा सिंधू संस्कृतीशी, द्रविड संस्कृतीशी जवळीक सांगणारा स्थानिक लोकांचा धर्म वेगळा हेही आकलन सोप होईल.

आपण हिंदू म्हणून नक्की का आणि कशासाठी उर बडवतोय आणि कुणाच्या पालख्याचे भोई होतोय ह्याचाही उलगडा नक्कीच होईल. घरातलं देवघर आणि त्यामधले देव, त्यांची वर्गवारीही समाजातले बरेच नवे जुने प्रवाह, बदललेले संदर्भ सांगून जातेय. फक्त अभ्यासण्याची गरज आहे हे नक्की.

Updated : 17 Oct 2020 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top