Home > Top News > दुग्ध व्यवसाय विदर्भासाठी ठरेल वरदान !

दुग्ध व्यवसाय विदर्भासाठी ठरेल वरदान !

दुग्ध व्यवसाय विदर्भासाठी ठरेल वरदान !
X

विदर्भात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, संत्रा या प्रमुख पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक पाहायला मिळतो. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या पिकांच्या शेतीतून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे तसा नफा मिळतांना दिसत नाही.

विदर्भात कापूस गरजेपेक्षा जास्त पिकतो, सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचा नीट जम बसला नाही. धान व संत्रा शेती मर्यादित भागात होते. मात्र दुग्ध व्यवसाय विदर्भासाठी वरदान ठरू शकतो. दुग्ध व्यवसाय विदर्भाचे चित्र पालटू शकतो. यासाठी सुनियोजित पद्धतीने सरकार व इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी देशासाठीची व शेतकऱ्यांसाठीची मोहीम म्हणून या व्यवसायाकडे पाहण्याची गरज आहे.

दुग्ध व्यवसायाचे इतर पिकांच्या तुलनेने महत्व बघितले तर दुग्ध व्यवसाय हा संपूर्ण विदर्भात कोणत्याही जिल्ह्यात करता येऊ शकतो. इतर शेत पिकांच्या तुलनेने दुग्ध व्यवसाय 365 दिवस शेतकऱ्यांना पैसा कमावून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कायस्वरूपी रोजगार निर्मिती होते व सर्वात महत्वाचे म्हणजे दूध हे जीवनावश्यक असल्याने आर्थिक मंदी किंवा कोरोनासाख्या महामारीच्या काळात देखील हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्र किंवा गुजरात घ्या, तिथल्या शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसायाला मुख्य व्यवसाय मानले आहे. पुढे त्याला सहकाराची जोड दिली. त्यामुळे एक मोठी स्वतंत्र ग्रामीण अर्थव्यस्था दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या भागात उभी राहिली. रोजचे दूध व रोज पैसा शेतकऱ्यांच्या हाती खेळू लागला. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली व पुढे आर्थिक सुबत्तेमुळे शेतकऱ्यांच्या इतर समस्या देखील सुटल्या.

हे ही वाचा..

विदर्भात देखील हे होऊ शकते. एकदा शेतकऱ्यांच्या हातात दुधाचा पैसा यायला लागला तर उर्वरी शेती खर्चासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी सावकाराच्या दारात जावे लागणार नाही. मदरडेअरीच्या माध्यमातून विदर्भातील काही भागात एक सुरवात झाली आहे. पण शेतकऱ्यांमध्ये या व्यवसायाबाबत आणखी जागृती करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसायाच्या इतिहासाची पाने चाळून बघितली तर १९६० मध्ये आपल्या राज्यातील प्रतिदिन सरासरी दूध संकलन १ लाख लीटर इतके होते. आज ते जवळपास २२० लाख लीटर प्रतिदिन एवढे ते वाढले आहे. यात विदर्भाचा वाटा फक्त २ लाख लिटर आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला शेती प्रमाणेच प्रमुख व्यवसाय म्हणून बघितले जाते. यासाठी ते महाराष्ट्र राज्यात दूध संघाची मोठी मदत घेतात. चांगल्या जातीच्या जनावराची निवड करण्यापासून तर, त्यांना लागणार हिरवा चारा, जनावरांचा पोषक आहार, गोठ्यांची बांधणी, दुधाचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया, पॅकेजींग करण्याकरीता सुविधा या सर्व गोष्टींबाबत संबंधित दूध संघाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील दुधाचे संकलन करून ते शहरी भागात आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीपासून शासकीय दूध योजनेपर्यत एक साखळी निर्माण करण्यात आली. गाव स्तरावर प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका व जिल्हा स्तरावर दूधसंघ व त्यांच्या मार्फत शासनाकडे दूध पुरवठा अशा तऱ्हेची ही साखळी आहे.

१९६० पर्यंत फक्त मुंबईसाठी असलेले शासकीय दूध वितरण हळूहळू महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये सुद्धा सुरु करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पुणे, नागपूर, नाशिक ई. शहरांचा समावेश होत गेला. १९८५ ते ९० च्या काळापर्यंत हे सहकाराचे जाळे विदर्भात देखील होते. मात्र इथल्या राजकारण्यांनी मतांच्या समीकरणात कापसाला अधिक महत्व दिले व दुधाची सहकार चळवळ दुर्लक्षित झाली. पुढे कापसाच्या आंदोलनातून बोनस पलीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हातात खूप काही मिळाले नाही. आता कापसाचा पण बोजवारा उडाला व दुग्ध संघ पण बंद पडले.

विदर्भाच्या लोकप्रतिनधींनी दूध व्यवसायाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतले महत्व समजून घेतले नाही. त्यामुळे ते दुग्ध व्यवसायाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देऊ शकले नाही. विदर्भात दुग्ध व्यवसायाला शेतीच्या जोडधंद्याच्या नजरेतून आपण बघतो व चूक करतो. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा जोड धंदा नसून शेतीप्रमाणेच मुख्य व्यवसाय आहे. त्याला मुख्य व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे.

हे ही वाचा..

विदर्भात दुग्धव्यवसाय रुजवायचा असेल तर याचे चार टप्पे आहेत. सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने यानुसार आपल्याला पुढे जावे लागेल. पहिला टप्पा म्हणजे विदर्भाच्या हवामानाला अनुकूल दुभत्या जनावराची जात ओळखणे. त्यासाठी उत्कृष्ट जातीची संकरित दुभती जनावरे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. विशेष म्हणजे एका वेळेला अधिकाधिक दूध देणारी जनावरे. याचा अभ्यास आपली विद्यापीठे व सरकारी संस्थांकडे आहे.

दुसरा व अत्यंत महत्वाचा टप्पा तो म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन. जनावराच्या चाऱ्यावर होणारा खर्च हे दुग्ध व्यवसायाच्या नफा तोट्याचे समीकरण ठरवत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हिरवा चारा आपल्या शेतात पिकवला तर चाऱ्यावर होणार अतिरिक्त खर्च कमी होतो. असे केले तरच मार्केट दरात दूध देणे शेतकऱ्यांना परवडते. नाहीतर दूध व्यवसाय तोट्यात जातो. त्यामुळे आज भारत ज्या भागात दुग्ध व्यवसाय विकसित झाला, तेथे शेतकरी जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची बारमाही सोय तिथले शेतकरी करतात. त्यामुळे त्यांचा चाऱ्यावर होणार खर्च कमी होतो व पोषण आहारापुरता मर्यादित राहतो.

तिसरा टप्पा , दुग्ध व्यवसायात कुटुंबाला कायमस्वरूपी 365 दिवस काम करण्याची सवय व तयारी असणे आहे. म्हणजे एखाद्या घरी दुधाचा व्यवसाय असेल तर जनावरे चारणारा, हिरवा चारा व पोषक आहार तयार करणारा, दूध काढणारा, गोठा साफ करणारा, दूध वितरणाला नेणारा हे कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांचे काम असते, काही ठिकाणी या कामासाठी नोकर पण असतात. हे रोजच करायचे काम असल्याने काम करण्याची सवय लावणे हा तिसरा टप्पा आहे. शेवटचा चौथा टप्पा तो म्हणजे पुढे दुधाचे संकलन करून प्रक्रिया केंद्रात पोहोचवणे. या चार टप्प्यांवर आधारित यंत्रणा एकदा का उभी झाली की दुग्ध व्यवसायाच्या अर्थचक्राचे चाके फिरू लागतात. एकदा का हे चक्र वेगाने फिरू लागले की यालाच शास्त्रीय भाषेत धवलक्रांती म्हणतात.

आज जगात दुधाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश भारत आहे . जगाच्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा जवळपास २० टक्के आहे. मात्र आपली लोकसंख्या व मागणीच्या मानाने हे उत्पादन खूप कमी आहे. अमेरिका, डेन्मार्क, न्यूझीलंड, जर्मनी, फ्रांस, स्विझर्लंड यासह अनेक प्रमुख दूध उत्पादक देशांमध्ये दूध व्यवसाय कॉर्पोरेट स्तरावर केला जातो. त्यामुळे हे देश दूध व्यवसायात आपल्या पुढे दिसतात. या देशात मोठमोठे डेअरीफार्म पाहायला मिळतात. जेथे हजारोंच्या संख्येने जनावर एका फार्ममध्ये असतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतात. त्याच्याकडे वातावरण अनुकूल आहे आणि उत्कृष्ट संकरित जनावरं आहेत. त्यांची दूध देण्याची क्षमता आपल्या जनावरांपेक्षा सहा ते आठपट अधिक आहे. आपली एक गाय १० ते १५ लीटर देत असेल तर त्यांची एक गाय ५० ते १०० लिटर पर्यंत दूध देते. त्यांचा उत्पादन खर्च आपल्या तुलनेने कमी नसला तरी उत्पादन अधिक असल्याने दुग्ध व्यवसाय त्यांच्यासाठी अधिक नफ्याचा आहे.

भारतात दूध सहकारी संस्था अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. गुजरातमधील अमूल घ्या किंवा महाराष्ट्रातील गोकुळ,वारणा, महानंदा घ्या. या संस्थांनी शेतकऱ्यांना न्याय देत अधिकाधिक नफा मिळवून दिला. यांचे दूधसंघ एका दिवसाला करोडोची आर्थिक उलाढाल करतात. एकट्या पुणे जिल्ह्यात दरदिवसाला २४ लाख लिटर दुधाचे संकलन होते. तर संपूर्ण पुणे विभागात रोज दिवसाला ६८ लाख लिटर दुधाचे संकलन होते. उत्पादन खर्च वजा करता प्रति लिटर १० रुपये नफा जरी पकडला तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज दिवसाला २ कोटी ४० लाख मिळतात व पुणे विभागातील शेतकऱ्यांना रोज दिवसाला ६ कोटी ८० लाख रुपये मिळतात. त्यामुळे या ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा विशेष सामना करावा लागत नाही.

हे ही वाचा..

नेस्ले सारखी आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनी महाराष्ट्रातील या सहकारी दूध संघांना टक्कर द्यायची हिंमत करत नाही, इतकी मजबूत पाळेमुळे शेतकऱ्यांच्या या सहकारी दूध संस्थांनी रुजवून ठेवली आहेत. आपल्याकडील संकरीत जनावरांची दूध देण्याची क्षमता इतर देशातील संकरित जनावरांच्या तुलनेने कमी आहे. त्यात भविष्यात आणखी संशोधन होणे अपेक्षित आहे. असे असले तरी गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी या भारतीय देशी गायींची दूध देण्याची क्षमता चांगली आहे. गिरी ही भारतीय जातीची गाय ब्राझीलने आपल्या देशात नेली. आज त्यांच्या डेअरी इंडस्ट्रीत गिर गाय अग्रक्रमावर आहे. आपण आता ब्राझीलकडून आपली गीर गाय मागवत आहे. आज जगामध्ये A1 व A2 दुधाच्या बाजारपेठा तयार झाल्या आहेत. A1 म्हणजे संकरित गाईचे दूध व A2 म्हणजे देशी गायीचे दूध. A2 दुधात प्रोटेन्स अमिनो ऍसिड असते, ज्याच्या माणसाची पचनसंस्था सुरळीत राहण्यात मदत होते. सध्या जगात A2 दुधाच्या देशी गाई फक्त पश्चिम आफ्रिकी राष्ट्र व भारतात मर्यादित संख्येत आहेत. न्यूजीलंड व अमेरिकेप्रमाणे भारत पण या बाजारपेठेत उतरू शकते.

आपल्या देशात केला जाणाऱ्या दूध व्यवसायात तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर असला तरी त्याचा एक फायदा देखील आहे, तो म्हणजे मोठ्याप्रमाणात लोकांच्या हाताला रोजगार मिळतो. जनावरे चारणे, दूध काढण्यापासून तर प्रकिया केंद्रातील कामगार... घरोघरी दूध विकणाऱ्या वितरकांपर्यंत रोजगार निमिर्तीची मोठी साखळी उभी होते. ती वर्षातील 365 दिवस रोजगार देत असते. या सर्व प्रक्रियेत विदर्भ मात्र अजून मागास आहे. विदर्भात काही भागात शेतकरी दूध व्यवसाय करतात पण तो असंघटित स्वरूपाचा आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना संघटित दूध व्यवसायाचे फायदे मिळत नसल्याने आपले शेतकरी दूध व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात.

विदर्भातील शेतकऱ्यांनी या दुग्ध व्यवसायाकडे का वळावे याचे काही करणे व फायदे आहेत. दूध हे जीवनावश्यक वस्तू आहे. वर्षभर दुधाची सतत मागणी असते. दुसरी गोष्ट विदर्भात गरजेपेक्षा कमी दुधाचे उत्पादन होते. तिसरी गोष् विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांना हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो. शेवटचा व अत्यंत महत्वाचा विषय दुग्ध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात वर्षाचे 365 दिवस रोजगार मिळतो.

पश्चिम महाराष्ट्रात आज दूध व्यवसायाची जी भरभराट पाहायला मिळत आहे, याला त्यांच्या आधीच्या तीन पिढ्यांनी घेतलेली मेहनत कारण आहे. याच दुधाच्या अर्थकारणातून पुढे त्यांच्या शेती व्यवसायाला हातभार लागला व शेतीदेखील विकासित झाली. त्यामुळे आज भारतातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी पश्चिम महाराष्टातील ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था आहे. पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काही शिकलो तर एक सुरुवात केली तर दुग्ध व्यवसाय विदर्भाचे चित्र बदलवू शकतो.

Updated : 23 July 2020 2:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top