Home > मॅक्स किसान > दुर्लक्षित विदर्भातील संत्रा!

दुर्लक्षित विदर्भातील संत्रा!

दुर्लक्षित विदर्भातील संत्रा!
X

महाराष्ट्र हे देशात फळबाग उत्पादनात अग्रगन्य राज्य आहे. सध्या आपल्या देशातून फळांची सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रात राज्यातूनच केली जाते. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला महाराष्ट्रात फळबाग योजना राबवली गेली. त्या माध्यमातून आंबा, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, चिकू, पेरू, केळी, लिंबू अशा अनेक फळांच्या शेती संदर्भात संशोधन झाले. त्या त्या भागातील जमिनीची गुणवत्ता, वातावरण व पाण्याची उपलब्धता नुसार उपयुक्त प्रजाती शोधण्यात आल्या. काही जिल्हे किंवा विभागानुसार त्या फळशेतीचे क्लस्टर तयार करण्यात आले.

शेतकऱ्यांना कलमाच्या(रोपाच्या) लागवडी पासून तर उत्पादन हाती येई पर्यंत व पुढे प्याकेजिंग पासून तर मार्केटिंग पर्यंत चे सर्व ज्ञान त्या त्या पिकांची फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले. तशा संशोधन संस्था राज्य सरकार कडून विभागानुसार त्या भागातील शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आल्या. त्यामुळेच आज महाराष्ट्रात फळशेतीतून संपन्नता आली. मात्र, या सर्व प्रक्रियेत नागपूरचा संत्रा दुर्लक्षितच राहिला. नागपूरचा संत्रा का दुर्लक्षित राहिला ? याला कोण जबाबदार आहे ? संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कुठं चुकले? आता पुढे काय करायचे? या सर्व प्रश्नाचा आज आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया.

दोनशे वर्षांपूर्वी रघुजी राजे भोसले यांनी नेपाळ व पूर्वोत्तर राज्यातून संत्र्यांच्या काही कलमा(रोप) सोबत आणल्या होत्या. तेव्हा पासून नागपूर व लगतच्या प्रदेशात संत्र्याच्या फळ शेतीला सुरवात झाली. मात्र, आजही आपले शेतकरी तेच दोनशे वर्षापूर्वीच्या प्रजातीच्या संत्र्याचे वाण शेतात लावतात व शेती करतात. तेव्हा पासून आज पर्यंत नागपूरच्या संत्र्यांच्या या प्रजातीवर ठोस संशोधन झाले नाही. याच उदाहरण सांगायचं झालं तर आपला नागपूरचा संत्रा म्हणून ज्याला ओळखतो हा संत्रा नसून 'मँडारिन' आहे. या मूळ 'मँडारिन' वर संशोधन करून जगातील वेगवेगळ्या देशाने जे आधुनिक वाण विकसित केले. त्याला जगात आज 'ऑरेंज' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपण देखील आपल्याकडील 'मँडारिन' ला संत्रा (ऑरेंज) म्हणतो. मँडारिन व ऑरेंज मधील हा मूलभूत फरक आपल्याकडील अनेकांना माहीतच नाही.

मूळ संत्रा म्हटलं की तो नारंगी रंगाचा असतो, मात्र आपला नागपूरचा संत्रा हिरवा किंवा पिवळा आहे. इतर प्रमुख देशातील संत्रा गोड आहे. मात्र, नागपूरचा संत्रा आंबटगोड आहे. जगात सीडलेस संत्र्याला मोठी मागणी असते. कारण त्यावर प्रक्रिया करणे सोपे असते.

ज्यूस व टेबल फ्रुट म्हणून तो संत्रा वापरता येतो. मात्र, आपल्या कडे एक पण सीडलेस प्रजातीचे संत्रांचे वाण नाही. त्यामुळेच जागतिक स्तरावर नागपूरच्या संत्र्याला विशेष मागणी नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही.

महाराष्ट्रात आंबा, द्राक्ष, डाळिंब, चिकू सह इतर फळ पिकाच्या शेतीत जी क्रांती झाली. ती संत्रा शेतीत होऊ शकली नाही, कारण इतर फळ पिकांसाठी राज्य सरकारच्या संशोधन संस्था आहे. या संस्था वाणावरील संशोधनासोबत मार्केटिंग व सेलिंग स्टॅटेजी चा अभ्यास करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देतात. त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपल्या शेतकऱ्यांसाठी ते करून घेतले.

मात्र, नागपूरच्या संत्र्यांसाठी राज्य सरकारची अशी कोणतीच संशोधन संस्था नाही. आपल्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे कधी लक्षच दिले नाही. केंद्राची लिंबूवर्गीय अनुसंधान संस्था नागपूरला आहे, ती देश पातळीवरचे संशोधन करते, त्यांच्याकडे काही विशिष्ट वाण देखील आहे, मात्र, कोणत्या प्रजातीचे वाण कोणत्या भागात लावायचे? त्याचे संवर्धन कसे करायचे? त्या विशिष्ट प्रजातीच्या वाणाचे जागतिक मार्केट मध्ये किती मागणी आहे? क्लस्टर चे काय फायदे असतात ? आपल्या स्थानिक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये याबाबत विशेष जागृतीच नाही.

दुसरी महत्वाची गोष्ट सरकारवर व स्थानिक लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करण्यासाठी ज्याप्रकारे उर्वरित महाराष्ट्रात इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना आहे, तशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एखादी संघटना देखील नाही. त्यामुळे या ना अनेक कारणांनी नागपूरचा संत्रा कायम दुर्लक्षित राहिला व जागतिक स्तरावर सतत पिछाडत गेला.

जागतिक स्तरावर नागपूरच्या संत्र्याची तुलना करायची झाली तर अनेक बाबतीत आपण पिछाडीवर आहे. जगात ब्राझील, इझ्राईल, अमेरिका, स्पेन, चीन, मेक्सिको, मोरोक्को, इजिप्त या प्रमुख संत्रा उत्पादक राष्ट्र आहे. त्यांचा संत्रा सीडलेस, आकाराने सारखा, भरीव बट्टीदार, चमक असलेला पूर्णता नारंगी असतो. प्रति हेक्टर त्यांच्या संत्र्याची उत्पादकता ४० ते ६० टना पर्यंत आहे. तर आपला संत्रा हिरवा किंवा पिवळा असतो, आकार वेगवेगळा असतो, चव आंबट आहे व आपल्या संत्राची उत्पादकता ही प्रति हेक्टर फक्त ५ ते ७ टनापर्यंत आहे.

यात आपली निर्यात अत्यंत नगण्य म्हणजे जवळपास शून्य च्या घरात आहे. इतका फरक आपल्यात व विदेशातील प्रमुख संत्रा उत्पादक राष्ट्रात आहे. या राष्ट्रांनी संशोधन करून त्यांच्या जमिनीचा प्रकार, वातावरण व पाण्याच्या उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीचे वाण शोधून काढले. खाण्यासाठी टेबलफ्रूट म्हणून संत्र्याची वेगळी जात, प्रक्रिया उद्योगासाठी संत्राची वेगळी जात, कॉस्मॅटिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या संत्र्याची वेगळी जात या नुसार संशोधन केले आहे.

त्यानुसार तसे वाण त्या त्या देशाने आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्याचे हजारो हेक्टर चे क्लस्टर तयार करून घेतले. त्याचे व्यवस्थित नियोजन करून घेतले. उदाहरण सांगायचे झाले तर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सस व फ्लोरिडा या तीन राज्यात संत्र्याची शेती केली जाते. मात्र कॅलिफोर्नियात फक्त टेबल फ्रुट संत्र्याचे क्लस्टर तयार केले तर फ्लोरिडा व टेक्सस मध्ये ज्यूस साठी लागणाऱ्या सीडलेस संत्र्याचे क्लस्टर तयार केले. त्यामुळे बाजापेठेतील मागणी नियंत्रित केली जाते. निघालेल्या संत्र्याची प्याकेजिंग, वॅक्सीन केली व पुढे मार्केटिंग केली.

त्यामुळे त्यांच्या संत्राला आंतराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असते. त्यांना भाव देखील अधिक मिळतो. मात्र आपले शेतकरी दोनशे वर्षापासून तेच ते दुय्यम दर्जाच्या 'मँडारिन' संत्र्याच्या वाणाची लागवड करत आहेत.

ही परिस्थिती सुधारायची असेल तर सुरवात राज्य सरकारला करावी लागेल. पहिले काम इतर फळ पिका प्रमाणे संत्र्यांसाठी संशोधन संस्था काढावी लागेल जी सर्व बाबीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल.

नागपूर व इतर भागातील जमिनीचा अभ्यास करून, वातावरण व पाण्याची उपलब्धतेवर नुसार संशोधन करून नवीन प्रजातीचे वेगवेगळे वाण शोधून काढावे लागेल. त्याचे विभागनिहाय्य क्लस्टर उभे करून लागवडी पासून पुढे उत्पादकता वाढवण्या पर्यंत शेतकऱ्यांना वेळोवेळी या संशोधन संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे लागेल. टेबल फ्रुट चे वेगळे क्लस्टर , प्रक्रिया उद्योगासाठी सीडलेस चे वेगळे क्लस्टर अशी मार्केटच्या मागणीनुसार वेगवेगळे क्लस्टर उभे करावे लागेल, त्यानंतर वॅक्सीन व प्याकेजिंगचे तंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल.

हे सर्व काम राज्य सरकार स्थापन केलेल्या संशोधन संस्थेचे असेल. पुढे नियोजित मार्केटिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्याला ठराविक उद्दिष्ट गाठता येईल. आपल्या कडे एकदा का सीडलेस संत्रा उपलब्ध झाला तर प्रक्रिया उद्योगासाठी मार्ग देखील अधिक सोपा होईल. महाराष्ट्रातील डाळिंब, द्राक्ष, आंबा त्याचे उत्तम उदाहरण आहे.

२० वर्षा आधी महाराष्ट्रातल्या द्राक्ष ,आंबा, डाळिंबाची देखील संत्र्यासारखीच परिस्थिती होती, मात्र संशोधन व नियोजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले डाळिंब, केसर आंबा, द्राक्ष आज जगात सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नफ्यात देखील मोठी वाढ झाली. संत्र्यांसाठी देखील असेच नियोजन करणे ही राज्य सरकारची नैतिक नाही तर कायदेशीर देखील जबाबदारी आहे.

सरकारी स्तरावर हे तंत्र माहित आहे मात्र नियोजन व अंमलबजावणी चा आभाव आहे . हे करून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे. संत्रा हे आरोग्य वर्धक फळ आहे, सर्वच वयोगटातील लोकांना याचे सेवन करता येते, आरोग्य श्रेत्रात देखील संत्र्याला आहारात विशेष महत्व दिले जाते. हे आपल्याला पटवून देता आले पाहिजे.

शेवटी संत्रा हे ग्लोबल पीक असल्याने ग्लोबल आर्थिक मार्केटचा विचार करूनच संत्रा फळ शेती केली तरचं ती अधिक फायद्याची ठरेल व परिस्थिती सुधारेल. महाऑरेंज च्या माध्यमातून मागच्या काही वर्षात काही शेतकऱ्यांनी असे प्रयत्न सुरु केले, मात्र त्याला चळवळीचे स्वरूप येणे तितकेच महत्वाचे आहे. हे राज्य सरकारच्याच पुढाकाराने होऊ शकते.

तुषार कोहळे यांच्या फेसबूक वॉलवरुन साभार

७०२०८८०२५३

Updated : 2 July 2020 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top