Home > मॅक्स ब्लॉग्ज > अंध युगुलाचं प्रेम, आंतर जातीय लग्न, त्यांची डोळस मुलं आणि बरंच काही....

अंध युगुलाचं प्रेम, आंतर जातीय लग्न, त्यांची डोळस मुलं आणि बरंच काही....

जातीयवाद मोठा की अपंगत्व? त्यात आंतरजातीय लग्न म्हणजे कळसच... पण या सगळया गोष्टींचा मेळ जर एकाच ठिकाणी होत असेल तर? होय. एका अंध जोडप्याने हे सगळं करून दाखवलं आहे. सामन्य आयुष्य अपंगत्व असतानाही कसं जगता येतं हे या जोडप्यानं दाखवून दिलं आहे. कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा मॉर्निंग वॉक साक्षात्कार...

अंध युगुलाचं प्रेम, आंतर जातीय लग्न, त्यांची डोळस मुलं आणि बरंच काही....
X

अनुजा आणि भरत प्रेमात पडले, त्यापूर्वी दीर्घ काळ मित्र होते. मग दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांचा विरोध होता. कारण, दोघांची जात वेगळी. सांस्कृतिक वातावरण वेगळे. आर्थिक स्थिती वेगळी.

मात्र, मुख्य म्हणजे हे लग्न टिकणार नाही, अशी अगदी खात्रीच बहुतेकांना होती. यांनी लग्नाच्या फंदात पडूच नये, असे वाटणारेही काहीजण होते. तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल. पण, होय! यांनी कशाला लग्न करून संसार थाटावा, असं वाटणारे कमी नव्हते.

त्याला कारण होतं.

अनुजा आणि भरत हे दोघेही आंधळे. 'व्हिज्युअली चॅलेन्ज्ड' वगैरेपेक्षा स्वतःला थेट अंध म्हणवून घेताना या दोघांना काही वाटत नाही. जे आहे, ते आहे. आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आपण अंध आहोत, हे दोघांनीही स्वीकारले होते. आपण माणसं आहोत. आपण विचार करतो. आपण भावनाशील आहोत. आपण कलेचा आस्वाद घेऊ शकतो. एवढं सगळं छान असताना, हे अंधत्व किती सामान्य! अनेकांना प्रेमच करता येत नाही. कित्येकांचं मन दगड झालेलं असतं. कितीतरी लोक अविचारी आणि विखारी असतात. खूपजण हिंसक असतात. आपण मात्र छान 'माणूस' आहोत, हेच मुळात किती भारी! कोणाकडे काही असते. कोणाकडे नाही नसते. तसे, आपल्याकडे सगळे काही आहे, पण आपल्याला दिसत नाही. हे न दिसणे त्यांनी अगदी नीटपणे पाहिले. आणि, ते स्वीकारले. आपल्यापाशी जे नाही, ते मान्य केले की जे आहे ते वाढवणे शक्य असते. त्यांना ते समजले होते.

मात्र, इतर डोळसांना ते दिसत नव्हते.

पण, या दोघांच्या मनात अंधत्व हीच आपली जात आहे, हा विचार पक्का होता. तो त्यांनी घरच्यांच्या गळी उतरवला. लग्न म्हणजे दोन कुटुंबं एकत्र येतात. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक ठेवणी भिन्न असल्या तरी हे दोघेही अंधत्वामुळे वसतिगृहात राहून वाढले. त्यामुळे घरच्यांपेक्षा शाळेतल्या लोकांचा, पर्यायाने शिक्षकांचा ठसा अधिक खोल होता.

अनुजा लग्न करून आली, तेव्हा तिला थोडंफार बनवता यायचं. पण, सासूबाई किचनमध्ये येऊच देत नसत. अनुजाला तेव्हा नोकरी नव्हती. मग वेळ घालवायला काहीच उरत नसे. तिला दिसत नाही म्हणून सासूबाईंना किचनमध्ये ती नको असायची.

अनुजा सांगते -

"मी हळूहळू प्रयत्न करत होते जुळवून घेण्याचा आणि समजावून देण्याचा. पण, दोन वर्षांनी मलाच गॅसजवळ जाण्याची भिती वाटायला लागली. त्याआधी भरतला मी सासू-सासरे नसताना डबाही बनवून दिला होता. पण, असा फरक माझ्या आत्मविश्वासाची किंमत मागत होता. 'मी घरात एकत्र कुटुंबात राहू शकणार नाही', असं भरतला सकारण सांगितलं. तरी, त्याच्यावर निर्णय सोपवला. त्यानेही अंधत्वामुळे माझ्या अडचणी समजून घेऊन मला सपोर्ट केला. मग आम्ही दोघं आई-पप्पांशी बोललो. त्यांनीही मान्य केले. आणि, मग आई-वडिलांपासून वेगळे झालो."

प्रत्येकवेळी नवे पती-पत्नी एकत्र कुटुंबातून वेगळे होऊन स्वतंत्र राहू लागतात, तेव्हा 'इंदुरीकर महाराज' छापाची कारणं असतातच, असं नाही. आई-वडिलांना सोडून राजा-राणी स्वतंत्र होत असतात, असंच नाही. त्यांचंही जगण्याचं काही एक स्वप्न असतं. धारणा असतात. नव्या पिढीला हवं तसं जगू द्यायला हवं, हे जुनेही अनेकदा विसरतात. काहीवेळा, वेगळं राहाणं हा उपायही असू शकतो.

असो. तर, त्याआधीच भरत आणि अनुजा स्वेच्छेने एका मुलाचे आई-बाबा झाले होते. आई-वडिलांपासून वेगळं होणं सोपं नव्हतं. त्यावेळी त्यांचा ओजस फक्त दहा महिन्यांचा होता. गॅस लावण्यापासून सारं अनुजाला एकहाती करावं लागणार होतं. पण, भरतची साथ या प्रवासात खूपच महत्त्वाची होती. तो पूर्ण वेळ ओजसला एकटा सांभाळायचा. सकाळी ऑफिसला जाताना ओजसला पाळणाघरात सोडून जायचं. येताना जो आधी येईल तो बाळाला घेऊन येई. दुसरा आला की, मग ओजस भरतकडे आणि अनुजा स्वयंपाकघरात. त्या दिवसांत स्वयंपाक अंगवळणी पडेपर्यंत सर्वांनी रोज खिचडी खाल्ली. तीही एकाच चवीची. त्यावेळी मदतनीस ठेवण्याइतकी आर्थिक परिस्थिती नीट नव्हती. पण, हळूहळू नवा संसार स्थिरावला. ओजसलाही आपले आईबाबा अंध आहेत, या गोष्टीची सवय झाली. त्याला आई-बाबा लिहायला शिकवू शकणार नव्हते. मग, शिकवणी लावली. पण, वाचन मात्र या दोघांनीच घेतलं. इंग्रजी आणि मराठी लाकडी अक्षरं आणली. मुळाक्षरांचे चार्ट्स आणले. त्यावरच्या चित्रांचं वर्णन ओजस सांगायचा आणि मग ते ओळखून अनुजा-भरत शब्द सांगायचे. नोकरी आणि मग शक्य तितका वेळ मुलांसोबत घालवणं हा या जोडीचा दिनक्रम झाला. सध्या दुस-या मुलाची म्हणजे लहान असीमची काळजी घ्यायला, डबा आणि घरातलं पाहायला एक मदतनीस ताई घरी येते. तीसुद्धा घरच्या सदस्यासारखीच आहे. कधी वेळ असला किंवा मूड असला तर अनुजा मस्त स्वयंपाक करते. पोळी-भाजीपासून ते चिकन, मटण, मासे, वरण-भात, केक, नानकटाई, खिर, हलवा वगैरे सगळं बनवते.

ओजसला बर नसताना तो काही अनुजाला सोडत नसे. अशात, भरतनेही गॅस लावायला, खिचडी, चहा-कॉफी, मॅगी बनवायला शिकून घेतलंय. आता अनुजाला कंटाळा आला की, तो छान खिचडी टाकतो, वाढतो आणि ताट हातात आणून देतो.

अडचणी आहेत, हे दोघंही नाकारत नाहीत. पण, हे आयुष्य 'असामान्य' आहे आणि दोघं एकत्र असल्याचा आनंद खूपच जास्त आहे!


अनुजा आणि भरत आता बॅंकेत मोठे अधिकारी आहेत. विरारमध्ये राहतात. त्या दोघांसोबत ओजस आणि असीम ही मुलंही वाढत आहेत. अनुजा विविध विषयांवर लिहिते. कविता करते. अनेक अंकांचं संपादन करते. संघटनात्मक काम करते. दोघांचाही खूप वेळ आता वाचन-लेखन आणि कलात्म उपक्रमांमध्ये जातो. मुलंही या उपक्रमांचा भाग होऊन गेली आहेत.

अनुजाचा मध्यंतरी इ-मेल आला.

"सर, तुम्ही जे लिहिताय ते मी आणि माझा नवरा भरत आम्ही नियमितपणे वाचतो. आतून वाटलं की, तुमच्याशी बोललंच पाहिजे. तुमच्या लेखनामुळे, भूमिकांमुळे आम्हालाही स्पष्टता येते. 'मॉर्निंग वॉक साक्षात्कारा'ची तर मी आतुरतेने वाट पाहते. जे लिहिता ते लिखाण संवादी असतं. तुम्ही काहीतरी सांगता असं वाटतं. ते ऐकताना आपल्यालाही असंच वाटतं किंवा हीच भावना, असेच विचार आपल्याही मनात आले होते. आम्ही दोघे मिळून ते वाचतो."

अनुजा माझं नेहमी वाचत असते. दोघंही ब्रेल लिपी शिकले आहेत. शिवाय, मोबाइलमध्ये 'टॉक बॅक' नावाचं इनबिल्ट ॲप आहे. त्यामुळं अक्षरं बोलू लागतात. लिहितानाही तंत्रज्ञानाची मदत होते. कधी भरत आणि अनुजा एकत्र वाचतात. ऐकतात. हल्ली अनुजा बोलतेही माझ्याशी. तिचा आवाज तिच्याएवढाच गोड आहे.

"तुमच्यामुळं जगण्याची प्रेरणा मिळते", असं म्हटल्यावर मी अनुजाला म्हटलं - "बयो, मी जन्माचा दरिद्री. मी काय प्रेरणा देणार तुला? उघड्या डोळ्यांनी तर तुम्ही जगता आहात. तुमच्या या प्रवासानं आमचे डोळे उघडले, तरी खूप झालं."

अनुजा आणि भरतसारखं आपल्याला कधी जगता येईल?

- संजय आवटे

#मॉर्निंगवॉकसाक्षात्कार

Updated : 23 Sep 2022 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top