Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्टोरीटेल: पुस्तकांवर संक्रात आहे का?

स्टोरीटेल: पुस्तकांवर संक्रात आहे का?

स्टोरीटेल: ऑडियोबुक्स पुस्तकांवर संकट आणत आहे का? Storytel मुळे लेखकांवर काय परिणाम झाला? Storytel मुळे पुस्तक विक्री घटली का? वाचा संजय सोनवणी यांचं विश्लेषण

स्टोरीटेल: पुस्तकांवर संक्रात आहे का?
X

श्राव्य आणि छापील माध्यमे एकमेकांची स्पर्धक आहेत की काय? अशी चर्चा स्टोरीटेलने ऑडीओ बुक्स प्रकाशनांचा धडाका लावल्यानंतर सुरु झाली. गेल्याच आठवड्यात आघाडीची प्रकाशन संस्था प्राजक्त प्रकाशनाचे जालिंदर चांदगुडे आणि माझी भेट झाली. त्यावेळीस याच विषयावर झालेल्या चर्चेत ते म्हणाले,

''स्टोरीटेल हे छापील माध्यमातील प्रकाशकांना स्पर्धक नाही तर कोम्प्लीमेंटरी आहे. वाचक आवडलेली छापील पुस्तके जशी अभिवाचकाच्या लेखकाच्या शब्दांना शब्द-अभिनयात उतरवलेल्या आवाजात पुन्हा ऐकणे पसंत करतात. आणि जे आधी ऐकतात, जे पुस्तक आवडते ते श्रोते त्या पुस्तकाची छापील प्रत आपल्या संग्रही असावी म्हणून विकतही घेतात. त्यामुळे ऑडीओ माध्यमामुळे छापील माध्यमातील पुस्तकांचा खप कमी झाला हे म्हणणे खरे नाही. शिवाय विदेशातील मराठी माणसांची साहित्याशी नाळ कायमची जुळून राहते ते वेगळेच. "

आणि हे खरेच आहे. जेंव्हा टीव्ही वाहिन्यांचा स्फोट झाला तेंव्हाही भारतात "आता काही पुस्तकांचे खरे नाही." अशाही चर्चेचा विस्फोट झाला होता. प्रत्यक्षात ज्या पुस्तकांवर मालिका निघाल्या त्या पुस्तकांच्या विक्रीने विक्रम केले हा फारसा जुना इतिहास नाही. माझा व्यक्तिगत अनुभवही वेगळा नाही. माझ्या नव्या कादंब-यांसोबतच स्टोरीटेलने माझी पुर्वप्रसिद्ध किमान २० पुस्तके श्राव्य माध्यमात आणली. विशेष म्हणजे त्यातील उपलब्ध पुस्तकांच्या छापील प्रतीही अधिक संख्येने विकल्या जाऊ लागल्या. जी उपलब्ध नाहीत त्यांच्या आवृत्यांची मागणी होऊ लागली.

टिकणार आहे ते मानवी संवेदनांना मोहवणारे साहित्य. ते कोणत्याही माध्यमातून येवो. एका माध्यमातून दुस-या माध्यमात साहित्याचे माध्यमांतर होतच राहणार. आणि ते परस्परपुरकच असणार हे यातून सिद्ध होते. ऑडीओ (श्राव्य) पुस्तके ही संकल्पना महाराष्ट्राला नवीन नाही. पूर्वी कॅसेट-सी.डी. स्वरुपात प्रख्यात लेखकांची आधीच प्रसिद्ध झालेली पुस्तके या रूपातही सादर केली जात. पण अवाढव्य किंमती आणि सर्वत्र सहजपणे ऐकता येऊ शकण्यातील तांत्रिक अडचणी यामुळे त्यांच्या प्रसाराला खूपच मर्यादा राहिली. इतकी की श्राव्य पुस्तके मराठीत ऐकली जाणे आणि त्यापासून प्रकाशकाला फायदा होणे अशक्यप्राय बाब आहे.असे प्रकाशक स्वत:च म्हणू लागले. लेखकांनीही कधी या माध्यमात फारसा रस घेतला नाही.

पण तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेले. आधी फक्त दूरध्वनीला पर्याय म्हणून आलेले मोबाईल फोनचे तंत्रज्ञान प्रचंड झपाट्याने पसरले. या तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक त-हेने करता येऊ शकतो. हे कल्पक नव-उद्योजकांच्या आणि तंत्रज्ञांच्या लक्षात आले. आणि मोबाईल सेट हळूहळू तळहातावरील इंटरनेट सुविधांनी युक्त संगणक बनला. फोन करणे, संदेश देणे-घेणे यापार जात तो व्यवसायाचे आणि मनोरंजनाचेही साधन बनला. विविध सुविधा देणारी हजारो एप्लीकेशंस रोज दाखल होऊ लागली. खरे तर याला आपण मोबाईल क्रांती म्हणू शकतो. या क्रांतिने मानवी जीवन अजूनच सोपे बनवण्यात हातभार लावला.

मग या क्रांतीपासून साहित्यही दूर राहू शकत नव्हते. चित्रपट, मालिका किंवा ओटीटीसाठीच बनवल्या गेलेल्या बहुभाषिक मालिका यापेक्षा मोबाईल हा साहित्याचा प्रमुख आधार बनू शकतो. हे लक्षात घेऊन ऑडीओ बुक्स हे संकल्पना अत्यंत नव्या स्वरूपात मांडली गेली. स्वीडनमधील स्टोरीटेल या स्टार्टअपने ते साहस अत्यंत कल्पकपणे केले आणि ऑडीओ बुक्स ही संकल्पना नव्या स्वरूपात झपाट्याने किमान अर्धे जग पादाक्रांत करून बसली. भारतात ही संकल्पना घेऊन स्टोरीटेल तर्फे आले ते साहसी, मराठी साहित्यप्रेमी योगेश दशरथ. भारतातील स्टोरीटेलची सुरुवातच झाली ती मुळात मराठी साहित्यातून. मग हिंदी, बंगाली आणि दाक्षिणात्य भागांतही चांगलाच जम बसवला.

यामागे स्टोरीटेलची संकल्पना ज्या व्यापक व्यावसायिक पायावर उभी आहे. तिचा विचार करायला हवा. स्टोरीटेल ऑडीओबुक्स स्वतंत्रपणे एकेकटे विकत नाही. ती सर्वस्वी सबस्क्रिप्शन (वर्गणी) आधारित संरचना आहे. म्हणजे मासिक विशिष्ट वर्गणी भरून तुम्ही स्टोरीटेल एप्लिकेशनवरून लाखांपेक्षा अधिक पुस्तकांतून हवे ते हवी तेवढी पुस्तके ऐकत राहू शकता. भाषानिहायही स्वतंत्र सबस्क्रिप्शन उपलब्ध असल्याने ती तर अत्यंत स्वस्तात वाचक आपल्या भाषेतील साहित्याचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतो. उदाहणार्थ ज्यांना फक्त मराठी ऐकायचे आहे ते महिन्याला फक्त ९९ रुपये वर्गणीत शिवाजी सावंतांपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत अभिजात तर सुहास शिरवळकरांपासून ते हृषीकेश गुप्तेन्पर्यंत लेखकांचे लोकप्रिय साहित्य ऐकू शकतात.

बरे, पुर्वप्रसिद्ध पुस्तकांच्या खजिन्याबरोबरच स्वत: स्टोरीटेलने खास ऑडीओ माध्यमासाठी लिहून घेतलेल्या ओरिजिनल कथा, कादंब-या या एप्लीकेशनवर एका पाठोपाठ एक प्रसिद्ध होतच राहतात. हे स्टोरीटेलच्या स्वतंत्र निर्मिती असल्याने श्रोत्यांचे एक आकर्षण असते. आणि हीच गाजलेली ऑडीओ पुस्तके स्टोरीटेल छापील माध्यमातुनही प्रसिद्ध करते. उदा. स्टोरीटेलने माझीच "धोका" ही समीर चक्रवर्ती नायक असलेली थरार कादंबरी आणि "फराओचा संदेश" ही सिंधू संस्कृती काळातील एक आगळीवेगळी साहसकथा ऑडीओ माध्यमात गाजल्यानंतर पुस्तकरूपातही प्रसिद्ध करण्यात आली. आणि ही छापील पुस्तकेही तेवढ्याच उत्साहाने विकली जात आहेत. म्हणजेच ऑडीओ आणि मुद्रण माध्यमे किती परस्परपूरक आहेत हे लक्षात यावे. आणि साहित्यासाठी ही अत्यंत महत्वाची घटना आहे.

पूवी ऑडीओ पुस्तकांना यश न मिळण्याची अनेक कारणे होती. एकतर ना प्रोफेशनल पद्धतीने रेकॉर्डींग केले जात असे ना व्यावसायिक अथवा प्रसिद्ध आवाज अभिवाचनासाठी वापरले जात असत. तांत्रिक कमजोरी हा त्यात मोठा दोष असे. सहज वापरता एल असे मोबाईल तंत्रज्ञानही तेंव्हा विकसित नव्हते. नव्या तंत्रज्ञानाने पूर्वीचे सारे अडसर दूर केले. स्टोरीटेलचे अभिवाचक पाहिले तर थक्क व्हायला होते. बराक ओबामा, टॉम हँक्स यासारख्या विश्वविख्यात व्यक्तींपासून ते जगभरचे उत्कृष्ठ व्यावसायिक अभिवाचक यात सहभागी आहेत. मराठीचे म्हणाल तर सुधीर गाडगीळ, उदय सबनीस ते उर्मिला निंबाळकर असे दिग्गज अभिवाचक आहेत. याशिवाय वेगवेगळे अभिनव आणि रंजक ऑडीओ प्रयोग मराठीतही स्टोरीटेल करत असते. अगदी "पावनखिंड ३०३" हे ध्वनीनाट्यही निर्माण केले.

मी या भारतातील पहिल्या वहिल्या अभिनव प्रयोगाचा लेखक दिग्दर्शक आहे याचा मला अभिमान आहे. श्रोत्यांनीही त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यात नाट्य-सिनेमा क्षेत्रातील दिग्गजही आहेत हे विशेष. हे यश का? याचे मुख्य कारण भारतियच नव्हे तर जागतिक रसिकांच्या श्रवणभक्तीत आहे. गतिमान आधुनिक युगात अनेकांची साहित्याशी नाळ तुटली होती. पण आपल्या मोबाईलवरच सुलभतेने हवे तेंव्हा ते दिग्गजांच्या भावरम्य आवाजात ते ऐकता येते हे समजल्यावर त्याकडे साहित्यप्रेमींनी वळणे स्वाभाविक होते. आणि तसे झालेही आणि ही नवी साहित्य श्राव्य लाट घरोघरी पोहोचेल असा अंदाज आहे.

स्टोरीटेलने एका अर्थाने भारतात ही माध्यमक्रांती घडवली आहे. साहित्य पार कानाशी आणून भिडवले आहे. ही साहित्याशीची अनोखी जवळीक आहे. येथे अभिजातता आहे, वैचारीकता आहे आणि रहस्य-थरार आणि विनोदात्मक मनोरंजनही आहे. ही कोणाशी स्पर्धा नाही तर परस्पर साहचर्याची रुजुवात आहे.

-संजय सोनवणी

Updated : 22 Oct 2020 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top