Home > मॅक्स ब्लॉग्ज > सत्याची साक्षात्कारी दंतकथा!

सत्याची साक्षात्कारी दंतकथा!

स्टीव्ह जॉब्स...! अॅपल कंपनीचा मालक... खोलीएवढा कम्प्युटर असताना कोणी आजच्या कम्प्युटरची संकल्पना केली असती तर... वेड्यात काढले असते ना? मानवी मनाला स्वप्नवत वाटणाऱ्या या सर्व कल्पना स्टीव्ह ने मांडल्या आणि वर्तमान अन् भविष्याचा विचार करुन तंत्रज्ञान क्षेत्रात इतिहास घडवला.. याच स्टीव्ह बाबत नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याबाबत मनोज गडनीस यांनी शेअर केलेला अनुभव

सत्याची साक्षात्कारी दंतकथा!
X

- मनोज गडनीस

तू इंजिनियर नाहीस, तुला कोडिंग येत नाही, तू डिझाईनर पण नाहीस... तुला काय वाटतं, तू आहेस तरी कोण? अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह वॉझनिक याने केलेला हा संतप्त सवाल...

मी?, मी निपुण कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कलाविष्कारासाठी प्रवृत्त करणारा एक सर्वोत्तम ऑर्केस्ट्रा मास्टर आहे! स्टीव्ह जॉब्स..., याच्या तोंडातून बाहेर पडलेले हे उद्गार केवळ, 'स्टीव्ह जॉब्स' नावाच्या त्या सिनेमापुरते नाहीत, तर या अद्धभूत सर्जनाच्या व्यक्तीमत्वात दडलेल्या डीएनएची ही जणू उकल आहे.

ही उकल अन् त्याची झलक, आज चाळीशीत असलेल्या पिढीला १९८० पासून ते २०२१ पर्यंतच्या तंत्रप्रवासाची सफर हा सिनेमा पाहिल्यावर मनात घुमवल्याशिवाय राहणार नाही. २०१५ साली स्टीव्ह जॉब्स यांच्याच नावे त्यांच्या जीवनातील मोजक्या घटना मांडणार करणारा सिनेमा प्रदर्शित झाला.

अंमळ उशीरानेच हा सिनेमा पाहण्यात आला हे खरे. पण पाहायचा राहून गेला असता तर फार महत्वाच्या कलाकृतीपासून वंचित राहिलो असतो, ही भावना सिनेमा पाहिल्यावर दाटून आली.


स्टीव्ह जॉब्स...! अॅपल कंपनीचा मालक... खोलीएवढा कम्प्युटर असताना कोणी आजच्या कम्प्युटरची संकल्पना केली असती तर... वेड्यात काढले असते ना? मानवी मनाला स्वप्नवत वाटणाऱ्या या सर्व कल्पना स्टीव्ह ने मांडल्या आणि वर्तमान अन् भविष्याचा विचार करुन तंत्रज्ञान क्षेत्रात इतिहास घडवला.. याच स्टीव्ह बाबत नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याबाबत मनोज गडनीस यांनी शेअर केलेला अनुभव

यामध्ये जॉब्स यांच्या सर्जनशीलतेमुळे प्रत्यक्षात आलेली मशीन्स तर दिसतातच पण, त्याचबरोबर पराकोटीच्या अचूकतेसाठी असलेला त्यांचा हट्टाग्रह, त्यासाठी मित्र-सहकाऱ्यांशी होणारे पराकोटीचे वाद, जे मनाला दिसले तसेच्या तसे मशीन बनविण्याच्या सर्वोत्तमतेच्या अट्टाहासासाठी उसळून येणारा विक्षिप्त स्वभाव आणि समांतर पातळीवर व्यक्तीगत आयुष्यात सुरू असणारे वाद या भोवती हा सारा पट आहे.

यातून लख्खपणे दिसते ती तंत्रज्ञानाबाबत जॉब्स यांची असलेली कटीबद्धता आणि जग बदलण्याची ऊर्मी! मॅकेन्टोशचे अपयश, स्वतः सहसंस्थापक असलेल्या अॅपलमधून हकालपट्टी, त्यातून बाहेर पडत नेक्स्ट नावाचा शिक्षण विषयक संगणक, आणि पुन्हा अॅपलमधे परतणे हे सारे एक जिवंत, सत्य नाट्य आहे.

अॅपलमधून हकालपट्टी ते अॅपलमधे पुनरागमन हा प्रवास स्टीव्ह जॉब्स नावाच्या एका व्यक्तीचा नाही तर, तो पर्सनल कॉम्प्युटिंग सायन्सच्या घडणावळीचा आहे.

खोलीभर आकाराचा संगणक ही प्रणाली नष्ट होऊन जेव्हा तो टेबलावर आला, तेव्हा त्या संगणकाचे आर्किटेक्चर हे खुले होते. याचा अर्थ, एकदा संगणक घेतल्यानंतर, त्यात कालानुरुप होणारे हार्डवेअरचे बदल करणे शक्य व्हावे, किंवा एखाद्याला त्याच्या वापराच्या गरजेनुसार त्यात बदल करता यावे, अशा स्वरूपाचे होते. यासाठी जॉब्स यांच्या मनातील संगणक घडविणारा त्यांचा मित्र स्टीव्ह वॉझनिक आग्रही होता. मात्र, त्या ऐवजी संगणक हे मशीन पूर्णतः बंद असावे आणि त्याला केवळ स्टीरिओ आणि मोडेम एवढेच बाह्य अॅक्सेस असावेत, अशी जॉब्स यांची धारणा होती. हे मशीन बंद पद्धतीचे साकारतानाच त्याचा आकार अत्यंत छोटा, सुबक असावा आणि त्याला तितक्याच उत्तम सॉफ्टवेअरची ताकद मिळून ते अत्यंत शक्तीशाली असावे, या धारणेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्या

काळात हा मनात आलेला विचार निव्वळ अशक्य असल्याच्या मुद्यावरून जॉब्स यांच्या मनातील कल्पना आणि त्याला आकार देणारे तंत्रज्ञ यांच्यात सातत्याने वाद झाले. पण आज डेस्कटॉपपासून फॅब्लेटपर्यंत झालेली स्थित्यंतरे, जॉब्स यांच्या दूरदृष्टीसाठी आपल्या कृतज्ञ राहण्यासाठी भाग पाडतात.

१९८४ पासून १९९८ जिथे सिनेमा संपतो, त्या कालावधीत संगणकीय तंत्रज्ञानात झालेल्या स्थित्यंतरात काय काय घडले, याची झलक इथे दिसते. मूळात, खोली सोडा पण एक खोका एवढ्याही आकाराचा संगणक असू नये, किंबहुना संगणक ही संकल्पनाच कालबाह्य असल्याचे जॉब्स एके ठिकाणी म्हणतात.

पीडीए सारख्या मशीनला असलेला स्टायलस हा जॉब्स यांना विशेष विनोद वाटला. त्यांच्यामते माणसाच्या हाताला पाच बोटं असताना, स्टायलसची गरजच काय? हे बोटांना अपंग करण्यासारखे आहे. मशीन हे कायम सोबत बाळगता यायला हवे आणि त्याने वापरकर्त्याच्या सर्व गरजा तो जिथे असेल तिथे पूर्ण कराव्यात, अशी जॉब्स यांची विचारधारा होती.

या त्यांच्या संकल्पनेबाबत जॉब्स यांनी त्यांच्या चरित्रात विस्तृत मांडणी केली आहे. मशीनचा परफॉर्मन्स जितका महत्वाचा तितकाच त्याचा आकार आणि किंमतही महत्वाची आहे. तंत्रज्ञान जर सर्वसमावेशक नसेल आणि मूठभरांची मक्तेदारी असेल तर ते कुचकामी आहे, अशी एक तत्वबैठकही त्यात दिसते.

सिनेमा संपतानाच्या शेवटच्या दृष्यात वॉकमन आणि खंडीभर कॅसेट नेणाऱ्या आपल्या मुलीला ते म्हणतात, मला पुन्हा तुला असे कॅसेट्चा गठ्ठा घेऊन हिंडताना पाहायचे नाही. तुझ्या आवडीचे सर्व प्रकारचे संगीत मी लवकरच एकाच छोट्या बॉक्समधे तुला आणून देईन. इथूनच आयपॉडच्या संकल्पनेचा जन्म झाला.

२०२१ सुरू आहे. अनेकांच्या हाती आता आयफोन १२ असेल. चार कॅमेरे, उत्तम ऑडियो क्वालिटी, बंद कुपीतल्या मदरबोर्डवर दमदार क्षमतेच्या नॅनो मायक्रोचिप्स, प्रोसेसर, शेकडो अॅप त्यांच्या क्षमतेने चालण्यासाठी शक्तीशाली रॅम असे सारे आपण अनुभवतो आहोत.

स्मार्ट फोन नावाचे हे तंत्र आज सत्य असले तरी काही दशकांपूर्वी ते जॉब्स नावाच्या माणसाच्या कल्पनेत तयार झाले होते. हुशार, कुशाग्र, प्रज्ञावान अशी बुद्धीमान व्यक्तीमत्वासाठी वापरली जाणारी सर्वमान्य विशेषण खुजी ठरावी अशा स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावरील हा सिनेमा आवर्जून पाहण्यासारखा आहे.

काळाच्या मर्यादेत दोन तासांत बांधण्याची किमया दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी उत्तम साधली आहे. मात्र, याकरिता जॉब्स यांच्या आयुष्यावरील घटना दाखवण्यापेक्षा त्यांचे व्यक्तीमत्व, विविध घटनांनी त्याला पडलेले पैलू, कोणत्याही प्रसंगातून जाताना न ढळणारी चिंतनात्मक प्रतिभा, व्यक्तीमत्वाला झळाळी देणारी नैसर्गिक विक्षिप्तता अन् समोरच्याशी संवाद साधताना जॉब्स यांच्या डोळ्यात सातत्याने डिकोड होत राहणारी मनाची समीकरण, यांचा वेध धेण्यात दिग्दर्शक डॅनी बोएल यशस्वी झाल्याचे दिसते.

व्यक्ती आणि त्यांचे व्यक्तीमत्व या अद्वैतात दडलेले द्वैत दाखवण्यात दिग्दर्शक जसा यशस्वी झाला आहे, तसेच त्याला जे दाखवायचे आहे तसेच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासोबत, प्रेक्षकांच्या मनात वसणारे जॉब्स, यांच्याबद्दल अधिक कुतुहल निर्माण करण्यातही सिनेमा फ्रेम बाय फ्रेम उत्तुंग होत गेला आहे.

जॉब्स यांच्यासारखे दिसण्याचे फारसे साधर्म्य नसले तरी Michael Fassbender यांनी जॉब्स नावाचा गुंतागुंतीचा कोड नजाकतीने डिकोड केला आहे.

जॉब्स यांनी मशीन्स तयार केली का ?, तर माझ्यामते या प्रश्नाचे सोपे उत्तर 'नाही', असे आहे. कारण, जॉब्स यांनी केवळ मशीन्स बनवली नाहीत तर, मशीन्स बनविण्यासाठी कसा विचार करावा, मनात ती कशी साकारावी हे शिकवले.

मनात आलेली संकल्पना साधण्याची प्रत्यक्ष किमया उपलब्ध तंत्रज्ञ करू शकतातच. पण मूळात ते कसे असावे, याचा वस्तुपाठ जॉब्स यांनी घालून दिला. त्यामुळेच, मानवी मनाला स्वप्नवत वाटाव्या अशा कल्पना, तंत्रयुगाच्या इतिहासात, वर्तमानात (अन् भविष्यातही) उभारूनदाखवलेल्या स्टीव्ह जॉब्सची ही कथा जणू सत्याची साक्षात्कारी दंतकथाच वाटते!

- मनोज गडनीस

Updated : 12 Jun 2021 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top