अधिर मन झाले

मराठी चित्रपटांच्या इतिहासात सर्वात जास्त पसंत केलं गेलेलं, देशभरातून प्रसिध्दी मिळालेलं गाणं म्हणजे 'अधिर मन झाले!' आपणही हे गाणं आजपर्यंत अनेकदा ऐकलं असणार हे नक्की... पण या गाण्याचा जर नेमका भावार्थ जाणून घ्यायचा असेल तर श्रीनिवास बेलसरे यांचा हा लेख जरूर वाचा....

अधिर मन झाले
X

अधीर मन झाले....

'नीलकंठ मास्तर' हा गजेंद्र आहिरे यांनी दिग्दर्शित केलेला अगदी परवाचा म्हणजे २०१५सालचा सिनेमा! स्वातंत्र्यपूर्व काळातील भूमिगत क्रांतीकारकांची कथा! दिग्दर्शकाने एक प्रेमकथा अगदी आजच्याइतक्या मनस्वीपणे आणि ब-याचशा बिनधास्तपणे सिनेमात गुंफली आहे.

खेड्यातील रांगडी प्रेयसी इंदू (पूजा सावंत) आपल्या जुन्या प्रियकराचे, विश्वनाथचे, (ओंकार गोवर्धन) दर्शन पुन्हा झाल्याने खुळावली आहे. आधी प्रियकर गावातून अचानक गायब झाला होता. त्यात इंदूच्या घरच्या आत्यंतिक गरिबीमुळे तिला जमीनदाराच्या वेड्या मुलाशी लग्न करावे लागले. तिने ते मनापासून स्वीकारलेही होते. पण वेड्या आणि खुनशी पतीमुळे तिचे आयुष्य उदास झाले आहे. परागंदा झालेला प्रियकर अचानक गावात परततो आणि तिचे लहानपणापासूनचे अनावर प्रेम उसळून येते. गजेंद्र अहिरे यांनी इतक्या गुंतागुंतीचा आशय एका गाण्यात फार चपखलपणे गुंफला होता. गाण्याचे बोल होते-




"अधीर मन झाले, मधुर घन आले..."

अजय-अतुल यांनी श्रेया घोषालला 'झाले'चा उच्चार असा काही करायला लावला की प्रेमाने अनावर झालेल्या तरुणीची मनस्थिती क्षणात जिवंत झाली. इंदू विश्वनाथकडे प्रेमाची याचना करते. आपण पळून जाऊन आयुष्य एकत्र घालवू म्हणते पण विश्वनाथ स्वातंत्र्यचळवळीत सामील झालेला आहे. त्याने आयुष्य देशाला समर्पित केले आहे. तो इंदूचे प्रेम अनिच्छेने पण कठोरपणे नाकारतो. इंदू मात्र सगळा संकोच सोडून प्रामाणिकपणे आपली बाजू मांडत राहते. हे सगळे गाण्यातून कसे मांडणार? पण अहिरे यांनी ती किमया अजय अतुल यांच्या मदतीने करून दाखवली! त्याला साथ मिळाली श्रेया घोषालचा धुंद आवाजाची!

अधीर मन झाले... मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया, सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले...

मदनबाधेने अस्वस्थ असलेली इंदू आपली मनस्थिती कशी मांडते पहा-

मी अशा रंगाची, मोतिया अंगाची, केवड्या गंधाची, बहरले ना…

माझे तारुण्य भरात आले आहे. तुझ्याबद्दलची तीव्र प्रेमभावना, मदनबाधा माझ्या अंगाअंगातून भिनत चालली आहे. हे गुपित सगळ्या भोवतालाला कळले आहे. पण, प्रिया, तुला मात्र ते का कळत नाही, रे? असा तिची आर्त विनवणी आहे.

उमगले रानाला, देठाला, पानाला. माझ्या सरदाराला, समजले ना आला रे, काळजा घाला रे, झेलला भाला रे, गगनभरी झाले रे...*

मी नियतीचा क्रूर भाला माझ्या हृदयात झेलला. त्यानेही माझी जीवनासक्ती संपली नाही. पारा पोटात गेला तर माणूस मरतो म्हणतात, मी जीवनाच्या कटू सत्याचा पाराही पिवून टाकला, पण जिवंतच राहिले! कारण माझे मन तुझ्या भेटीसाठी अधीर झालेले होते.




सोसला वारा मी, झेलल्या धारा मी प्यायला पारा मी, बहकले ना …

माझ्या प्रेमाची कहाणी सगळीकडे पसरली. गावात जशी पसरली तशी गावाबाहेरच्या रानातही. माझी बदनामी झाली तरी मी पर्वा केली नाही. आता रानातले पशुपक्षीही माझे प्रेम ओळखून बसले आहेत.

गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी, शिवारी साऱ्यांनी, पाहिले ना…

ही गजेंद्र अहिरेंची प्रेयसी अगदी मीरेसारखी मनस्वी झालेली आहे. तिला लोक काय बोलतात याची काळजी नाही. तिची मन:स्थिती फक्त प्रेमाचीच नाही तर जवळजवळ भक्तीची होऊन बसली आहे. सगळी जनलज्जा आणि मर्यादा तिने वा-यावर उधळून दिली आहे.

उठली रे, हूल ही उठली रे, चालरीत सुटली रे, निलाजरी झाली रे...

ती चक्क स्वत:ला 'निलाजरी' म्हणते. त्यामुळे तरी प्रियकर पुन्हा स्वीकार करेल अशी अंधुक आशा तिला वाटते आहे. नितांत सुंदर शब्द आणि कर्णमधुर संगीत. नजरबंदी करणारी दृश्ये आणि मनाचा ताबाच घेऊन टाकणारा ठेका! हेच गाणे जर हिंदीत असते आणि गुलजारने लिहिले असते तर त्याचे कोण कोडकौतुक झाले असते... पण असो.

जोवर अजय अतुलसारखे संगीतकार, गुरु ठाकूर, गजेंद्र अहिरे किंवा सौमित्रसारखे गीतकार मराठीत आहेत तोवर अप्रतिम मराठी गाण्यांना मरण नाही हा दिलासा हे गाणे देऊन जाते.

***

©श्रीनिवास बेलसरे.

९९६९९ २१२८३

Updated : 24 July 2022 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top