सावित्रींच्या लेकींचा Tryst With Destiny….
X
कालच्या महिलांच्या विश्वविजयानंतर नेहरूंचेच ते प्रसिद्ध भाषण आणि शब्द पुन्हा आठवले.
“At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance.”
काल भारतात असेच काहीसे घडले. फक्त थोडा फरक होता. जेव्हा अर्धे जग झोपलेले होते तेव्हा मध्यरात्रीच्या ठोक्याला आपला देश जागा होता आणि जल्लोषात बुडाला होता. देशाच्या इतिहासात असा एखादा क्षण येतो जो एखाद्या स्थित्यंतराचा साक्षीदार असतो. जेव्हा जुनाट व्यवस्थेतून नव्याचे सृजन होते. ही आज कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण १९८३ चा विश्वचषक विजय आठवा ! आणि आपण जगज्जेते होऊ शकतो हा विश्वास एकदा जागृत झाल्यावर आजपर्यंतचा आपला क्रिकेटचा प्रवास आठवा !
हजारो वर्षे या देशात ज्या स्त्रियांना चूल आणि मूल यांच्यात अडकवून ठेवले गेले होते, ज्यांना दलितांच्या बरोबरीनेच शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता, त्यांना काही दशके मोकळीक देताच त्यांनी काल जग जिंकून दाखविले. मुलगी होणे हीच गोष्ट आपल्या समाजात शतकानुशतके नव्हे तर हजारो वर्षे अनिष्टकारक आहे असे समजले जात होते. इतकी अनिष्ट की, विवाहानंतर सात वर्षात जर मुलगा झाला नाही तर पुरुषाला आपल्या पत्नीचा त्याग करण्याची धर्मग्रंथांच्यानुसार मोकळीक होती. याचा दुसरा घृणास्पद आविष्कार दीड कोटी स्त्रीभृणहत्येत झालेला आपण आपल्या डोळ्यासमोर पाहीला आहे.
शिक्षणाचे बोलायचे तर वेद काळात जरी स्त्रिया विदुषी होऊ शकत होत्या तरी स्मृतीकाळापासून मागील जवळपास दोन हजार वर्षे स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. त्याला पहिला धक्का महात्मा फुले आणि सावित्रीमाईने दिला आणि स्त्रीशिक्षणाचा मार्ग खुला केला. आज त्याचे राजमार्गात रूपांतर झाले आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्थेला दुसरा धक्का नेहरू काळात स्त्रियांना विवाहात आणि मालमत्तेत समान हक्क देऊन दिला गेला. हे शिक्षण आणि समान हक्काचे संरक्षण घेऊन महिलांची अजूनही संथ गतीने प्रगती सुरू आहे. संथ यासाठी म्हणायचे की प्रचंड मोठ्या अशा ग्रामीण भागात आजही बालविवाह, लग्नासाठी मुलींचे शिक्षण थांबविणे, हुंडाबळी इत्यादी गोष्टी सुरू आहेतच. पण संथपणे का होईना बदल घडत आहे यात वाद नाही. अशा समाजात हा विश्वविजय ही साधी गोष्ट नाही. यातून नव्या पिढीला, शालेय आणि महाविद्यालयीन तरुणींना जो आत्मविश्वास मिळाला असेल त्याची कदाचित भारतीय पुरुषही कल्पना करू शकणार नाहीत.
आपण जेव्हा पाश्चात्य देशांच्या प्रगतीचा विचार करतो तेव्हा हे विसरून जातों की तिथे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या स्त्रिया या चूल आणि मूल यात केवळ न अडकता अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने योगदान देत आहेत. चीनमध्ये तर माओच्या राजवटीतच पन्नासच्या दशकात त्याने निर्णय घेतला की ही जी पन्नास टक्के असलेली स्त्री शक्ती होती तिचा देशाच्या प्रगतीसाठी पूर्ण वापर करायचा आणि त्यादृष्टीने त्याने धोरणे आखली. हुकूमशाही राजवट असल्याने त्याने सगळ्या प्रथा परंपरा फाट्यावर मारत स्त्रियांना आखूड केस ठेवणे, शर्ट-पँट घालणे आदी गोष्टी बंधनकारक करून त्यांना कारखान्यात रोजगार दिले. यामुळे काम करणाऱ्या लोकांची संख्या थोड्याच कालावधीत अक्षरशः दुप्पट झाली. अर्थात एवढ्या लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांची अर्थव्यवस्था तेवढी वेगाने प्रगती करत होती हे ही खरे आहे. पण मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सुप्त असलेल्या जनतेच्या सामर्थ्याला त्यांनी वाट मोकळी करून दिली.
आज रोजगार घ्या, शिक्षण घ्या किंवा ऑलिंपिक पदके घ्या, चीनी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने त्यात हिस्सेदार आहेत. भारतीय स्त्रिया तेच करण्यासाठी आज धडपडत आहेत. गरज आहे फक्त त्यांना मागे न ओढण्याची, त्यांना खुलेपणाने अवकाश देण्याची आणि भेदभाव न करण्याची! कुस्तीगीर मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहसारख्या बाहुबलींना खुलेआम पाठी न घालण्याची! डॉक्टर झालेल्या मुलींचा राजकारण्यांनी छळ करून त्यांना आत्महत्या करायला भाग न पाडण्याची! स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत, त्यांनी टिकली लावली आहे की नाही, असल्या भिकार गोष्टींवरून त्यांचे मूल्यमापन न करण्याची!
सुनील सांगळे
(निवृत्त सह-आयुक्त, विक्रीकर विभाग(वस्तू व सेवा कर विभाग), महाराष्ट्र राज्य सरकार
इंग्रजी आणि मराठी पुस्तकांचे लेखक)
(साभार- सदर पोस्ट सुनील सांगळे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






