Home > मॅक्स ब्लॉग्ज > लोकशाही, समता आणि धर्म : न्यूयॉर्कचा आदर्श आणि भारतातलं आजचं वास्तव

लोकशाही, समता आणि धर्म : न्यूयॉर्कचा आदर्श आणि भारतातलं आजचं वास्तव

जोहरान ममदानींच्या विजयानिमित्ताने भारतात अल्पसंख्याक समाजाला राजकीय प्रतिनिधित्व का नाकारले जाते? मुस्लीम नेतृत्वाची भिती कुणाला आणि का वाटते? जाणून घ्या मराठी भाषेचे अभ्यासक हारूण शेख यांच्याकडून…

लोकशाही, समता आणि धर्म : न्यूयॉर्कचा आदर्श आणि भारतातलं आजचं वास्तव
X

अमेरिकेत (America) मुस्लीम (Muslims) लोकसंख्या केवळ एक टक्का आहे. त-री-ही स्वच्छ मोकळ्या आणि पारदर्शक स्पर्धेतून उमेदवारी मिळवत, जोहरान ममदानी (Zohran Mamdani) हा युगांडात भारतीय आई-वडिलांच्या पोटी जन्मलेला मुस्लीम मुलगा न्यूयॉर्क शहराचा महापौर म्हणून निवडून आला आहे. आपली मुस्लीम ही ओळख कुठेही न लपवता आणि प्रसंगी ती अभिमानाने मिरवत त्याने निवडणूक प्रचार केला. मुद्देसूद आणि लोकांच्या दैनंदिन अडचणीचे प्रश्न विचारात घेऊन निवडणूक प्रचार मोहीम त्याने आखली होती ज्याचं कौतुकही झालं. निवडणूक लढवण्यासाठी न्यूयॉर्कच्या लोकांकडूनच निधी गोळा केला आणि लोकांनीच दिलेल्या मतांच्या भरघोस पाठिंब्यामुळे निवडूनही आला.

सर्वसमावेशक, द्वेषाचा धिक्कार करणारं, समतेचा पुरस्कार करणार असं त्याचं एकूण कॅम्पेन होतं. एक भारतीय मुस्लीम म्हणून जोहरानचं कौतुक वाटतं.

हे अमेरिकेत होऊ शकतं कारण तिथली लोकं, समाज आणि लोकशाही व्यवस्था खुल्या विचारांची, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी अशी आहे. टोकाची आणि अतिरेकी विचारसरणीची लोकंही आहेत पण एकूण शहाणे आणि समंजस अधिक. अगदी अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेला ट्रम्पसारखा राष्ट्रपती न्यूयॉर्कच्या लोकांना ममदानीला निवडून देऊ नका नाहीतर बरं होणार नाही, निधी अडकवून ठेवेन अशी धमकी देत असताना लोक त्याला निवडून आणतात म्हणजे काय ती कल्पना करा.

भारतात असे काही होणे आता शक्य राहिले काय ? भारतात वीस कोटींच्या वर मुसलमान आहेत पण सत्ताधारी आघाडीत एकही मुस्लीम खासदार नाही. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे प्रागतिक विचारांचे विरोधी पक्षही मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायला कचरतात कारण बहुतांश समाज द्वेष आणि विषारी मुस्लिमविरोधी प्रचाराला बळी पडला आहे. त्यामुळे आपण हरू असे या विरोधी पक्षांना वाटते.

सार्वजनिक जीवनात, राजकीय संस्थांत, इतकेच काय तर आपल्या वस्ती सोसायटीत मुस्लीम दिसायलाही नको अशी लोकभावना तयार झाली आहे. जिथे अमेरिकेत फक्त १% मुस्लीम असूनही न्यूयॉर्कसारख्या महाकाय, बलाढ्य नगराचा महापौर एक सामान्य मुस्लीम माणूस निवडून येऊ शकतो तिथे भारतात काय चालले आहे ?

दिल्लीत दंगे भडकले असताना प्रशासनाला त्यांच्या संविधानिक कर्तव्यांची आठवण करून देणारं, कुठल्याही प्रकारे हिंसेचं समर्थन न करणारं, साधं भाषण करणारा- उमर खालीद (Umar Khalid) त्या निरुपद्रवी भाषणामुळेच गेली पाच वर्ष तुरुंगात खितपत पडला आहे. न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. न्याय नाही.

‘जोहरान ममदानीसारखाच कदाचित उमर खालिदही तरुण नेतृत्व म्हणून पुढे आला असता, कुणी सांगावे. पण आपल्या व्यवस्थेने त्याला तुरुंगात अडकवलं असंच दुर्दैवी चित्र आहे’

मुस्लीम असाल तर उमेदवारी तिकीट मिळणारच नाही अशी किडकी, बंदिस्त राजकीय व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मग तुम्ही कितीही प्रागतिक धोरणांवर बोला, सामाजिक न्यायावर बोला, विकास आणि समतेवर बोला. काहीच उपयोग नाही कारण तुम्ही मुस्लीम आहात. लगेचच कॅन्सल करण्यालायक.

त्या उलट- निवडून आल्या आल्या मी 'अलीनगर'चं नाव बदलून 'सीतानगर' करेन असं म्हणणाऱ्या एकूणच अतिशय 'ढ' आणि निर्बुद्ध उमेदवाराला मात्र तत्काळ तिकीट मिळताना दिसते आणि असा धर्मद्वेषी प्रचार करत कदाचित ती उमेदवार सहजी निवडूनही येईल अशी शक्यता दिसते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खांद्याला खांदा लावून लढलेला, फाळणी नाकारून भारतातच, या भूमीतच दफन होण्याची उदात्त मनीषा बाळगणारा आणि तरीही वेळोवेळी देशप्रेम, नागरिकत्व सिद्ध करायला लावला जाणारा मुस्लीम समाज आज प्रचंड काळजीत आहे. कुठला राजकीय नेता आमच्याविरुद्ध गरळ ओकणार नाही, शत्रुत्वाची भाषा बोलणार नाही, बुलडोजर आणून घर-दुकान तोडणार नाही, रोजगार हिसकावून घेणार नाही, प्रार्थना स्थळांची जमीन हडपणार नाही, निदान शांतपणे जगू देईल, त्याला मत देऊ अशा किमान अपेक्षेपर्यंत येऊन पोहोचला आहे.

अस्तित्व टिकवण्यापुढे दुसरे सगळे प्रश्न दुय्यम झाले आहेत तिथे प्रतिनिधित्व म्हणजे फारच दूरची गोष्ट.

जोहरान ममदानीकडे आणि त्याच्या ऐतिहासिक विजयाकडे कौतुकाने पाहताना वाटते की जेव्हा खरोखर लोकशाही नावाची व्यवस्था आणि तो मानणारा बहुतांश समाज निष्पक्षपणे, सर्वांना समान संधी देण्याच्या प्रेरणेने, समतेचे मूल्य जोपासत सत्तेचा कुठलाही दबाव नाकारत, कार्यरत होतो तेव्हा तळागाळातल्या आणि अल्पसंख्याक लोकसमूहातूनही कसे समर्थ नेतृत्व पुढे येते. भारतात नजीकच्या भविष्यात तरी हे अशक्य दिसते.


हारूण शेख

(लेखक मराठी भाषेचे अभ्यासक आहेत)

(साभार - सदर पोस्ट हारूण शेख यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 6 Nov 2025 12:05 PM IST
Next Story
Share it
Top