Home > मॅक्स ब्लॉग्ज > Ramdas Athawale Birthday ...म्हणून आठवले साहेब म्हणून वेगळे ठरतात - सुषमा अंधारे

Ramdas Athawale Birthday ...म्हणून आठवले साहेब म्हणून वेगळे ठरतात - सुषमा अंधारे

लढवय्या बाणा झाकोळून टाकण्यासाठी रामदास आठवले यांची प्रतिमा जाणीवपूर्वक विनोदी शीघ्रकवी अशी करणे हे फक्त त्यांनाच नाही तर चळवळीला डॅमेज करणे होते हे दुर्दैवाने अनेकांना समजले नाही. आदर्शवादी भाषा करून विश्वासघात करणाऱ्या लोकांपेक्षा वास्तववादी विचार करत विचारांशी प्रामाणिक राहणारे लोक कधीही श्रेष्ठ... सुषमा अंधारे यांनी दिल्या रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा...

Ramdas Athawale Birthday ...म्हणून आठवले साहेब म्हणून वेगळे ठरतात - सुषमा अंधारे
X

Ramdas Athawale Birthday Wishes खासदार रामदास आठवले म्हटलं की, पॅंथरची चळवळ आठवण्याऐवजी त्यांच्या शीघ्रकविता आठवाव्या हा इथल्या Social Media सोशल मीडियावरच्या टोळक्यांनी ठरवून केलेला भ्रमजाल आहे.

Damage/Destroy - Hope - practice

या प्रयोगाचा तो भाग आहे. ही कार्यपद्धती तशी RSS आरएसएस BJP भाजपाची आहे. आरएसएसच्या जेव्हा लक्षात आलं की सत्तेत येण्यासाठी आधी काँग्रेसचं गांधी-नेहरू मॉडेल डॅमेज करावे लागेल. तशी त्यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून एक दीर्घकालीन प्रक्रिया राबवत गांधी नेहरू मॉडेल उध्वस्त करण्याचे रणनीती आखली.

सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले असे म्हणणे हा या रणनीतीचा एक भाग होता. यानंतर पुढचा टप्पा होता तो लोकांना होप दाखवण्याचा. 70 वर्षात तुमच्यासाठी काहीच झालं नाही मग आम्ही तुम्हाला होप दाखवतो असे म्हणत 'अच्छे दिन आयेंगे' हे टुल राबवण्यात आले. आणि त्याला प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी नवा आयकॉन अर्थात मोदींचा चेहरा पुढे आला.

नेमकी अशीच काहीशी कार्यपद्धती त्यांनी आंबेडकरी चळवळीबद्दल सुद्धा राबविली. संविधानिक मूल्यांना मानणारा, खऱ्या अर्थाने संघर्ष आणि सम्यक समग्र क्रांतीची जाणीव असणारा हा वर्ग पॅंथरच्या माध्यमातून ताकदीने एकवटला होता. नामदेव ढसाळ, राजा ढाले, रामदास आठवले, अर्जुन डांगळे या पँथर्स ने वातावरण भारावलं होतं.

Dalit Politics ही चळवळ डॅमेज करायची असेल तर आधी हे आयकॉन्स Destroy करावी लागतील याची रणनीती आखणे सुरू झाले. अन मग अनुयायांकडूनच खिल्ली कशी उडवली जाईल याची पद्धतशीर प्रक्रिया राबवली गेली. हे आयकॉन पूर्णतः डॅमेज झाल्याशिवाय आपलं राजकारण उभेच राहू शकणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांनीही या षडयंत्राला मग हातभार लावला नव्या होप्स दाखवण्यासाठी नवे चेहरे प्रस्थापित करणे सुरू झालं. पण उपरनिर्दिष्ट पँथरची सर यांना कधीच येणार नाही हे समजेल तो सुदिन म्हणावा.

महाराष्ट्रात सध्या जे काही निवडक लढवय्ये चेहरे दिसतात ते उभं करण्याचं काम आठवले यांनी केलं हे नाकारता येणार नाही. सोलापूरचे राजाबाबू सरवदे सातारचे अशोक बापू गायकवाड, जगदीश गायकवाड, परशुराम वाडेकर, साधू कटके, चंद्रकांता सोनकांबळे, अशी अनेक नावे सांगता येतील. पण दुर्दैवाने आठवले साहेबांना या सगळ्याच ना कधी मार्केटिंग करता आलं ना स्वतःचे महिमामंडण करण्यासाठी आयटीसेल निर्माण करता आला.

हे वाचताना जे माझ्या मताशी असहमत असतील त्यांच्यासारखीच मी सुद्धा आधी विचार करायची..!! कधीकाळी आठवले साहेबांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. पण त्यांनी कधीही ना कुठल्या आयटी सेलच्या माध्यमातून ट्रोलधाड अंगावर सोडले. ना कधी चळवळीतल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा अवमान केला. खैरलांजी नंतर माझ्यावर छोट्या-मोठ्या असंख्य केसेस झाल्या होत्या. हे त्यांना पॅंथर नामदेव ढसाळ दादांनी जेव्हा सांगितले तेव्हा आपण गृहमंत्र्यांशी बोलू असे म्हणत तात्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा यांची वेळ घेतली.

राज्य गृहमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यासह अर्जुन डांगळे, ढसाळ दादा, आठवले साहेब बैठकीला हजर राहीले. या बैठकीत ढसाळ दादांनी मांडलेली भूमिका आणि आठवले साहेबांनी अत्यंत खमकेपणाने, "सुषमा चळवळीची असेट आहे, अशा पद्धतीने केसेस करून चळवळीतल्या एका कार्यकर्त्याला संपवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही" हे ज्या ताकदीने मांडलं आणि त्याला अर्जुन डांगळे काकांनी दिलेला दुजोरा माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी फार मोठ संरक्षणकवच होतं.



याची किंमत तेव्हा कळते जेव्हा दीपक केदार सारख्या कार्यकर्त्यावर केसेस पडतात किंवा परभणी सारख्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांवर केसेस पडतात आणि त्यांच्यासाठी धावून जाणारं कुणीही नसतं. या अर्थाने आठवले साहेब अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

तरीही आठवले साहेबांची समीक्षा करणे माझ्याकडून कधीही थांबले नाही. परंतु माझे वडील वारल्यानंतर अत्यंत आपुलकीने माझ्या भावंडांची काळजी घेणारे त्यांच्या शिक्षणासाठी खास दिवंगत आमदार रमेश वांजळे यांना हक्काने 'तू लक्ष दे रे' असं सांगणारे आठवले साहेब हे सर्वपक्षीय मित्र बाळगून आहेत. गडचिरोली चंद्रपूर गोंदिया सारख्या लांबच्या ठिकाणावरून कार्यकर्ता भेटायला येतो तेव्हा पहिल्यांदा, 'जेवलास का ?'आणि 'परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत का ?' हे विचारणारे पॅंथर आता उरले नाहीत.

आठवले साहेब असे निगुतीने विचारतात म्हणून आठवले साहेब म्हणून वेगळे ठरतात..!

पण तरीही त्यांचा लढवय्या बाणा झाकोळून टाकण्यासाठी त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक विनोदी शीघ्रकवी अशी करणे हे फक्त त्यांनाच नाही तर चळवळीला डॅमेज करणे होते हे दुर्दैवाने अनेकांना समजले नाही. भाजपसोबतच्या त्यांच्या मैत्रीबद्दल अनेकांचे मतभेद असू शकतात तसे माझेही आहेत. मात्र आदर्शवादी भाषा करून विश्वासघात करणाऱ्या लोकांपेक्षा वास्तववादी विचार करत विचारांशी प्रामाणिक राहणारे लोक कधीही श्रेष्ठ.

ढसाळ दादा जेव्हा कधी आठवले साहेबांना एकेरी संबोधन करायचे तेव्हा आठवले साहेबांचा इगो कधीच दुखावला नाही. किंबहुना आठवले साहेबांकडे अहंकारी माणूस या दृष्टिकोनातून त्यांचे शत्रूही कधी बघणार नाही हे खात्रीने सांगता येते.

माणूस गेल्यावर त्याच्यावर कौतुकाची उधळण करण्यापेक्षा माणसं मग भाऊ असताना जपणे जास्त महत्त्वाचे..

दादा, तुम्ही तुमच्या वाट्याची लढाई लढली. आता ज्या भूमिका तुम्ही घेतल्या आहेत त्याची तुमची स्वतःची अशी काही कारण असू शकतात. त्यावर पुन्हा कधीतरी बोलूया.

दादा , तुमच्याबद्दल अनेक वाद-प्रवाद असु शकतात. मात्र तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुमची चळवळीशी असलेली बांधिलकी चांगलीच ठाऊक आहे.

लपून-छपून किरकोळ तोडपाणी करण्यापेक्षा थेट भाजपाशी हात मिळवणी करत सत्तेतला वाटा मिळवणे हे जास्त श्रेयस्कर आहे..

तूर्तास आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... बक्कळ जगा...

ता. क. - या शुभेच्छांवरही काही जणांना प्रचंड पित्ताचा त्रास होईल. उडता तीर अंगावर घ्यायची इच्छा असेल तर त्याला नाईलाज आहे..!


सुषमा अंधारे

वक्त्या, नेत्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

(साभार : सदर पोस्ट सुषमा अंधारे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 26 Dec 2025 1:26 PM IST
Next Story
Share it
Top