Home > मॅक्स ब्लॉग्ज > चिनी वस्तूंवर आयातकर वाढवणे - फायदा कुणाचा?

चिनी वस्तूंवर आयातकर वाढवणे - फायदा कुणाचा?

चिनी वस्तूंवर आयातकर वाढवणे - फायदा कुणाचा?
X

चीनसोबतच्या वादानंतर आपले सरकार 300 प्रकारच्या चिनी वस्तूंवर आयात कर वाढवणार आहे अशी बातमी आहे, जेणेकरून चिनी मालाची आयात कमी व्हावी आणि आपल्या देशातले पर्यायी उत्पादन वाढावे. हा मास्टरस्ट्रोक वगैरे वाटून आपली भक्त मंडळी आनंदाने उड्या मारतील यात मला कसलाच संशय नाही. थोडा खोलात जाऊन विचार केला तर अनेक मुद्दे निदर्शनास येतात जे आपल्यालाच हानिकारक आहेत, जसे की -

१) चीनमधून आपण ज्या वस्तू आयात करतो त्यात औषधांचा कच्चा माल (API) आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल, टीव्ही इत्यादी) यांचे प्रमाण मोठे आहे. यातल्या बहुतांश गोष्टी चीन ज्या किंमतीला बनवतो, त्याच्या आसपासही आपण जाऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पर्यायी उत्पादन तर आपल्याकडे जवळपास शून्य आहे. म्हणजे या वस्तूंवर आयातकर वाढवल्याने या वस्तूंची आयात काही कमी होणार नाही, फक्त आपल्या देशातल्या लोकांना त्यावर जास्त आयातकर भरावा लागेल, जो सरकारच्या खजिन्यात जमा होईल. म्हणजे थोडक्यात आपल्या राष्ट्रभक्तीची किंमत आपण प्रत्येक वस्तुमागे शेकडो-हजारो रुपये स्वतःच्या खिशातून देऊन भरू.

२) भारतातल्या बऱ्याच इंडस्ट्रीजचा कच्चा माल, त्यांना लागणारे स्पेअर पार्ट, component, चीनमधून येतात. उद्या त्यांच्यावर आयातकर वाढवले की देशातल्या उद्योगात बनणाऱ्या finished goods च्या किंमतीही आपोआप वाढतील. जीवनावश्यक औषधे, इलेक्ट्रिकल सामान, बांधकाम साहित्य, ऑटोमोबाईल, फर्निचर अशा अनेक गोष्टी त्यामुळे महाग होत जातील. आणि या वरवर आपल्या देशात बनणाऱ्या पण चिनी स्पेअर पार्ट असणाऱ्या गोष्टी आपणासच जास्त किंमतीने विकत घेऊन आपलंच आर्थिक नुकसान आपण करून घेणार.

हे ही वाचा..

…अखेर शरद पवार शपथ घेणार

Task: पुरूषाने सगळी भांडी पुढच्या दरवाजात येऊन गल्लीत दिसेल अशी घासावीत…

राम मंदिर – ठाकरेंच्या अयोध्यावारीवर राष्ट्रवादी नाराज

३) काही लोकांना वाटू शकते की सरकारने कर वाढवले तर त्याने सरकारचा खजिनाच भरणार आहे आणि त्याने सामान्य लोकांचाच फायदा होणार आहे. पण गेल्या 6 वर्षातला आर्थिक गोंधळ पाहता, आणि लॉकडाऊनच्या काळातही गरीब लोकांना वा लहान उद्योगांना ज्या पद्धतीने दुर्लक्षित केले गेले ते पाहता हे सरकार सरकारी खजिन्यातून गरिबांचे किंवा लहान उद्योगांचे काही कल्याण करेल यावर संशय घ्यायला भरपूर वाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल स्वस्त असतानाही पेट्रोल-डिझेलवर ढीगभर कर लावून हे सरकार सामान्य माणसालाच नाडत आहे आणि महागाई वाढवत आहे.

४) देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आयात केलेल्या वस्तूंवर कर वाढवण्यासोबतच देशांतर्गत उद्योगधंद्यांना करसवलती, स्वस्त जमीन, स्वस्त कर्जपुरवठा वगैरेही करावा लागतो. पण याबाबतीत नेहमीचे 3-4 मोठे उद्योगसमूह सोडल्यास इतर कुठल्याच कंपन्या किंवा उद्योगांवर सरकार कधी कृपादृष्टी दाखवत नाही. त्यामुळे हे आयातकर वाढवले गेल्याने देशांतर्गत पर्याय उभे राहण्याची शक्यता कमीच आहे. फक्त महागाई वाढण्याची भीती आहे.

५) भारत सध्या आर्थिक मंदीतून जात आहे ज्यात बेरोजगारी ऐतिहासिक उच्च पातळीवर आहे. अशा काळात जर महागाई वाढत राहिली तर त्याने लोकांची खर्च करण्याची शक्ती कमी होण्यासोबतच बाजारातली मागणीही कमी होऊ शकते. महागाई, कमी झालेली मागणी आणि कमी झालेले उत्पन्न हे सध्याच्या आर्थिक संकटाला अजून गडद करू शकते. पण सध्याच्या सरकारचं ट्रॅक रेकॉर्ड पाहता अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षाही लोकांना भावनेत गुंतवून ठेवून प्रश्नांना बगल देण्याची वृत्ती जास्त आहे.

एकंदरीत बुडत्याचा पाय खोलात जावा तसे आपण अजूनच खाली जायच्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहोत. भावनांच्या कल्लोळात सामान्य माणूस स्वतःचं अजून आर्थिक नुकसान करून घेणार आहे एवढंच सध्या दिसत आहे.

- डॉ. विनय काटे

Updated : 22 July 2020 9:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top