Home > Top News > Task: पुरूषाने सगळी भांडी पुढच्या दरवाजात येऊन गल्लीत दिसेल अशी घासावीत...

Task: पुरूषाने सगळी भांडी पुढच्या दरवाजात येऊन गल्लीत दिसेल अशी घासावीत...

Task: पुरूषाने सगळी भांडी पुढच्या दरवाजात येऊन गल्लीत दिसेल अशी घासावीत...
X

‘जेवण झालं की ती भांडी घासून ठेव!’

‘तो मसाला बनवून घे,’

‘मिरच्या भाजून ठेवल्यात त्याचा ठेचा बनव,’

‘डाळ शिजलीय त्याला फोडणी दे,’

‘टॉयलेट घासून साफ करून ठेव’ अशी काही वाक्य आहेत. लहानपणी शाळेत कोण कोणास म्हणाले? असा एक प्रश्न असायचा. समजा, सिलॅबस बाहेरचा प्रश्न म्हणून ही वाक्य त्यात आली तर मी उत्तर दिलं असतं ‘आई दीदीला म्हणाली.’ हे इतकं साधं सोपं माझ्या डोक्यात बसलं होतं.

तीन मोठ्या बहिणी आणि आई, वडील यांच्यात मी मोठा झालो. माझ्या लहानपणी आई खरोखर ही सगळी वाक्य माझ्या तीन बहिणींना उद्देशून म्हणायची. माझ्यासाठी यातलं एकही वाक्य कधीही आलं नाही. पुढे तीन बहिणींची लग्न झाली, मी ही दहावीनंतर शहरात शिकायला गेलो आणि घराशी तसा संपर्क तुटला. रूमवर मी ही काही कामं करत होतो. महिन्यातून एखाद्या दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर घरी हौस म्हणून स्वयंपाक करायचो. पण ही कामं आई बहिणींना जितक्या सहजतेनं सांगायची तितक्या सहजतेनं माझ्यासाठी कधीही आली नाहीत.

लॉकडाऊनमुळे गेले चार महिने मी घरी गावाकडे आहे. मार्चमधे घरी आल्यावर पहिले काही दिवस असेच लोळून काढले. नंतर संविधान मूल्य प्रसाराचं काम सगळं सोशल मीडियावर सुरू केलं. वेगवेगळे विषय हाताळत होतो. मूल्यांवर मांडणी व्हायची, चर्चा व्हायची आणि त्यावर जमेल तसे कृती कार्यक्रमांचं नियोजनही चाललं होतं. यातला एक कृती कार्यक्रम होता आपल्या घरातल्या पुरूषाने सगळी भांडी पुढच्या दरवाजात घेऊन गल्लीत दिसेल अशा पद्धतीने घासायची.

संविधानात समतेचं मूल्य सांगितलं जातं. धर्म, जात या गोष्टी येतात तेव्हा आम्हाला लगेचच ही समता आठवते. पण लिंगाधारित समता आम्ही आमच्या घरात तरी आणलीय की नाही याचा विचार आमच्या मनाला शिवत नाही.

तर कृतीकार्यक्रम म्हणून मी हे भांडी घासायचं काम करू लागलो. पहिले काही दिवस गल्लीतली मुलं मी भांडी घासतोय हे पाहून हसत पुढे जायची. बायका थांबायच्या, कधी कधी हसत हसत बघत उभं रहायच्या. ‘आई कुठं गेलीय?’ हे आवर्जून विचारायच्या. मी म्हणायचो ‘आहे की घरात!’ त्यावर त्यांचं उत्तर ठरलेलं, ‘मग बायकांसारखं भांडी कशाला घासायलायस?’ काही मस्करी करत ‘आमची पण आणून देतो रे’ असं म्हणायच्या. मीही हसायचो आणि पुन्हा भांडी घासायचो.

हळूहळू भांड्यांसोबत स्वयंपाक बनवणं, झाडू मारणं, संडास बाथरूम साफ करणं, गाईला चारा पाणी अशी काही रोजची काम करू लागलो. मम्मी म्हणायची, ‘नको भैयड्या, मी करतो ते.’ तरीही हे करत रहायचो. ते काम शिकायची, करायची मला विशेष काही गरज नव्हती. पण घरातलं काम म्हणजे जीवनमूल्य आहे आणि ते मला करता आलंच पाहिजे इतकं डोक्यात ठेवून मी ते करायचो.

सकाळपासून रात्रीपर्यंत घरातली अशी कितीतरी कामं आई करत होती, हे लक्षात आलं ही काम बाई म्हणून माझीच आहेत, असा तिचाही समज होता. माझाही गेली अनेक वर्ष हाच समज होता. पण संविधानाचं काम सुरू केल्यापासून तो गळून पडला.

मी रोज घरातली कामं करण्याचा फायदा मला चार महिन्यांनी आज दिसू लागलाय. कामामुळे आई आणि वडिलांच्या वागण्यात कमालीचा बदल झालाय. हा बदल विशेषतः आईमध्ये दिसून येतोय. आपला मुलगा पुरूष आहे. त्याला अशी महिलांची समजली जाणारी काम कशी सांगावीत? असं तिला आतून वाटत असेलही. पण कृतीत मात्र, वेगळं घडतंय. माझ्या बहिणींना जसं काम करायला सांगायची तशीच कामं आता ती मला सांगत असते.

भांडी घासताना एखाद्या भांड्याला साबण राहिलेला असेल तर ते स्वतः धुण्याऐवजी परत धुवून ये म्हणूनही सांगते. काही दिवसांपूर्वी पंकज खोत आणि सुनील गोटखिंडे हे दोन चळवळीतील साथी घरी येणार होते. त्यांनी कॉल करून सांगितलं होतं की भाकरी दही-ठेचा बनवून ठेव. मम्मी तेव्हाही अगदी सहज म्हणाली ‘मी भाकरी बनवते तू भांडी पडलीयेत ती घासून घे. आणि नंतर झुणका बनव.’ पोराचे मित्रं घरी येणार आहेत आणि त्यांच्यासमोर पोरानं अशी भांडी घासणं बरं दिसणार नाही असा विचार मम्मीच्या मनाला शिवला नाही. मी भांडी घासत असतानाच मित्र आले. त्यांना म्हणालो,

‘तुम्ही आत बसा मी भांडी संपवून येतो.’ तेव्हाही ‘राहू दे, ठेव बाजुला, मी घासते’ या पैकी एकही शब्द मम्मीच्या तोंडून आला नाही.

अगदी परवाची गोष्ट. मोठ्या दीदीच्या सासरकडची मंडळी घरी जेवायला आली होती. मी दुध आमटी, कुर्मा भाजी, जीरा राईस, तांबडा, पांढरा असा संपूर्ण स्वयंपाक केला होता. पाहुणे घरात पोहोचले तेव्हा पुऱ्या तळायच्या आणि भांडी घासायचं काम राहिलं होतं. तेव्हाही लेकीच्या सासरच्या माणसांसमोर तिनं मला विचारलं, ‘पुऱ्या तळतोस की भांडी घासतो?’ सासरची मंडळी बघतच राहिली!

आईमध्ये झालेला हा बदल माझ्या शरीरासाठी त्रासदायक असला तरी मनाला खूप सुखावणारा आहे. मी घरातली काम करतोय. त्यांचं थोडंसही कौतूक मी किंवा आई करत नाही. घरातली कामं ही तिची आणि माझ्या मोठ्या बहिणींप्रमाणेच माझीही जबाबदारी आहे. हे तिनं आतून स्वीकारलं असावं.

स्त्री पुरूष समतेबद्दल मी आईशी कोणताही वाद घातला नाही. तात्त्विक चर्चा केली नाही तरीही मला तिचा दृष्टीकोन बदलता आला. संविधानाचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरात आता खऱ्या अर्थाने समता नांदेल अशी आशा आहे.

Updated : 21 July 2020 6:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top