Home > मॅक्स ब्लॉग्ज > Jawaharlal Nehru : द डिस्कव्हरी ऑफ इंडिया

Jawaharlal Nehru : द डिस्कव्हरी ऑफ इंडिया

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती विशेष - नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर लेखक संजय आवटे यांचे पुण्यातील व्याख्यान लेखस्वरुपात वाचा...

Jawaharlal Nehru : द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
X

पुण्यात आज गांधी भवनात नेहरू जयंतीच्या निमित्ताने नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर व्याख्यान दिले. सोबत, ख्यातनाम स्कॉलर प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, लेखक शंकर निकम, अन्वर राजन होते. डॉ. शिवाजीराव कदम, सुनीती सु. र, विनय र. र, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सुधाकर जाधव, माधुरी आवटे, भाई अविनाश इंगळे, ॲड. राजेश तोंडे, स्वप्निल तोंडे, अप्पा अनारसे, पार्थ, अभिषेक वाल्हेकर, अभिषेक मंगल, अरूणा, श्री. भारदे, श्री.पारखी, बाळासाहेब कदम असे भरपूर स्नेही खास ऐकायला आले होते. सुमारे तासभर केलेली ही मांडणी लेख स्वरूपात प्रसिद्ध करावी, अशी इच्छा अनेक सन्मित्रांनी व्यक्त केली. म्हणून हा लेख.

बराच मोठा आहे. थोडा वेळ मिळाल्यास आवर्जून वाचा.

आजच्या कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे आज या कार्यक्रमासाठी येणं ही फार अवघड गोष्ट होती. कारण, आजचा दिवस अगदी धामधुमीचा आहे. तुम्हाला माहिती आहे की, बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. नव्या भारतात अद्यापही निवडणुका होतात. निकालही लागतो. अशावेळी मला बोलायचं आहे, या पुस्तकाविषयी. ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’विषयी. गंमत बघा. ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे प्रचंड मोठं पुस्तक आहे. आणि, या पुस्तकाचं शेवटचं वाक्य निवडणुकीशीच संबंधित आहे. पंडित नेहरू म्हणतात की, निवडणुका लवकरच होणार आहेत. हे शेवटचं प्रकरण २९ डिसेंबर १९४५ रोजी लिहिलेलं आहे. त्यानंतर लगेच १९४६ मध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या आणि सप्टेंबरमध्ये नेहरू हंगामी पंतप्रधान झाले. त्यामुळे नेहरू अगदी पंतप्रधान होत असतानाचं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या शेवटी नेहरू म्हणतात, “भारतात सर्वसाधारण निवडणुका लवकरच होतील. या निवडणुकांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्या येतील आणि जातील. पण मग पुढे काय? भारतात वा अन्यत्र कुठेही स्वातंत्र्याचा पाया नसेल, तर शांतता असणार नाही. तसे नसेल तर निवडणुका हा फक्त उपचार होऊन जाईल. स्वातंत्र्य आणि लोकशाहीशिवाय अभ्युदयाची आशा नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे”, असं नेहरू म्हणतात. आज नेहरूंचा वाढदिवस आहे.

सो, सगळ्यात पहिल्यांदा हॅपी बड्डे डियर नेहरू.

नेहरूंचा जन्मदिवस हा एकट्या नेहरूंचा नाही. तो एका स्वप्नाचा बड्डे आहे. एका आशेचा वाढदिवस आहे. सगळं कोसळेल, असं वाटत असताना नियतीशी करार करणार्‍या एका आकांक्षेचा वाढदिवस आहे. या पुस्तकात नेहरू म्हणतात, माझे बरेचसे वाढदिवस तुरुंगात साजरे झालेत. तुम्ही कल्पना करा. ८१ वर्षांपूर्वीची गोष्ट. असाच १४ नोव्हेंबर उजाडतो. १४ नोव्हेंबर १९४४. आणि, आपल्या या लाडक्या पुस्तकावरुन नेहरू शेवटचा हात फिरवत असतात. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तकही ८० वर्षांचं होतं आहे.

१९४६मध्ये ते प्रसिद्ध झालं. त्यामुळं पुढचं वर्ष हे खास सेलेब्रेशनचं वर्ष असणार आहे.

‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ The Discovery of India पुस्तक पंडित नेहरूंनी अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगात लिहिलं. नऊ ऑगस्ट १९४२ ते २८ मार्च १९४५ या साधारणपणे तीन वर्षांच्या कालावधीमध्ये नेहरू इथे तुरुंगात होते. इथे एप्रिल ते सप्टेंबर १९४४ या पाच महिन्यांमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिले. गंमत बघा. नेहरू जिथे भारताचा शोध घेत होते आणि हे पुस्तक लिहीत होते, तेव्हा तिथे तुरुंगात त्यांच्या हस्तलिखितांचं वाचन करणारे सहकारी कोण होते?

हस्तलिखितांचं वाचन करून त्यावर प्रतिक्रिया देणारे सहकारी होते-

मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत, नरेंद्र देव, असफ अली. ही नावंच भारताची गोष्ट सांगतात!

नेहरूंची सगळीच पुस्तकं अफाट आहेत. म्हणजे ‘ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी’ किंवा ‘ॲन ॲटोबायोग्राफी’ अथवा ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ही सगळीच पुस्तकं महत्त्वाची आहेत. पण, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे पुस्तक आहे.

त्याची तीन कारणं आहेत.

(१) एक म्हणजे, हे पुस्तक लिहून झालं आणि लगेच नेहरू पंतप्रधान झाले. त्यामुळे अतिशय निर्णायक कालखंडातलं त्यांचं हे पुस्तक आहे. देशाचा पंतप्रधान होणारा नेता कुठल्या प्रकारे विचार करत होता, हे समजण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.

(२) दुसरं म्हणजे, या पुस्तकाचा पैस फार वेगळा आहे. तो काळच वेगळा होता. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देश उभा होता. फाळणी होणार, हे जवळजवळ निश्चित झालेलं होतं. कोणी कितीही प्रयत्न केले, तरीही फाळणीपासून रोखणं अशक्य होतं. देशाची अवस्था अत्यंत बिकट होती. देशातली निम्मी माणसं उपाशीपोटी झोपत होती. साक्षरतेचे प्रमाण सतरा टक्के होते. रोगराई भयंकर होती. लोकांना रोजगार नव्हता. अशा अवस्थेमध्ये नव्या देशाची उभारणी करायची होती.

शेवटच्या टप्प्यामध्ये हिंदू-मुस्लिम विखार प्रचंड वाढवला गेला होता. इंग्रजांना जाताना या देशाचे दोन तुकडे करायचे होतेच. पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विखार तयार करायचा होता. खरे म्हणजे, दोनच काय, त्यांना या देशाचे पाचशे-साडेपाचशे तुकडे करायचे होते. एकसंध भारत हे आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, याची कल्पना इंग्लंडला होती. ती अमेरिकेलाही होती. भारत नावाची नवी महासत्ता तयार होऊ नये, असा प्रयत्न सगळ्यांचाच होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका नावाची एक मोठी महासत्ता तयार होत होती. सोबत सोव्हिएत रशियासुद्धा शक्तिशाली होता. अशावेळी दक्षिण आशियामध्ये भारत नावाचा बलदंड देश उभा राहिला, तर तो त्रासदायक ठरेल, अशी भीती युरोप आणि अमेरिकेला होती. त्यामुळे त्यांनी भारतातील वातावरण प्रचंड कलुषित करून टाकलेले होते. हिंदू-मुस्लिम तेढ एवढी प्रचंड वाढवली गेली होती की, ज्वालामुखीच्या तोंडावर हा देश उभा होता. अशावेळी नवा देश घडवण्याचे आव्हान पंडित नेहरूंच्या समोर होते.

फंदफितुरी करून रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल जिंकले. अर्कोटची लढाई, त्यानंतरची प्लासीची लढाई या लढाया नावालाच. प्रत्यक्षात गोलमाल करून आणि फोडाफोडी करून क्लाइव्हने भारतात प्रवेश केला, असे नेहरूंनीच या पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे जातानाही त्यांना तेच करायचे होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग न घेता ज्यांनी इंग्रजांना मदत केली, त्यांनी इथेही इंग्रजांना मदत केली. त्यामुळे फाळणी करणे इंग्रजांना सोईचे गेले. ते असो. तेव्हा जो नवा देश घडवायचा होता, त्या देशाची कल्पना काय, याची मांडणी नेहरूंनी या पुस्तकात केलेली आहे. नव्या देशाचा शिल्पकार या प्रक्रियेकडे नक्की कसे बघत होता, हे समजण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे.

(३) तिसरा मुद्दा. या पुस्तकाची नेपथ्यरचना फार महत्त्वाची आहे. १९४२चे चले जाव आंदोलन नुकतेच झाले होते. दुसरे महायुद्ध सुरू होते. हिटलर, मुसोलिनी आणि जपानची लष्करशाही यांचा मुकाबला करण्यासाठी दोस्त सज्ज होते. म्हणून इंग्लंडची बाजू घ्यावी, तर इंग्लंडच्या क्रूर साम्राज्यवादाचा चेहरा भारताने पाहिलेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची फेरमांडणी झाली. आता देश स्वतंत्र होणार, याची चाहूल लागलेली होती. स्वातंत्र्य मिळणार की स्वातंत्र्याची फाळणी होणार, असा प्रश्न होता. अशावेळी आलेले हे पुस्तक आहे.

या पुस्तकाचा आकार बघितला तरी स्तिमित व्हायला होते. शांतपणे बसून हे पुस्तक चाळले, तरीही आपण श्रीमंत झालो, असे वाटू लागते. मला प्रश्न पडतो की, तुरुंगामध्ये पाच महिन्यात एक हजार हस्तलिखित पाने नेहरूंनी कशी लिहिली असतील? एक तर, तुरुंगामध्ये वर्तमानपत्र मिळण्याची मारामार. बाकी संदर्भांची पुस्तकं कुठे मिळावीत? कुठलेही संदर्भ हाताशी नसताना नेहरू एक-एक पान लिहीत होते आणि पाच महिन्यांत त्यांनी अवघे पुस्तक लिहून पूर्ण केले, ही खरोखरच आश्चर्य वाटावी, अशी गोष्ट आहे. आणखी एका अर्थाने हे पुस्तक आपल्यासाठी जिव्हाळ्याचे आहे. कारण, ते आपल्या परिसरात लिहिले गेले. सगळ्यांना माहितीच आहे की, ते अहमदनगरच्या तुरुंगात लिहिले गेले. अहमदनगरचा जो किल्ला आहे, त्याची इंग्रजांनी तुरुंगाची छावणी केली होती. त्या तुरुंगात नेहरू होते आणि त्या कालावधीमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं. आपल्या आमदार संग्राम जगतापांना हे पुस्तक भेट द्या, असं मी म्हटलं होतं. तर, खासदार निलेश लंके म्हटले, पण ते इंग्रजीत आहे. मी म्हटलं, डॉ. सुजय विखे आहेतच आपले फाडफाड इंग्लिशवाले. त्यांची मदत घेऊ या.

विनोद सोडा.

हे पुस्तक आले १९४६ला. साने गुरूजी गेले १९५०ला. साने गुरुजींनी त्वरेने हे पुस्तक मराठीत भाषांतरित गेले.

जगात जे जे सुविचार वारे

मदिय भाषेत भरोत सारे

अशी मांडणी करणारे गुरुजी केवढे समकालीन होते!

नेहरूंची एक गंमत होती. प्रत्येक वेळी ते तुरुंगात जायचे, तेव्हा काहीतरी नवं लेखन घेऊनच बाहेर यायचे. तुरुंगात गेलं की एकांत मिळतो, असं ते गमतीने सांगायचे. त्यांना कोणी विचारलं, “काय मग, काही नवं लेखन वगैरे?” तर ते हसायचे आणि म्हणायचे, काही महिने झाले. तुरुंगात गेलो नाही. त्यामुळे काही लिहिलं गेलं नाही. पंतप्रधान झाल्यानंतर मात्र नेहरूंना तसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांचं असं पुस्तक आलं नाही. तुरुंगातला एकांत हा खरोखरच नेहरूंसाठी फार फलदायी ठरला. आणि, अर्थातच तो आपल्याला सुद्धा तेवढाच श्रीमंत करणारा होता.

नेहरू सतरा वर्षे भारताचे पंतप्रधान होतेच, पण त्यापूर्वी जवळपास दहा वर्षे तुरूंगात होते.

आणखी एक मुद्दा.

या पुस्तकाबद्दल बोलताना नेहरूंचं कौतुक नेहमीच केले जातं आणि ते स्वाभाविक आहे. पण खरं म्हणजे, या पुस्तकाचं श्रेय तेवढेच जाते इंदिरा गांधी यांच्याकडे. कारण, नेहरूंनी हजार पाने लिहून हातावेगळी केली. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी शेवटचे प्रकरण जे लिहिले, ते २९ डिसेंबर १९४५ रोजी. त्यानंतर लगेच जानेवारी १९४६मध्ये प्रांतिक निवडणुका लागल्या. त्यानंतर नेहरू त्या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि नंतरच्या राजकारणामध्ये मग्न होऊन गेले.

त्यामुळे, या हस्तलिखिताचं पुढे काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तेव्हा ही सगळी जबाबदारी तरूण इंदिरा गांधींनी आपल्या खांद्यावर घेतली. तेव्हा त्या अवघ्या सत्तावीस वर्षांच्या होत्या. मला एकदम आठवलं. बाप आणि लेकीचं नातं बघा. बापाचा बड्डे चौदा नोव्हेंबर. लेकीचा १९ नोव्हेंबर. नेहरूंच्या या सर्व लेखनाला पुस्तकाचे स्वरूप देणे, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ शोधणे, तळटीपा देणे, प्रूफे तपासून देणे हे सगळं काम इंदिरेनं केलं. मूळ पुस्तकाइतकंच ते मोठं काम आहे. अर्थात, इंदिरा गांधींना ते सोपे गेलं, याचं आणखी एक कारण आहे. नेहरूंचे पहिले पुस्तक ‘ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी’ हे पुस्तक म्हणजे नेहरूंनी चिमुकल्या इंदिरा गांधींनाच लिहिलेली पत्रं आहेत. भारतातल्या आणि जगभरातल्या वाढत्या वयाच्या मुला-मुलींना ‘मानवाची गोष्ट’ काय आहे, हे सांगणारं ते पुस्तक. इंदिरेला लिहिलेल्या या पत्रांमधूनच नेहरूंचं ते पुस्तक साकार झालं. त्यामुळे नेहरूंच्या लेखनाची शैली, त्यांची भाषा, त्यांची शब्दकळा हे इंदिरा गांधींना फार नीटपणे अवगत होते. शिवाय, नेहरूंकडे नसलेली कडक शिस्त इंदिरेकडं होती. त्यामुळे त्यांनी ते पुस्तकाच्या फॉर्ममध्ये नीट बसवलं. त्यामुळेही हे पुस्तक अगदी छान झाले. इंदिरेनं या पुस्तकाला चेहरा दिला, असे नेहरू म्हणत. पोएटिक योगायोग बघा. नेहरूंनी भारताचा शोध घेतला आणि नेहरूंनी शोध घेतलेल्या भारताला इंदिरा गांधींनी चेहरा दिला.

‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे म्हटलं तर इतिहासाचे पुस्तक आहे. म्हटलं तर आत्मचरित्र आहे. म्हटलं तर तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. इतिहासाची पुस्तकं अनेकदा अकॅडमिक असतात, पण खूप कोरडी असतात. आत्मचरित्रामध्ये अकॅडमिक मांडणीचा अभाव असतो. ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे छानय. पण, नंतर ते बापच बदलतात. असो. तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात गोष्ट नसते. या पुस्तकात मात्र हे सगळं आहे.

हे पुस्तक तुरुंगात लिहिलेले असल्यामुळे त्याला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभलेली आहे. त्यामुळे हा भारताचा शोध आहे, पण नेहरूंचा स्वतःचा शोध सुद्धा आहे. या पुस्तकाची सुरूवातच बघा. तिसर्‍या ओळीतच चंद्र डोकावतो. तुरूंगातून दिसणारा चंद्र त्यांना मित्र वाटू लागतो.

“This was my ninth imprisonment.

When we reached Ahmednagar Fort, a thin crescent of the moon was shining in the sky.

The sky was dark, and against the dark background that delicate crescent shone brightly.”

“यावेळी तुरुंगात आलो. तुरुंगात येण्याची ही माझी नववी वेळ. आम्ही आलो, तेव्हा शुक्ल पक्षातील चंद्रकोरीने आमचे स्वागत केले. आकाश अधिकच काळेभोर दिसत होते. त्यात ती चंद्रकोर लकाकत होती.” अशी सुरुवात होते या पुस्तकाची.

तुम्ही म्हणाल, हे काहीच नाही. आमचा आताचा माणूस असता तर या चंद्रकोरीला दम देऊन सोबत फोटो काढून घेतला असता.

असो.

एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला नेहरूंच्या संदर्भात सांगितली पाहिजे. आज जो काही त्रास आहे ना या सगळ्या लोकांना नेहरुंचा, त्याचे एकमेव कारण तिथे आहे. नेहरूंना आदर्शवादाचं फार नेमकं भान होतं. हा लढा केवळ सत्तांतराचा नाही. तो आदर्शवादाचा आहे. तो मूल्यांचा आहे. याचं भान होतं. नेहरू एके ठिकाणी असे लिहितात की, इंग्रज जाणार आणि भारतीय लोक सत्तेमध्ये येणार, हे तर नक्कीच आहे. पण, आमच्यापैकी काहींना फक्त सत्तांतर खुणावते आहे. ते जातील आणि त्यांच्या जागी आम्ही सत्तेमध्ये येऊ. पण केवळ असे होऊन चालणार नाही. केवळ सत्ता बदलून चालणार नाही. हा मुद्दा मूल्यव्यवस्थेचा आहे. आणि, म्हणून तसे आमूलाग्र, व्यवस्थात्मक आणि संरचनात्मक बदल सुद्धा करावे लागतील.

“It is not enough to change the rulers.

We have to change the system which produces inequality and injustice.”

पहिल्याच प्रकरणात त्यांनी त्या संदर्भातला उल्लेख केला आहे. तो फार महत्त्वाचा आहे. नेहरु असे म्हणतात की, “मार्च १९३६ च्या सुमारास मुसोलिनीने माझ्यावर भेटीसाठी दबाव टाकला होता. तरीही ते दबावपूर्ण निमंत्रण मी नाकारले. त्यानंतर दोन वर्षांनी नाझी सरकारच्या वतीने जर्मनीला भेट देण्याचे आमंत्रण आले. त्या आमंत्रणात पुढे एक वाक्य जोडलेले होते. तुम्ही नाझीवादाचे विरोधक आहात, हे आम्हाला माहिती आहे. तरीही, केवळ आमचा देश पाहावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, मी तिकडे गेलो नाही. मी आणि माझ्यासारख्या लोकांनी फॅसिझमला, नाझीझमला सदैव विरोधच केला.” “मी गेलो असतो, तर त्यांनी माझे फोटो दाखवून खोटा प्रचार केला असता”, असेही नेहरू म्हणतात.

पुढे नेहरू काय म्हणतात?

“आम्ही फॅसिस्टांना, नाझींना विरोध करत होतो, तेव्हा जे फॅसिझम आणि नाझीझम यांच्या बाजूने बोलत होते. हिटलर आणि मुसोलिनी यांच्यासमोर ते मान तुकवत होते. चीनमधील जपानी आक्रमकांना मान्यता देत होते. तेच लोक आज महायुद्ध सुरू झाल्यावर मात्र फॅसिझमविरोधी फलक हातात घेऊन उभे आहेत.”

नेहरूंना किती भान होते, बघा. म्हणजे, आज जे घडत आहे, ते नेहरूंना समजले तर त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण, याच पुस्तकात नेहरू म्हणतात -

“वाऱ्याचा रोख बदलला की लोक विचार बदलतात. सत्ता बदलली की लोक सत्ताधाऱ्यांसोबत जातात.” अशा लोकांना सरकारजमा लोक, असा शब्द नेहरूंनी वापरला आहे. “सरकारच्या आसपास असे लोक घिरट्या घालत असतात. काल-परवा जे लोक हिटलर आणि मुसोलिनी यांची कवने गात होते, त्यांना आदर्श मानत होते आणि रशियाला शिव्याशाप देत होते, तेच लोक बदलले. कारण, इंग्रज सरकारची भूमिका बदलली. सगळे बडे बडे अधिकारी आता फॅसिझम आणि नाझीवाद यांच्या विरोधात बोलत आहेत.”

ती गोष्ट मला आठवली.

एक दिवस बादशहाच्या जेवणात वांग्याची भाजी आली. ती भाजी इतकी स्वादिष्ट वाटली की बादशहा अक्षरशः तृप्त झाला.

तो खुशीत बिरबलाला म्हणाला,

“बिरबल, हे वांगे तर फारच चविष्ट आहे.”

बिरबल लगेच मान हलवून म्हणाला,

“हो हुजूर! वांगे म्हणजे तर भाजींचा बादशाह! स्वर्गातील फळभाजी आहे ही. यापेक्षा थोर काही असूच शकत नाही.”

काही दिवस गेले. पुन्हा जेवणात वांगे आले.

या वेळी अकबरचा मूड खराब होता. त्याला काही ते वांगे आवडले नाही. त्याने घास घेतला आणि लगेच कपाळावर आठ्या चढवल्या.

“अरे बिरबल!” तो ओरडला,

“हे वांगे काय रे? निकृष्ट! कसली ही भाजी?”

बिरबल लगेच म्हणाला:

“बरोबर हुजूर! याहून वाईट भाजी कुठलीच नसेल! अगदी भयानक! वांगे म्हणजे भाज्यांची बदनामी आहे!”

अकबर गोंधळून गेला. तो रागाने म्हणाला, “अरे! काही दिवसांपूर्वी तर तू म्हणालास की वांग्याची बरोबरी नाही. ती स्वर्गीय भाजी आहे. आता म्हणतोस ते सर्वात वाईट! हे कसं?”

बिरबल शांतपणे हसला आणि म्हणाला, “हुजूर, मी वांग्याचा सेवक नाही. मी तुमचा सेवक आहे.” असे संधिसाधू लोक नेहरूंनी ओळखले होते. म्हणून, नेहरू आदर्शवादाविषयी सतत बोलताना दिसतात.

नेहरूंच्या राष्ट्रवादाची ओळख या पुस्तकात होते.

१९३७च्या प्रांतिक निवडणुकीचा अनुभव नेहरू सांगतात. तेव्हा नेहरू हे देशाचे डार्लिंग होते. कॉंग्रेसचे पोस्टरबॉय होते. नेहरूंनी ही निवडणूक जिंकलीही.

त्या संदर्भात नेहरू लिहितात - “कधी कधी मी एखाद्या सभेत पोहोचलो की, ‘भारतमाता की जय’ अशा उच्च स्वरातील जयघोषाने माझे स्वागत व्हायचे. मग मी अनपेक्षितपणे त्यांना विचारायचो की, ही तुम्ही घोषणा दिली. तिचा अर्थ काय? भारतमाता कोण आहे? नेहरू काही ‘मन की बात’ करत नसत. ते विचारत. ऐकून घेत. त्यांच्या प्रश्नाची लोकांना गंमत वाटायची आणि आश्चर्यही वाटायचं. पण मग निश्चित उत्तर माहीत नसल्यामुळे ते आधी एकमेकांकडे आणि नंतर नेहरूंच्या तोंडाकडे पाहायचे. मग नेहरू तोच प्रश्न पुन्हा विचारायचे. सरतेशेवटी, इथल्या मातीशी ज्याचे नाते जुळलेले आहे, असा एखादा उत्साही माणूस उठायचा आणि म्हणायचा, “भारतमाता म्हणजे ही जमीन. ही धरती.” पण मग “जमीन म्हणजे काय? तुमच्या खेड्यातला तुकडा की त्या जिल्ह्यातील जमीन?” अशा प्रकारे ती प्रश्नोत्तरे सुरू होत.

शेवटी अस्वस्थपणे लोक नेहरूंना म्हणत, तुम्हीच समजावून सांगा. मग नेहरू सांगत असत- “तुम्हाला जे वाटते, ते सगळे भारत आहेत. पण त्याहूनही अधिक काही आहे. भारतातले पर्वत-नद्या-जंगले-जमीन-शेती आपल्याला प्रिय आहेतच. पण, भारतमाता म्हणजे या विस्तीर्ण भूमीवर पसरलेले लाखो लोक आहेत. तुमच्यासारखे- माझ्यासारखे लोक. ‘भारतमाता की जय’ म्हणजे या सर्व लोकांचा जय. त्यामुळे तुम्हीच भारतमाता आहात. शिवाय प्रत्येकाची भारतमाता वेगळी असू शकते.”

तेव्हा या प्रक्रियेत जे कुठेच नव्हते, त्यांना अचानक ‘भारतमाता की जय’चा पुळका येऊ लागला आहे. परवा ‘वंदे मातरम’ची दीडशे वर्षे म्हणून काय ते इव्हेंट्स! अरे बाळांनो, तुमचा काय संबंध ‘वंदे मातरम’शी. ते गायले गेले कॉंग्रेसच्या अधिवेशनात. त्याला राष्ट्रीय गीत केले नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी. आणि, तुमचे काय मध्येच? वंदे मातरम म्हटल्यावर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या, तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते, त्यांना आता प्रेम वंदे मातरमविषयी आणि भारतमातेविषयी.

नेहरू सांगतात, “प्रचारसभेत बोलताना मी उमेदवारांचा उल्लेख फार कमी करायचो. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारापेक्षाही आदर्शवाद अधिक महत्त्वाचा आहे. ही लढाई आदर्शवादाची आहे.” नेहरूंना हे भान होते. असे भान आणखी कोणालाच नव्हते. आता तर काय बोलावे?

एक गंमत सांगतो.

आम्ही गंमतीनं कुमार केतकरांना चिडवायचो. तुम्हाला कुठलाही विषय दिला तर तुम्ही एकदम ग्लोबल संदर्भ वापरत असता. म्हणजे, उद्या सलमान आणि ऐश्वर्यावर लिहा म्हटले तरी तुम्ही असे लिहाल- सलमान आणि ऐश्वर्या यांचे प्रकरण बहरात होते, तेव्हा जॉर्ज बुश यांनी इराकवर आक्रमण केले होते आणि त्याचवेळी इकडे भारत-अमेरिका आण्विक करार अंतिम टप्प्यात आला होता. पण, नंतर माझ्या लक्षात आले की, ही शैली नेहरूंची आहे. अनेक नेहरू चाहत्यांवर त्या शैलीचा प्रभाव आहे.

नेहरूंची विचार करण्याची आणि तो विचार मांडण्याची खास पद्धत होती. एकूण कालपटाकडे ते बघत असत. म्हणजे, गौतम बुद्धांबद्दल बोलताना, ज्या युगाने बुद्धांना जन्म दिला, ते युगच भारावलेलं होतं. तत्त्वज्ञानविषयक संशोधनाचं होतं, असं सांगताना त्याच युगातील लाओ त्से, कन्फ्यूशियस, झरतृष्ट, पायथागोरस यांचा उल्लेख नेहरू करतात.

आणखी ही गंमत बघा.

इंग्लंडने भारतावर राज्य केले. मात्र, ही सुरूवात खूप आधी झाली होती. असे सांगताना नेहरू काय म्हणतात?

“इंग्लंड भारतात आले, जेव्हा राणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला १६०० मध्ये भारतात काम करण्याची परवानगी दिली. हे तेच साल आहे, जेव्हा शेक्सपियर जिवंत होता आणि लिहिता होता. १६०८ साली मिल्टनचा जन्म झाला. पण मग यातले कुठले इंग्लंड भारतात आले? शेक्सपियर आणि मिल्टनचे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे? की, क्रूर अशा फौजदारी कायद्यांचे आणि खोलवर रुतलेल्या सरंजामशाहीचे? कारण हे दोन वेगळे इंग्लंड देश होते. प्रत्येक देशात राष्ट्रीय चारित्र्य आणि संस्कृती यांचे दोन पैलू असतात. तसेच ते इथेही होते. यातला कोणता पैलू प्रभावी ठरतो, यावर त्या देशाचा प्रवास ठरतो.”

भारतही दोन आहेत, असे त्यांना वाटत असे. भारतात धर्मांध शक्ती वाढत जाणे ही नेहरूंची चिंता होती. या गटांना जनाधार मिळतो आहे, यामुळे नेहरू अस्वस्थ होत. हा खरा भारत नाही, हे ते कळकळीने सांगत. ज्यांनी भारताची फाळणी केली, त्या दोन्ही विचारधारांचा मुद्दा एकच होता- द्विराष्ट्र सिद्धांत. भारतात हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत, असे जिना म्हणत आणि सावरकरही म्हणत. नेहरू म्हणत, “ही दोनच राष्ट्रे का, हे काही मला कळत नाही. कारण राष्ट्रीयत्व धर्मावर आधारित असेल, तर मग भारतात बरीच राष्ट्रे असायला हवीत. शिवाय, एकाच खेड्यात अशी पाच-दहा राष्ट्रे असू शकतात. त्याचे काय करायचे?

नेहरूंचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी साम्यवादाविषयीही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना स्वतःला साम्यवादाचे आकर्षण होते. मात्र, काही मूलभूत आक्षेप होते. ते म्हणतात, भारतासारख्या एखाद्या देशात, की जिथे पन्नास टक्के लोक उपाशी आहेत, आर्थिक संरचना मोडकळीस आली आहे, अशा ठिकाणी कम्युनिस्टांविषयी आकर्षण असायला हवे. ते आहेही. परंतु कम्युनिस्ट त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत, कारण राष्ट्रीय भावनेपासून त्यांनी स्वतःला तोडले. ते अशी भाषा बोलतात की ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. कम्युनिस्ट चळवळीने भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक मनोभूमीकडे लक्ष दिले नाही, लोकांच्या भावनांशी नाळ जुळवली नाही, म्हणूनच ती व्यापक जनाधार निर्माण करू शकली नाही.”

येणार्‍या काळात धर्मांधता आणि जातव्यवस्था आपले मोठे नुकसान करू शकते, असे सूचित करत नेहरू सावधही करतात. नेहरू खरोखरीच द्रष्टे होते. १९४४मध्ये ते लिहितात - येणारा मोठा काळ अमेरिकेचा असणार आहे. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मात्र, दोघांच्याही मर्यादा आहेत. राजकीय लोकशाही नसल्याचे सगळे दुर्गुण सोव्हिएत रशियात दिसतात आणि राजकीय लोकशाहीतील सर्व दुर्गुण अमेरिकेत दिसतात! आपण या दुर्गुणांचा पुतळा बघतो आहोतच तिकडे. अमेरिका आणि रशिया यांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे, भूतकाळाच्या ज्या जड ओझ्याने आशिया आणि युरोपला दडपले आहे, ते भूतकाळाचे अवजड ओझे या दोघांवर नाही! भारताकडे लोकशाही आहे. संपन्न होण्याच्या सर्व शक्यता आहेत. मोठा वारसाही आहे. मात्र, त्याचे ओझे न करता, इतिहास पदस्थल करून आपले मन अवघ्या जगासाठी भारतीय उघडतील. जगाचे नागरिक होतील आणि लोकशाही जपतील, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने सक्षम राष्ट्र होईल.

नेहरूंच्या लेखी भारत काय आहे? भारत एक भौगोलिक आणि आर्थिक एकक आहे. तिथे वैविध्यपूर्ण अशी सांस्कृतिक एकता आहे. अनेक विसंगतींनी भरलेली अशी ही गोधडी कुठल्यातरी मजबूत परंतु अदृश्य बंधांनी शिवलेली आहे. भारत ही दंतकथा आहे. एक संकल्पना आहे. एक स्वप्न आहे. दूरदृष्टी आहे. आणि, ती सगळी खरीखुरी आहे. India is a myth and a reality!

“India is a geographical and economic entity, a cultural unity woven of many diverse threads.

Yet it is much more than that.

India is a myth and an idea, a dream and a vision, and she has filled the minds of our people for ages.”

या ग्रंथात नेहरू बुद्ध सांगतात. महावीर सांगतात. बरंच काही सांगतात. मात्र, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तून एक लक्षात येतं, ते गांधी भवनात सांगायलाच हवं. नेहरूंना जे गांधी समजले, ते कोणालाच नाहीत समजले.

गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद कितीही असतील. मात्र, प्राचीन भारत आणि आधुनिक भारत यांना जोडणारा दुवा म्हणजे गांधी, हे आकलन नेहरूंचे पक्के होते. ज्या भारताचा शोध नेहरू घेत होते, तो भारत त्यांना गांधींमध्ये सापडला. आणि, गांधींना जो उद्याचा भारत हवा होता, तो त्यांना त्यांच्या लाडक्या जवाहरमध्ये दिसला. जे दोघांनाही हवे होते, पण जे दोघांमध्येही नव्हते, ते परिवर्तन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये दिसले.

म्हणून, भारताचे चित्र पूर्णपणे साकार झाले.

गांधी-नेहरू-आंबेडकरांनी साकारलेला हा भारत आता कुठे आहे?

तो शोध तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे.

आपणही आज कारागृहातच आहोत. त्यामुळे तो शोध अगदी नेमकेपणाने घेता येईल, याची मला खात्री आहे.

त्यासाठी नेहरूच वाट दाखवणार आहेत.

सो, हॅपी बड्डे नेहरू!


- संजय आवटे

(पुण्यात बोलताना)

ज्येष्ठ पत्रकार, लेखक

(साभार- सदर पोस्ट संजय आवटे यांच्या फेसबुक पोस्ट वरून घेतली आहे.)

Updated : 15 Nov 2025 9:56 AM IST
Next Story
Share it
Top