MaxCinema : Mere Apne - ‘हालचाल ठीकठाक हैं, सबकुछ ठीकठाक हैं..’
तंतोतंत सद्यस्थिती मांडणारी गुलजार यांची गाणी... मेरे अपने 1971 साली आलेल्या चित्रपटातील गाणी तरुणांची निराशा, राजकीय आणि सामाजिक स्थितीचे निर्भयपणे भाष्य करणारी आहे. 54 वर्षांपूर्वीही सुशिक्षित बेरोजगार आणि महागाई हाच समाजातला गंभीर प्रश्न होता. या गाण्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ आणि सध्याचं वास्तव सांगताहेत चित्रपट समीक्षक श्रीनिवास बेलसरे…
X
‘मेरे अपने’ हा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा! तो तपन सिन्हा यांच्या ‘आपनजन’ या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या बंगाली चित्रपटाचे हिंदी रुपांतर होता. हिंदी रुपांतरासाठी गुलजार यांना कलकत्याला बोलावण्यात आले. तपन सिन्हा यांनी बंगाली अभिनेतेच हिंदीसाठीही घ्यायचे ठरविले होते. नंतर त्यांनी हिंदीतून अंग काढून घेतले. तेंव्हा बिमल रॉय आणि ऋषिकेश मुखर्जींसारख्या दिग्दर्शकांचे सहाय्यक म्हणून काम केलेले एन. सी. सिप्पी हे निर्माते बनले. त्यांचाही हा निर्माता म्हणून काढलेला (१९७१) पहिलाच सिनेमा होता. मीनाकुमारी यांना मुख्य भूमिकेसाठी तयार करण्यात आले. केवळ ४० दिवसात चित्रीकरण संपलेल्या या सिनेमानंतर काही महिन्यातच त्या गेल्या.
त्याकाळी सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन, फक्त दोन घडींचा विरंगुळा, अशी भूमिका नसायची. दिग्दर्शकांनीही नव्हती आणि प्रेक्षकांचीही नव्हती. सामाजिक विषयांवरचेही सिनेमा निघत आणि चालतही! सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न तेंव्हा गंभीर होता. बेरोजगारी, महागाई आणि अनेक कारणामुळे घडून आलेल्या एकंदर अध:पतनाने उच्च जीवनमुल्ये रसातळाला चालली होती. त्यांची नोंद आपल्याला जमेल तेथे संवेदनशील दिग्दर्शक घेत. त्याचाच पुरावा म्हणजे ‘मेरे अपने’ होता.
खेड्यात एकटी राहत असलेल्या वृद्ध विधवेला (मीना कुमारी) शहरातला तिचा दूरचा नातेवाईक रमेश देव गोडगोड बोलून शहरात घेऊन येतो. वास्तवात त्याच्या बायकोला एक स्वस्तातली मोलकरीण हवी असते. चांगल्या घरातील पण गरिबीमुळे निराधार झालेल्या, वृद्धेला मोलकरणीसारखीच नव्हे तर अतिशय तुच्छतेची वागणूक मिळू लागते. हे जसजसे मीनाकुमारीच्या लक्षात येते, रोज होणारा अपमान असह्य होतो, तशी गावातले स्वत:चे सर्वस्व गमावलेली ती मुंबईच्या गल्ल्यातून भिकाऱ्यासारखी फिरू लागते. तिला एक निरागस गरीब लहान मुलगा आपल्या घरी घेऊन जातो. तिच्या अंगीभूत चांगुलपणामुळे त्या गरीब वस्तीतील आपसात भांडणाऱ्या दोन गुंडाना (विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा) तिच्याबद्दल दया आणि प्रेम निर्माण होते. सगळा मोहल्ला तिला ‘नानी मां’ म्हणून ओळखू लागतो. या गुंडाकडे ती सुद्धा मुलांप्रमाणे पाहू लागते आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी दोन्ही टोळ्यांतील भांडणात चुकून गोळी लागून ‘नानी मा’चा अंत होतो.
सिनेमा चांगला चालला. यातील बेरोजगारीमुळे गुंडगिरीकडे वळलेल्या तरुणाच्या भूमिका विनोद सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा, पेंटल, देवेन वर्मा, दिनेश ठाकूर यांनी उत्तम केल्या होत्या. त्यावेळची तरुणांमध्ये नव्यानेच आलेली बंडखोर वृत्ती, बेदरकार वागणूक, व्यवस्थेबद्दलचा संताप सगळे या तरुण अभिनेत्यानी फार छान वठवले होते. तरुणांमधील ती जरी असंतोषाची सुरुवात होती तरी अजून सगळे पूर्णपणे हाताबाहेर गेलेले नव्हते त्यामुळे संपूर्ण सिनेमात एक उपरोध होता. निषेध होता. तो उपरोध एका गाण्यातही छान व्यक्त झाला होता.
नोकरी मिळत नसल्याने आईवडिलांशी संबध बिघडलेले, खिशात चहा प्यायलाही पैसे नाहीत, त्यात आलेले टोकाचे वैफल्य यातून एकदा या तरुणांना गल्लीतून फिरताना दाखवून गुलजार यांनी त्यांच्या तोंडी एक गाणे दिले होते. ते मोठे उपरोधिक झाले होते. जीवनात काहीच ठीक चाललेले नसताना ते म्हणत असतात…
“हालचाल ठीकठाक है, सबकुछ ठीकठाक है
B.A किया है, B.A.किया, काम नहीं है वरना,
यहाँ आपकी दुआसे सब ठीकठाक है”
गुलजार यांनी तेव्हाही परवासारखेच राजकीय आणि सामाजिक स्थितीवर निर्भयपणे भाष्य केले होते.
“आब-ओ-हवा देशकी बहुत साफ़ है,
कायदा है, कानून है, इनसाफ़ है,
अल्लाहमियाँ जाने कोई जिये या मरे,
आदमीको खूनवून सब माफ़ है”
‘आदमीको खूनवून सब माफ़ है’ हे तत्कालीन कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर केलेले जळजळीत भाष्य तसे आज तरी कुठे बदलले आहे. हेच तर दृष्ट्या दिग्दर्शकाचे वेगळेपण असते. त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या कलाकृती कितीतरी दशके कालबाह्य होत नाहीत. पुढच्याच कडव्यात एकेका ओळीत प्रतिकात्मकरित्या त्यांनी फार मोठे भाष्य करून टाकले होते. सगळी व्यवस्था रोटीसाठी धावते आहे. पण ती रोटी ‘शोषकांची घार’ आकाशातून झडप मारून उचलून नेते. आणि तिच्यामागे पळणारी ‘नफ्याचे चांदीचे नाणे’ भांडवली कावळा उचलून नेतो. शेवटी कष्टकरी मात्र धावतच राहतो हे विदारक वास्तव गुलजार कसे सांगतात पहा-
‘गोलमोल रोटीका पहिया चला,
पीछेपीछे चाँदीका रुपैया चला,
रोटीको बेचारीको चील ले गयी,
चाँदी लेके मुँह काला कौवा चला
और क्या कहूँ, मौतका तमाशा
चला है बेतहाशा, जीनेकी फ़ुरसत नहीं है यहाँ,
आपकी दुआसे बाकी ठीकठाक है.’
त्यावेळच्या या तरुणांचे नैतिक अध:पतन आजच्याइतके ‘व्यवस्थित’ आणि परिपूर्ण झालेले नसल्याने त्यांच्या मानवी भावना शाबूत होत्या. त्याचेही प्रतिबिंब गुलजार यांच्या दुसऱ्या गाण्यात उमटले होते. उदास करून टाकणारे हे गाणे गायले होते किशोरकुमार आणि मुकेश यांनी. संगीत चक्क सलील चौधरी यांचे..
‘कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों,
पास नहीं तो दूरही होता, लेकिन कोई मेरा अपना,
आखों में नींद ना होती, आँसूही तैरते रहते,
ख्वाबोंमें जागते हम रातभर, कोई तो गम अपनाता,
कोई तो साथी होता...’
याच सिनेमासाठी गुलजार यांनी अजून एक अगदी वेगळेच गाणे निवडले होते. पण ते सिनेमात टाकले गेले नाही. लतादीदीने गायलेले हे गाणे ही खरे तर काझी नझरुल इस्लाम यांची एक कविता होती. ‘मेघला निशी घोरे’ अशा शब्दांतील ती बंगाली कविता हिंदी रुपात अनेकांनी ‘ऑल इंडिया रेडीओ’वर ‘गैरफिल्मी गीत’ या सदरात ऐकलेली असते…
‘रोज़ अकेली आए, रोज़ अकेली जाए,
चाँद कटोरा ले भिखारन रात..
मोतियों जैसे तारे, आँचलमें हैं सारे
जाने ये फिर क्या माँगे, भिखारन रात,
रोज़ अकेली आए…
जोगन जैसी लागे, न सोए न जागे,
गली-गलीमें जाए भिखारन रात..
रोज़ अकेली…
या गाण्याची गंमत म्हणजे ते बंगालीत गायले होते आशाताईनी आणि ‘मेरे अपने’साठी हिंदीत गायले लतादीदीने!
‘मेरे अपने’ने अनेकांना प्रभावित केले. आपले चंद्रकांत नार्वेकर हे नाव दाक्षिण्यात रूप देवून गाजवलेले मराठी दिग्दर्शक एन. चंद्रा हेही ‘मेरे अपने’मुळे खूप प्रभावित झाले होते. त्यांनी तब्बल १५ वर्षांनी ‘मेरे अपने’वर बेतलेला सिनेमा काढला ‘अंकुश.’ त्याने तर जबरदस्त रेकॉर्ड घडवले. केवळ १३लाख रुपये खर्चून काढलेल्या अंकुशने त्यांना ९५लाख रुपये मिळवून दिले इतका तो प्रेक्षकांनी उचलून धरला. लगेच त्याची ‘रावण राज्य’ या नावाने कन्नड तर “कविथाई पदा नेरामिल्लाई” या नावाने तमिळ आवृतीही निघाली! या सिनेमातील एक गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. पंजाब नॅशनल बँकेने आणि इतरही काही राष्ट्रीयकृत बँकानी ते आपले ‘थीम’साँग म्हणून घोषित केले होते. कवी अभिलाष यांचे ते शब्द होते-
इतनी शक्ति हमें देना दाता, मनका विश्वास कमज़ोर हो ना,
हम चलें नेक रास्तेपे हमसे, भूलकर भी कोई भूल हो ना...
हर तरफ़ ज़ुल्म है, बेबसी है, सहमा-सहमासा हर आदमी है
पापका बोझ बढ़ताही जाये, जाने कैसे ये धरती थमी है
बोझ ममताका तू ये उठा ले, तेरी रचनाका ये अन्त हो ना...
हम चले...
हे गाणे म्हणजे एक सुंदर प्रार्थनाच होती. अनेक शाळात त्याकाळी ती नियमित म्हटली जाऊ लागली. आजही अनेक शालेय किंवा महाविद्यालयीन कार्यक्रमात ती गायली जाते. यातील काही आदर्श तर गांधीजींच्या विचाराकडे नेणारे आहेत-
‘हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियोंके बाटें सभीको
सबका जीवनही बन जाये मधुबन
अपनी करुणाको जब तू बहा दे
करदे पावन हरइक मनका कोना...’
परिस्थितीत आजही फारसा फरक पडलेला नसताना या नव्या वर्षाची सुरवात अशा सुंदर नॉस्टॅल्जिक गाण्याने करायची नाही तर कशाने?
श्रीनिवास बेलसरे
लेखक, चित्रपट समीक्षक
७२०८६ ३३००३






